नवी दिल्ली :
कोरोनावरची लस २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. पण त्यासोबत काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल, असे मत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. ठरलेल्या गतीप्रमाणे सगळे घडले तर २०२१ च्या जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनावरची लस येण्याची शक्यता आहे. मात्र, लस आली तरीही काही आव्हानांचाही सामना आपल्याला करावा लागेल, असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.
लस आल्यानंतर सुरुवातीला या लसीची कमतरता भासण्याची शक्यता आहे. आपल्या देशातील लोकसंख्या लक्षात घेता सुरुवातीला सर्व वर्गांपर्यंत लस पोहोचवता येईल की नाही, याबाबतच्या आव्हानाला आपल्याला तोंड द्यावे लागेल, असेही मत गुलेरिया यांनी व्यक्त केले. कोरोनाचा प्रादुर्भाव देशभरात वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. रणदीप गुलेरिया यांना कोरोनावरची लस कधी येईल? असा प्रश्न विचारण्यात आला. सध्याच्या घडीला लस आणण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. जर सर्व गोष्टी ठरल्याप्रमाणे झाल्या तर लस जानेवारी महिन्यापर्यंत येईल. मात्र, सुरुवातीला लसीची कमतरता भासण्याची शक्यता आहे, असे रणदीप गुलेरिया म्हणाले.दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनीदेखील पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आज भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना कोरोना लस जानेवारीपर्यंत उपलब्ध होईल, अशी शक्यता वर्तवली.
