You are currently viewing पाहुणा

पाहुणा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनघा कुळकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*पाहुणा*

 

📞हँलो विजुताई कशा आहात? हो,खरंच बरेच दिवसांनी फोन केला. अहो, आठवण तर येतच होती सर्वांची.काय सांगू तुम्हाला श्रावण फार गडबडीत गेला आणि भाद्रपदात चतुर्थीला गजानन आले होते ना म्हणजे आपले गणपती हो,दहा दिवस मुक्काम असतो ना मग काय नुसती धामधूम. गणपती काय हो आपले वाहन उंदरावर स्वार होऊन येतो आणि सजवलेल्या मखरात आसनावर जाऊन बसतो पण त्याच्या आगमनाची तयारी भारीच असते हो. विजू ताई काय सांगू अगदी जन्माष्टमी झाली आणि लगेच पूर्व तयारी सुरू झाली. गणपतीच्या आवडीचे पदार्थ करायचे, फुलवाती तयार करायच्या, आरास, रोषणाई करायची, दुर्वा, पत्री, फळं, फुलं आणि मुख्य म्हणजे मोदक करायचे. अहो एकवीस मोदक तर एकट्या गणपतीलाच लागतात त्यासाठी नारळ शेंडी काढून, खवून सारण पारी व्यवस्थित व्हावी लागते ना नुसती दमछाक हो, लंबोदरच तो. एकवीस मोदक, २१ दुर्वा, एकवीस प्रकारची पत्री असा सर्व थाट असतो त्याचा. खरं सांगते विजू ताई दहा दिवस पाहुण्यासारखा येतो पण मखरात देवासारखाच बसून राहतो. सकाळ-संध्याकाळ आरती, रोज नवीन गोड नैवेद्य, सगळं कोड कौतुक करून घेतो. अहो, तुम्हाला म्हणून सांगते याच्या दोन भगिनी जेष्ठा, कनिष्ठा आल्या की हा अगदी त्यांच्यात हरवून जातो त्यांच्या एवढ्या मोठ्या नैवैद्याबरोबर याची पण चंगळच असते. बरं, काही बोलायची सोयच नसते मुळी कारण याचे एवढे सुपाएवढे कान त्यामुळे जरा शांत चित्तानेच करावं लागतं सारं.

परवा चतुर्दशीला गणपती परत गावाला गेले म्हणून थोड्या निवांत वेळी तुम्हाला फोन केला हो, अहो, खरं सांगते पण परवा फारच उदास व कसंनुसं वाटत होतं. नाही म्हटलं तरी दहा दिवस त्याच्याजवळ दिवसभर रेंगाळलेले असायचो. दिवस कसा संपला ते कळत नसे.

हो, हो ऐकू येतंय ना काय म्हणताय तुम्ही विजू ताई “गणपती कायम आपल्याजवळच आहे, तो अनादि अनंत आहे. सगळं समजतंय हो, पण काय करणार आपण कर्मकांडात अडकलेले सामान्य जीव. तो येतो तो देतो व निघून जातो परत येण्यासाठी चला, विजू ताई ठेवते फोन ” बरं वाटलं हो, तुमच्याशी बोलून, अस्थिर मन शांत झालं, खरं आहे तुमचं दहा दिवसाच्या पाहुण्यासारखं यायचं आणि लळा लावून जायचं.”

 

सौ.अनघा कुळकर्णी.

पुणे.९३२३४९१११३.

प्रतिक्रिया व्यक्त करा

12 − four =