You are currently viewing मालवण बंदर जेटी परिसरातील स्टॉल हटाव मोहिम थांबवा

मालवण बंदर जेटी परिसरातील स्टॉल हटाव मोहिम थांबवा

सतिश आचरेकर यांची आक्रमक भूमिका

 

मालवण :

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश आचरेकर यांनी मालवण तालुक्यातील बंदर जेटी परिसरात हंगामी स्वरूपात स्टॉल उभारून गेली अनेक वर्ष पर्यटन पूरक व्यवसाय करणारे व्यवसायिकांना नोटिसा बजावत सुरु करण्यात आलेली ‘स्टॉल हटाव’ कारवाई प्रशासनाने तत्काळ थांबवावी. तसेच सुरू असलेल्या या पर्यटन हंगामात कोणत्याही पर्यटन व्यवसायिकांवर कारवाई होता नये, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.

बंदर निरीक्षक अमोल ताम्हणकर यांची आज सायंकाळी सतीश आचरेकर यांनी स्टॉल व्यावसायिकांसोबत भेट घेत आपली भूमिका मांडली. स्टॉल व्यवसायिकांना न्याय मिळावा या व्यतिरिक्त राजकारण करण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही. तसेच अन्य पक्ष ही आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत असे ही आचरेकर यांनी सांगितले. येथील स्टॉल व्यवसायिकांना न्याय मिळणे हेच महत्वाचे आहे.

व्यवसायिकांपैकी अनेकांकडे अन्य कोणताही व्यवसाय नसल्याने कोरोना काळात आर्थिक संकटात हे व्यवसायिक सापडले आहेत. तोक्ते वादळातही अनेक व्यवसायिकांचे नुकसान झाले. मात्र या सर्वांवर मात करून पर्यटक व्यवसायांनी या पर्यटन हंगामात नव्याने व्यवसाय सुरू केला. काहींनी कर्ज काढून दागिने गहाण ठेवून पैसे उभे केले. पावसाळ्यापूर्वी पर्यटन हंगामाचा अखेरचा महिमा असताना व्यावसायिकांचा व्यवसाय बंद झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून हा एकमेव व्यवसाय असल्याने या व्यावसायिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे गरजेचे आहे.

“दुकाने हटवा” याबाबत आपण दिलेल्या नोटिसांचा सहानुभूती पूर्वक विचार करावा. पावसाळ्यापर्यंत या पर्यटन हंगामात कोणतीही कारवाई करू नये. बंदर विभाग अथवा अन्य प्रशासन यांच्याकडून कोणतीही सूचना आल्यास त्याचेही पालन करून हंगामी स्वरूपात व्यवसाय केला जातो. त्यामुळे आपण जसे याआधी व्यवसायिकांना आपले सहकार्य केले. त्या पुढेही असेच सहकार्य मिळावे अशी भूमिका आचरेकर यांनी निवेदनातून मांडली आहे.

या सर्व व्यवसायिकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस ठाम उभी राहील स्थानिक व्यवसायांची रोजीरोटी आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे यात कोणतेही राजकारण आम्हाला आणायचे नाही. या व्यावसायिकांना न्याय मिळवून दिला जाईल, कारवाई निश्चित थांबेल, यासाठी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत याप्रश्नी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करत असल्याचेही आचरेकर यांनी स्पष्ट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा