सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेसला भेटले क्रियाशील जिल्हाध्यक्ष :- बाळासाहेब थोरात
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची निवड झाली आणि अल्पावधीतच सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा नवी उमेद जागृत झाली. गेली काही वर्षे जिल्हा काँग्रेसमध्ये असलेल्या दुफळीमुळे काँग्रेस पक्षाची जिल्ह्यात वाताहात झाली होती. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्यावर जिल्ह्यात एक नंबर वर असलेली काँग्रेस तळाला फेकली गेली, परंतु बाळा गावडेंसारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या जोरावर काँग्रेसने अल्पावधीतच जिल्ह्यात मुसंडी घेत बाळा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली शहर तसेच तालुका अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड केली. त्यामुळे झपाट्याने जिल्हाभर कार्यकर्ते एकत्र येऊ लागले आणि पक्षकार्यासाठी झोकून देऊन काम करू लागले. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची निवड झाल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आणि जिल्ह्यात पक्ष मजबूत व्हायला लागला.
राज्यात सत्तेत काँग्रेस असल्याने आणि महत्वाचे महसूलमंत्री पद प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे असल्याने जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी जिल्ह्यातील महत्वाचे विकास कामांचे प्रश्न घेऊन महसूल मंत्र्यांच्या दालनात त्यांच्याशी चर्चा केली. आंबोली, गेळे, चौकुळ कबूलयातदार गावकर प्रश्न, धनगर समाजाचे प्रश्न, वेळाघर येथील नियोजित ताज ग्रुप च्या पंचतारांकित हॉटेलमध्ये अन्याय न होता स्थानिकांना नोकरीत प्राधान्य देण्याविषयीचे प्रश्न, स्थानिक शेतकऱ्यांचे, मच्छीमारांचे प्रश्न याविषयी चर्चा केली, तसेच महसुलमंत्र्यांना सिंधुदुर्ग दौऱ्यावर येण्याचे आमंत्रण दिले व बाळासाहेब थोरात यांनी देखील जिल्हा दौऱ्यावर येण्याचे मान्य केले.
नारायण राणे काँगेसमधून बाहेर पडल्यानंतर जिल्हा काँग्रेसला उभारी देण्यासाठी बाळा गावडे सक्रिय आहेत. उत्कृष्ट संघटन कौशल्य असल्याने निष्ठवंताना पुन्हा एकदा पक्षात सक्रिय करण्याचे मोठे आव्हान बाळा गावडे यांनी सहज पेलले आहे. बाळा गावडे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या अल्प कालावधीत त्यांनी पक्षासाठी केलेले काम आणि धडपड पाहून सिंधुदुर्ग जिल्ह्याला क्रियाशील जिल्हाध्यक्ष मिळाल्याचे गौरवोद्गार प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काढले.
सर्वसामान्य कुटुंबातील सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष झाला आणि पक्षाचे जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली त्यामुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघ सुद्धा काँग्रेसपक्ष काबीज करेल आणि सावंतवाडीचा आमदार सुद्धा कॉंग्रेसचाच असेल, तसेच सावंतवाडीचा आमदार मंत्री म्हणूनही जबाबदारी पेलताना दिसेल अशी आशा जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी व्यक्त केली.