You are currently viewing बिनभिंतीची शाळा…

बिनभिंतीची शाळा…

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

*बिनभिंतीची शाळा…*

आईच्या गर्भाशयातून एका ठरल्या नियत दिवशी मी
पृथ्वीवरती बिनभिंतीच्या मुक्त जगात अवतरलो नि रोज
रोज प्रत्येक क्षणाला माझे शिक्षण सुरू झाले. तसा गर्भाशयात
आईशी माझा नित्य संवाद चाले. आई येता जाता कुरवाळत
माझ्याशी बोलत असे. आईचे ते गर्भाशय म्हणजे चार भिंतीं
सारखे अतिशय सुरक्षित असे माझे सुंदर घर होते ते ! हो, फक्त आई आणि मी, आमचा चोविस तास चाललेला संवाद!
जीवाचे कान करत, ऐकत मी तिथे वाढत होतो. आई मनातले
खूप काही बोलायची माझ्याशी! मी येण्याची प्रचंड ओढ लागली होती तिला, हो, तिचा जीव की प्राण होतो ना मी!
मला मात्र तिथेच रहावेसे वाटत होते. पण निसर्ग नियमाप्रमाणे
मी पृथ्वीवरती , अफाट विस्तृत जगात अवतरलो. कोण आनंद
झाला सगळ्यांनाच! सारेच माझी वाट पहात होते ना?
टॅहॅ असा पहिला रडका सूर मी लावला पण .. काय हे?
सारेच हसत होते नि मी आलो , सुखरूप आलो म्हणून सारेच
कमालीचे खुष होते.

तर असे हे मुक्त जगातले,विस्तृत जगातले माझे पदार्पण साऱ्यांनाच खूप भावले. एवढ्या मोठ्या विश्वातील एका ग्रहावर मी अवतरलो नि डोळे किलकिले करून बघतो तर
काय? पिवळा धम्मक असा सूर्याचा केवढा तो प्रकाश? मी
तर घाबरून गच्च डोळेच मिटून घेतले! पहिली ओळख झाली
ती प्रकाशाची. आणि पुन्हा डोळे उघडून बघतो तर सारेच
माझ्याकडे कौतुक भरल्या नजरेने पाहतांना दिसले.इतक्या
नजरा पाहिल्यावर मात्र मी भोकाडच पसरले न् आईने मला
पोटाशी धरताच मला हायसे वाटले. खूप मोठ्या विस्तृत
जगात मी आलो नि ह्या बिनभिंतीच्या पृथ्वीवरती रोजच माझे
शिक्षण सुरू झाले. माझ्या भोवतीची खेळणी, पाळणा , चिऊ काऊ झाडे पाने फुले आवाज सारे काही माझ्यासाठी नविनच
होते की? प्रथमच हे सारे मी पहात होतो ना? बघा , किती नव नव्या गोष्टींची भर पडली माझ्या ज्ञानात! दारात येणाऱ्या चिमण्या कावळे बुलबुल शिंपी या अशा अनेक पक्ष्यांची नावे
आई बोलायची व मी रोज ती ऐकत असे. दाणा पाणी असे काही बाही ती बोलायची ते ही हळूहळू मला कळू लागले.
माझे या निसर्गशाळेत शिक्षणच सुरू झाले म्हणाना! रोज
नवनविन दृश्ये नवनविन भाषा माझ्या कानावर पडत होती नि
मी मनात मेंदूत साठवत होतो. अजून मला बोलता येत नसले
तरी मी बघत होतो, ऐकत होतो नि हृदयात साठवत होतो.

बघता बघता एक दिवस मी दीड दोन वर्षाचाही नव्हतो नि
चक्क बोललो आ ऽऽऽऽ ई! आई तर बघतच राहिली माझ्या
कडे नि तिने पटापट मुकेच घेतले माझे! तिला स्वर्ग दोन बोटेच
उरला. दहा लोकांना तिने सांगितले बाळ बोलला. तो मला आई म्हणाला! तिचा आनंद गगनात मावेना! बघा, माझे बिन
भिंतीच्या शाळेतील शिक्षण किती मजेशीर होते. खडू नाही
पाटी नाही पेन्सिल नाही.समोर दिसेल ऐकू येईल ते ते आत्मसात करायचे व अनुभवाने समृद्ध व्हायचे. घरी दारी
बाहेर सर्वत्र मी शिकत होतो नि बोलण्याचा प्रयत्न करत होतो व त्यात मला यश ही येत होते. आई बाबा भाऊ बहिणी
आत्या काका मामा आजी आजोबा साऱ्यांकडून मी दररोज
नवनविन गोष्टी शिकत होतो.

