You are currently viewing मालवणात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेस प्रारंभ

मालवणात भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेस प्रारंभ

मालवण

मालवण शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने मालवण नगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेला पुन्हा एकदा प्रारंभ झाला असून कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन (सॅप) या संस्थेमार्फत ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी प्रयत्न करणारे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आडारी डम्पिंग ग्राउंड येथे या मोहिमेच्या कार्यस्थळी भेट देऊन पाहणी केली. भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीमुळे नागरिकांच्या मागणीनुसारच ही मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेसाठी मालवणच्या नागरिकांनी सॅप संस्थेला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी श्री. कांदळगावकर यांनी केले.

मालवण शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढल्याने कुत्र्यांचा संचार व उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी यापूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष महेश कांदळवावकर व तत्कालीन आरोग्य सभापती आपा लुडबे यांच्या प्रयत्नातून नगरपालिकेने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेतली होती. मात्र महिन्याभरातच ही मोहीम बंद पडली होती

त्यानंतर जागेची व्यवस्था व ठेकेदार संस्था मिळत नसल्याने ही मोहीम बंद होती. मात्र नगरपालिकेने आडारी येथील डम्पिंग ग्राऊंड मध्ये या मोहिमेसाठी जागा निर्माण करून ही मोहीम पुन्हा हाती घेतली आहे. या मोहिमेचा ठेका कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन या संस्थेने घेतला आहे. या संस्थेकडून कुत्रे निर्बीजीकरण कामास प्रारंभ करण्यात आला आहे. या ठिकाणी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या समवेत नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत, माजी नगरसेविका शिला गिरकर यांनी पाहणी केली. यावेळी भाई कासवकर, बाबी जोगी, नरेश हुले, उमेश मांजरेकर, प्रसाद आडवणकर, पराग खोत तसेच सॅप संस्थेचे पशु प्रजनन शास्त्र तज्ज्ञ डॉ. राहुल बोंबटकार, समन्वयक सचिन देऊडकर, डॉ. जितेंद्र यादव व सदस्य उपस्थित होते.

या मोहिमे अंतर्गत प्रारंभी ३४ कुत्रे पकडण्यात आले असून त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया होणार आहे. सध्या मालवण समुद्र किनाऱ्यावरील मोकाट कुत्र्यांना पकडण्यात येत आहे. जाळीच्या साहाय्याने मानवीय पद्धतीने कुत्र्यांना पकडून आडारी येथे आणण्यात येत आहे. कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झाल्यावर त्यांना अँटी रेबीज लसीकरण करण्यात येणार असून त्वचाविकाराबाबत औषधोपचार करण्यात येणार आहेत. यानंतर कुत्र्यांना दोन दिवस निरीक्षणाखाली ठेवून त्यांना अन्न पाणीही देण्यात येणार आहे. तसेच शस्त्रक्रिया झालेल्या कुत्र्यांच्या ओळखीसाठी त्यांच्या कानावर व्ही आकाराचा कट मारण्यात येणार असून त्यांना पुन्हा पकडलेल्या ठिकाणी सोडण्यात येणार आहे.

समुद्र किनाऱ्याबरोबरच बाजारपेठ, एसटी स्टँड परिसर, कॉम्प्लेक्स अशा ठिकाणच्या मोकाट कुत्र्यांनाही पकडण्यात येणार आहे अशी माहिती यावेळी डॉ. राहुल बोंबटकार यांनी दिली. यावेळी महेश कांदळगावकर म्हणाले, मोकाट कुत्र्यांमुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी आग्रही मागणी नागरिकांमधून करण्यात येत होती. म्हणूनच कुत्रे निर्बीजीकरणांची मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली असून शहारत विकास कामे केल्यापेक्षाही निर्बीजीकरण मोहिमेचे काम सुरू केल्याचे आपणास जास्त समाधान आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असेही कांदळगावकर म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty − four =