You are currently viewing तळेरे ते कोल्हापूर महामार्गासाठी 300 कोटींचा ‘डीपीआर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत

तळेरे ते कोल्हापूर महामार्गासाठी 300 कोटींचा ‘डीपीआर’ मंजुरीच्या प्रतीक्षेत

कणकवली

तळेरे ते कोल्हापूर महामार्गासाठी 300 कोटींचा डीपीआर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या धोरणानुसार देशभरातील समांतर महामार्ग एकमेकांशी महामार्गाने जोडण्याचे धोरण राबविले जात आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्ग आणि पुणे-बंगळूर हे महामार्ग तळेरे ते कोल्हापूर या राज्य मार्गाला महामार्गाचा दर्जा देऊन जोडले जाणार आहेत. सुमारे 83 कि.मी. लांबीचा तळेरे ते कोल्हापूर हा प्रस्तावित महामार्ग दुपदरी होणार आहे. त्याचा सुमारे 300 कोटींचा डीपीआर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. अर्थात यासाठी तांत्रिक प्रक्रिया व इतर आवश्यक परवानग्या लक्षात घेता प्रत्यक्षात या महामार्गाचे काम सुरू होण्यास आणखी किमान दोन वर्षांचा कालावधी उलटणार आहे.

या नव्या महामार्गामध्ये गगनबावडा (करूळ) घाटमार्ग 7 मीटरवरून 10 मीटर रुंदीचा होणार आहे. महामार्ग प्रत्यक्षात साकारल्यानंतर सिंधुदुर्ग-कोल्हापूर आणि कोल्हापूर-सिंधुदुर्ग हा प्रवास अधिक सुरक्षित आणि गतिमान होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशभरातील रस्ते वाहतूक आणि दळणवळण यंत्रणा अधिकाधिक गतिमान करण्याचा निर्णय घेत त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली.

जे पूर्वीचे महामार्ग होते त्यांचे चौपदरी, सहापदरी लेनमध्ये रुपांतर करतानाच प्रमुख राज्यमार्गांनादेखील महामार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेत त्या निकषांवर या रस्त्यांची कामे केली जाणार आहेत. त्यामध्ये तळेरे-कोल्हापूर या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणार्‍या प्रमुख राज्य मार्गाला दोन वर्षांपूर्वी महामार्गाचा दर्जा देण्यात आला.

त्यामुळे हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन वषार्ंपूर्वी महामार्ग प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्यात आला. गेली दोन वर्षे या मार्गाची देखभाल दुरुस्ती महामार्ग प्राधिकरणकडूनच केली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या राज्य मार्गाचा महामार्ग कधी होणार याची प्रतीक्षा सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हावासीयांना आहे. या नव्या महामार्गाची सिंधुदुर्ग हद्दीतील लांबी 31 कि.मी. असून कोल्हापूर हद्दीतील लांबी 52 कि.मी. आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा