जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख
“द स्काय इज पिंक”, या चित्रपटातला तो मुलगा, मला सहज आठवला. त्याने एक चित्र काढले होते आणि त्या चित्रातले आकाश त्यांनी गुलाबी रंगाने रंगवले होते. त्यावेळी त्याची शिक्षिका त्याला रागावली होती. म्हणाली होती…
…”तुला कळत नाही का? आकाश निळे असते गुलाबी नसते”
मुलाचे म्हणणे सूर्य उगवतांना आणि सूर्य मावळतांना आकाश गुलाबीच असते ना? पण तरीही त्याने काढलेले ते चित्र रद्द ठरले.
त्याच्या आईने त्याला समजावले आणि म्हटले “तुला आकाश गुलाबी दिसते ना मग तू ते गुलाबी रंगानेच रंगव, बक्षिस नाही मिळाले तरी चालेल.”
मनात पटकन विचार आला की खरंच आपल्या दृष्टीला जे रंग दिसतात तेच खरे. कुणी कोणता रंग हाती घ्यावा ही ज्याची त्याची मर्जी.
कधी वाटतं, आयुष्य म्हणजे रंगपंचमी आहे. जन्माला येतानाच ईश्वराने आपल्यासोबत एक रंग पेटी दिली आहे.
“ता ना पि ही नि पां जा.”
या सप्तरंगाची पेटी घेऊनच आपण या पृथ्वीतलावर आलो. या सप्तरंगांच्या मिश्रणाने आणखी कितीतरी रंगांच्या छटा नकळत आपल्या आयुष्यासोबत झिरपत असतात का?
पानी रे पानी तेरा रंग कैसा? जिसमे मिला दो लगे उस जैसा।
गंगा से जब मिले तो बनता गंगाजल ।बादल से तू मिले तो रिमझिम बरसे सावन।।
जन्मतः कुठलाच रंग नसतो जीवनाला, ते असते पाण्यासारखे नितळ, रंगहीन पण निर्मळ जगण्याच्या प्रक्रियेमध्ये मग रंग भरत जातात. कधी नकळत कधी आपण ते जाणीवपूर्वक भरत राहतो. मग त्यात प्रेमाचा गुलाबी रंग असतो, मनाच्या ताजेपणाचा हिरवा रंग असतो, कधी लाल रंगाचा अंगार असतो, तर कधी शौर्याची नारिंगी छटा असते, भक्तीचा निळा शांत प्रकाश असतो, पांढऱ्या रंगाची स्थिरता असते, तर पिवळ्या रंगातला आनंद असतो. पण कधी द्वेष मत्सर यांचा हेवा दाव्याचा, तीव्र स्पर्धेचा, मान अपमानाचा भयानक काळाभोर रंग व्यापून उरलेला असतो.
कधी अंतरंगात डोकावून पाहिलंय का? कोणता रंग दिसतो? काळाच काळा. मग बाकीचे पेटीतले इतके सुंदर रंग गेले कुठे? कां पण ते कधी हाती घेतलेच नाही? या काळ्या रंगातच रेघोट्या मारत बसलो? असं म्हणतात कावीळ झालेल्या माणसाला सगळे जगचं पिवळे दिसते तसं झालं का आपलं? फक्त या काळ्या रंगाने आपल्यावर कुरघोडी केली का ? इंद्रधनुष्यातील सात रंग कुठे हरवले? आनंदाने नाचणाऱ्या मोराचा निळा रंग, वर्षा ऋतूतील धरेचा हिरवा रंग, बहाव्याचा पिवळा सुखद रंग, पिकलेल्या रानाचा सुवर्ण रंग, याने कां नाही भुलवले आपल्याला?
बरं !!काळ्या रंगातही आपण पाहिला तो कावळा…
…विठ्ठल नाही पाहिला, पाणी देणारा मेघ नाही पाहिला. आपण रंग पाहिला तो अंधाराचा. या काळ्या रंंगाने आपल्या आयुष्याला भीषण केलं, गढूळ केलं. मुळातच कुठला रंग हाती घ्यावा हे ठरवायच्या आधीच या काळ्या रंगाने प्रवेश केला अन मग सारंच काळवंडलं कां?
सुरेश भट यांची एक गझल आठवते.
।। रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा.
गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा.
माणसाच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी,
माझियासाठी न माझा, पेटण्याचा सोहळा.
रंग माझा वेगळा ।।
एका कलंदर माणसाच्या आयुष्याचं व्यक्तिमत्व कसं असतं तर साऱ्या रंगांच्या, दुःखाच्या, अपमानाच्या, फसवणुकीच्या झळा सोसूनही तो सूर्यासारखा तळपतो आणि वेगळ्या रंगाचा सोहळा साजरा करतो आणि म्हणतो रंग माझा वेगळा.
कोणता रंग घेऊ हाती याचे उत्तर जणू या काव्यपंक्तीत सापडतं.
चला तर मग ईश्वराने दिलेली रंगपेटी उघडू या. सप्तरंगांनी आपले जीवनचित्र रंगवूया. हा काळा रंग पार बाजूलाच ठेवूया.
असा रंग हाती घेऊ या की, ज्याने अवघा रंग एक झाला, ही भावना मनावर स्वार होईल.
राधिका भांडारकर