You are currently viewing वेचू चला क्षण हिरवे

वेचू चला क्षण हिरवे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचा अप्रतिम ललितलेख*

 

*वेचू चला क्षण हिरवे*

आयुष्य नानाविविध रंगांनी सजलेलं…नटलेलं एक रंगबिरंगी नाटक…अजरामर नसेलही…परंतु गाजत राहणारा रंगीत रंगमंचच….!

माणसाच्या आयुष्यात अनेक रंगांची उधळण झालेली असते….सुखाचे रंग अनेक असतात…उठावदार…आकर्षक… पण दुःख, नैराश्याचा रंग मात्र काळा असतो…. तरीही माणूस आयुष्य जगत असतो…सुखदुःखाचे रंग एकत्र करूनच…

माणसाच्या रागाचा रंग असतो लाल…नेत्रात उतरणाऱ्या रक्तासारखाच भडक…तापदायक…तरीही मोकळ्या रानामध्ये फुलणार्या तांबड्या बुंद गुलमोहरासारखा…प्रसन्न…!

सुखाचा रंग असावा सोनेरी….सुवर्णासारखाच तेजस्वी…हृदयाचा गुलाबी…प्रेमाने भरलेला…अगदी सकाळीच गालावर फुललेल्या गोड गुलाब कळीसारखाच… आनंदाचा असावा पिवळा…तप्त उन्हातही मुक्तपणे हसत हसत….घोसाने… पुंजक्याने…फुलून येणाऱ्या पिवळ्या जर्द बहाव्यासारखाच… स्वच्छंदी…!

नाहीतर…पानगळ होऊन पुन्हा जांभळी नारिंगी फुले लेवून बहरून येणाऱ्या ताम्हण वृक्षासारखा जांभळा…नारिंगी…!

एकापेक्षा एक सरस रंग बहरून येतात आयुष्यात….जणू रंगांची रंगपंचमी….

पण…..

निसर्गाने लाल, पिवळे, गुलाबी, जांभळे, निळे नानाविध रंग जरी भरले आयुष्यात तरीही….

प्रतीक्षा असते ती कुंचल्यातून रेखणी करून आलेल्या हिरव्या रंगाची…. मनात मोरपिसारा फुलवून आनंदाची उधळण करणारा….चैत्र पालवी लेवून झाडे, वेली, पाने… मोहरून टाकणाऱ्या हिरवाईची…

चैत्रातील ही हिरवाई म्हणजेच….तावून…सुलाखून गेल्यावरही हर्ष..आनंद…उत्साह…मोद… अन् प्राप्तीचा रंग हिरवा….आनंद हर्ष उल्हासाच्या क्षणांचा रंग हिरवा. हे उत्साहाचे…आनंदाचे हिरवे क्षण म्हणजेच…दुःखांना मागे सारत…पुढे येत असलेली सुखाची कोवळी….तांबूस…हिरवी पालवीच…!

भिक्षेसाठी अर्धनग्न… उन्हातान्हात चटके खात फिरणाऱ्या मुलाला…भिक्षेत हातात एखादक्षणी मिळणाऱ्या वडापाव मिळावा…त्या अनपेक्षित आनंदाने खुलणारी त्याची मुखकळी…गालावर उमटणारे सुखद हास्य अन् डोळ्यात दिसणारी चमक पाहिली की वाटतं….खुशाल वेचून घ्यावे हे हिरवे क्षण….आणि ठेवावे आपल्या मनातील पेटीत कैद करून….कायमचेच….!

जीवाचं रान करून…पोटा पाठीवर ओझं घेऊन…दिवस रात्र मेहनत करणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातील मळा ज्वारीच्या दाण्यांनी फुलून जावा…जणू मोत्यांची रास ओंजळीत पडावी अन् विखरलेल्या मोत्यांच्या चमकीने डोळे दिपून जावेत…तसंच शेत ज्वारीच्या कणसांनी फुलून बहरून यावं…शेतकऱ्याच्या कष्टाचं फळ….मोत्यांच्या रूपाने मिळावं…

बागेतील आंब्याला आलेला मोहर पाहून शेतकरी आनंदित होतो…चेहरा प्रसन्न होतो…यावर्षी तरी आंबा मिळकत देईल आणि घरात सुख येईल…पोरीच्या लग्नात मानाने मिरवता येईल…सोन्याचा एक तरी दागिना तिच्या गळ्यात घालता येईल… ही आशा मनात जागृत होते…उघड्या डोळ्यांनीच तो स्वप्नांचे इमले उभारतो…मनातला आनंद चेहऱ्यावरच्या घामातून पाझरत असतो सर्वांगावर…त्याच्या आनंदाला उधाण येतं…जणू काळ्या ढगांनी सागर किनाऱ्याला वेढून घ्यावे… अन् मनसोक्त बरसावे…हवेच्या वेगाने लाटांना उधाण यावं…लाटांनी किनाऱ्याच्या मिठीत सामावून घ्यावं… तसाच आनंद शेतकऱ्याच्या मनावर बरसतो…चेहरा खुलवतो… ते संतुष्टीचे क्षण हिरवे वेचून घ्यावेत…नेत्रांनी… अन्…कैद करावेत पापण्यांच्या आड…!

काहीच दिवसांपूर्वी जन्मलेल्या घरट्यातील पिल्लाना पक्षिणीने खाऊ भरवावं…. पिल्लांनी चोच उघडून उदर भरून घ्यावं…आपण उपाशी राहिली तरी पिल्लांना खाऊ दिल्याचा आनंद पक्षिणीने घेत पुन्हा एकदा आनंदाच्या भरात हवेत स्वतःला झोकून द्यावं…नव्या खाद्याच्या शोधात…ते क्षण हिरवे…आनंदाचे…दीर्घ श्वास घेत…श्वासात भरून घ्यावेत…जबाबदारीचे भान ठेवण्यासाठी….!

वेचू चला…असेच क्षण हिरवे…मनाला आनंद देणारे…मनसोक्त घेऊ झुला…सुखाच्या हिंदोळ्यावर…साठवुनी आनंदाश्रूनी भरलेल्या नेत्रांमध्ये…भावनांना न्हाऊ घालणारे…आयुष्यभरासाठी ओंजळ भरून वाहणारे…जगण्याचे बळ देणारे…क्षणिक सुखाचे क्षण हिरवे…

 

©[दीपि]

दीपक पटेकर, सावंतवाडी

८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + two =