पुराण काळात आपल्याकडे गुरूकुले होती. व यज्ञोपवित
धारण करून विद्यार्थी उपनयन संस्कार झाल्या झाल्या बटू बनून आश्रमात गुरूगृही शिकायला जात असे. राम कृष्ण सुदामा सारे असेच शिकले, उघड्या निसर्गाच्या शाळेत. वेद वेदांगां बरोबर नद्या नाले तारे वारे उत्पात या साऱ्यांबरोबर पूर्ण भारतभू व संस्कृतीची ओळख त्यांना झाली. निसर्गाचे सारे,
बारकावे त्यांना उघड्या डोळ्यांनी निसर्ग पाहिल्यामुळे आपोआपच कळले.चौसष्ट कलांची ओळख त्यांना झाली.
या चौसष्ट कला भारतात तेव्हा अगदी भरभराटीला होत्या हे
त्यावेळचे स्थापत्य जे आज ही टिकून आहे, नामशेष झाले
नाही हे त्यावरून आपल्याला कळते.बुद्धालाही ज्ञानप्राप्ती
झाली ती अनुभवाच्या शाळेत शिकून व बोधीवृक्षा खालीच!
याच कल्पनेवर आधारीत शाळा मग रविंद्रनाथांनी काढली
“शांतीनिकेतन”! मुलांना झाडांशी नद्यांशी ताऱ्यांशी वाऱ्यांशी
मुक्तपणे बोलू द्यायचे. शाळा भरणार ती ही कुणा बकुलवृक्षाखालीच! खारे मतलई वारे मुले समुद्रकाठीच
शिकणार…!

मग ते कसे नाही समजणार? अशी ही बिनभिंतीची
शाळा ज्या गुरूकुलांनी चालवली होती व ज्यातून कृष्णार्जुनां
सारखे महारथी तयार झाले होते, व भारतीय संस्कृती जगभर
नावाजली होती , उत्तम संस्कार या गुरूकुलातून दिले जात
होते, उत्तम योद्धे ही तयार होत होते, ह्याला इंग्रज अधिकारी
मेकॅाले ने ग्रहण लावले. त्याने भारतातील समस्त गुरूकुलांचा
अभ्यास करून जो पर्यंत ही गुरूकुले आहेत तोवर भारतीय
माणूस कधी ही गुलाम बनणार नाही असा निष्कर्ष काढला व
यांना ब्रिटिशांचे गुलाम बनवायचे असेल तर आधी ही गुरूकुले
बंद केली पाहिजेत असा निष्कर्ष काढून कायद्याने सारी गुरूकुले बंद करून टाकली व मग इंग्रजी शाळेतून त्याला
पाहिजे तशी “जी हुजुर” म्हणणारी” एस् सर “म्हणणारी
पूर्णपणे इंग्रजांच्या तालावर नाचणारी चाकर मंडळी तयार
होऊन ते आपण भारतीय आहोत ही अस्मिताच विसरून
इंग्रजांचे गुलाम बनले. गुरूकुलाच्या विनाशाचे दुष्परिणाम
अजून आपण भोगत आहोत.

आपली संत मंडळी कोणत्या शाळेत गेली होती हो? तरी खगोलाचे , दिशा व ग्रहगोलांसह सारे ज्ञान त्यांना होते.
त्या काळच्या मंदिरांचे स्थापत्य कळणे आज ही आपल्याला
विज्ञान युगात देखील अवघड वाटते.चार भिंतीतील शाळा
शिकवत नाही असे नाही पण निसर्गाची शाळा काही औरच
आहे हे आपल्याला मान्य करावेच लागेल.म्हणून अधून मधून
या बिनभिंतीच्या शाळेत आपण शिकलेच पाहिजे व तसा
आग्रहही धरला पाहिजे असे मला वाटते.
लिहिण्या सारखे खूप आहे मंडळी, तरी आता थांबते.

खूप खूप धन्यवाद..
आणि हो, नेहमी प्रमाणे ही माझीच मते आहेत..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६९५६४२)
दि: १६/०१/२०२३
वेळ: संध्या: ५/१४

प्रतिक्रिया व्यक्त करा