You are currently viewing कणकवलीत हायवे बॉक्सेल ब्रिज मधून पाणी गळती

कणकवलीत हायवे बॉक्सेल ब्रिज मधून पाणी गळती

गुरुवारी सायंकाळचा प्रकार, बॉक्सेल ब्रिजच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा शंका उपस्थित

ठेकेदार कंपनी, महामार्ग प्राधिकरण गांभीर्याने लक्ष देणार का? कणकवलीवासीयां मधून उपस्थित केला जातोय सवाल

कणकवली

कणकवलीत गुरुवारी सायंकाळी अवकाळी पाऊस झाला आणि महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत शहरात झालेल्या कामांचा एक अजून निकृष्ट नमुना समोर आला. पावसाच्या शिडकाव्याने जानवली पुलालगत हॉटेल कोकण दरबार समोर बॉक्सेल ब्रिजच्या संरक्षक कठडा व ब्लॉक मधूनच पाणी थेट सर्व्हीस रस्त्यावर येऊ लागले. त्यामुळे एवढ्या बारीक पावसाने जर बॉक्सेल ब्रिजच्या ब्लॉक मधून पाणी येत असेल तर मोठ्या पावसात पुन्हा एकदा कणकवली शहरातील बॉक्सेल ब्रिज कोसळणार नाही कशावरून? असा सवाल कणकवलीवासीयांमधून उपस्थित केला जात आहे . मागील पावसाळ्यात कणकवली एस एम हायस्कूल जवळ बॉक्सेल ब्रिज चा काही भाग कोसळला होता. त्यानंतर कणकवलीत महामार्गाच्या बॉक्सेल ब्रिजच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आम्ही कणकवलीकर व कणकवली शहरातील राजकीय पदाधिकारी व नेत्यांनी या प्रश्‍नी आवाज उठवला होता. आमदार नितेश राणे यांनी या पुलावरून वाहतूक सुरू कशी करतात ते बघतोच असा इशारा दिला होता. तर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार यांनी बॉक्सेल ब्रीज चे खाजगी तंत्रज्ञा कडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेत त्याबाबतचा अहवाल महामार्ग प्राधिकरण कडे सुपूर्द केला होता. मात्र त्यानंतरही कणकवली शहरातील या धोकादायक बॉक्सेल ब्रिज बाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. शहरातील हे बॉक्सेल ब्रिज दोलायमान स्थितीत असतानाच आता पुन्हा एकदा या बॉक्सेल ब्रिजच्या सिमेंट ब्लॉक मधूनच पाणी पावसाच्या शिडकाव्याने बाहेर येऊ लागल्याने या बॉक्सेल ब्रिजच्या दर्जाबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा