कबनूरातील घटना ; पाचजणांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
इचलकरंजी शहरालगतच्या कबनूर येथे विवाहानंतर महिन्याभरातच नवविवाहितेने ४ तोळे सोन्याचे दागिने व ५० हजाराची रोकड घेऊन पोबारा केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात सिमा मोदानी , माधुरी चव्हाण , शहिदा बारगीर, फारुख बारगीर , रेखा घाटगे या पाचजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विनोद उत्तुरे तक्रार दिली आहे.
सीमा मोदानी, माधुरी चव्हाण, शहिदा बारगीर, फारुख बारगीर हे चौघेजण वधु-वर सुचकाचे काम करतात.
कबनूर लक्ष्मीवाडी येथील
विनोद उत्तुरे हे लग्नासाठी मुली बघत असल्याची माहिती फारुख बारगीर व रेखा घाटगे यांना मिळाली. त्यांनी उत्तुरे यांना भेटुन रेखा घाटगे यांचे स्थळ दाखवुन लग्नाची बोलणी करत विवाह करुन दिला. लग्नाची फी म्हणून त्यांनी विनोद यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. तर लग्नात विनोद उत्तुरे यांनी रेखा घाटगे हिस अर्ध्या तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र तसेच पुजेच्या दिवशी घरातील तीन तोळे सोन्याचे घंटण व अर्ध्या तोळ्याचे कानातील सोन्याचे झुबे दिले होते. लग्नाच्या महिन्याभरानंतर रेखा घाटगे ही विनोद उत्तुरे यांचे सोबत माहेरी जाते असे सांगून जयसिंगपुर बसस्थानक येथून कोठेतरी निघुन गेली. उत्तुरे यांनी यासंदर्भात उपरोक्त चौघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर उत्तुरे यांनी रेखा घाटगे ही बेपत्ता असल्याची फिर्याद जयसिंगपुर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी शोध घेऊन रेखा घाटगे हिला ताब्यात घेतले. तिच्याकडे केलेल्या चौकशीत घाटगे हिने माझे जबरदस्तीने लग्न लावुन दिल्याचे सांगितले. त्यामुळे आपली फसवणूक केल्याप्रकरणी विनोद उत्तुरे यांनी पाचजणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.