You are currently viewing माणसाचा जन्म कशासाठी..

माणसाचा जन्म कशासाठी..

 

*सर्वप्रथम माणसाने जीवनविद्येचा खालील सिद्धांत नित्य लक्षात ठेवला पाहिजे. ज्याला आपण परमेश्वर असे म्हणतो तो कोणी स्वत:च्या लहरीप्रमाणे वाटेल ते करणारा किंवा वाटेल तसा वागणारा हुकूमशहा नाही.* त्याचप्रमाणे हा परमेश्वर नवस फेडणे वगैरे कुठल्याही स्वरुपात त्याच्या भक्तांकडून लाच घेत नाही किंवा भक्तांच्या नवस करणे वगैरे प्रलोभनाच्या आहारी जात नाही.

*परमेश्वर माणसावर कृपा किंवा कोप करतो, ही कल्पनाच मुळात चुकीची आहे.*

या कल्पनेने लोकांच्या मनात मूळ धरले, याचे मुख्य कारण म्हणजे सर्व धर्मातील पुरोहित वर्गाने लोकांच्या मनात पुरातन काळापासून प्रयत्नपूर्वक ही कल्पना रुजविण्यात यश मिळविलेले आहे.

लोकांनीसुद्धा या कल्पनेचा स्वीकार केला, याला सुद्धा कारण आहे.

*मानवी जीवनात सुखदुःखाचे छोटे मोठे प्रसंग सर्वांवरच येतात, मग तो पंत असो, महंत असो, संत असो, प्रेषित असो किंवा भगवंत असो.* परंतु सामान्य माणसे संकटे आली की हबकून व घाबरून जातात व त्या संकटातून सुटण्यासाठी ते मागचा पुढचा काहीही विचार न करता, त्यांना जो मार्ग दिसेल किंवा कोणी दाखवेल त्या मार्गाने पळत सुटतात. याचा गैरफायदा घेणारे लबाड लोक समाजात टपून बसलेले असतात. हे लबाड लोक, देवाधर्माच्या नावाखाली चमत्कारांच्या दंतकथा समाजामध्ये, त्यांच्या अनुयायांमार्फत किंवा सहकाऱ्यांमार्फत पद्धतशीरपणे प्रसारीत करतात. अज्ञान, अंधश्रद्धा, लोभ व भय यांच्या आधिन झालेले अशिक्षित व सुशिक्षित लोक या चमत्कारांच्या दंतकथांना सत्यकथा समजून या लबाड माणसांच्या आहारी जातात व शेवटी फसतात. लोक फसतात याचे दुसरे कारण असे की, त्यांना त्यांच्या दुःखावर किंवा संकटावर मात करण्यासाठी त्वरित उपाय हवे असतात. उदी-भस्म, अंगारे-धुपारे, गंडेदोरे, आरत्या-धुपारत्या, अंगठी-खडे, यज्ञ-याग, विशिष्ट स्थानाच्या करण्यात येणाऱ्या वाऱ्या, गळ्यात घातलेली लॉकेट, कवच किंवा बिल्ले, असे हे प्रकार केल्याने, आपली सर्व संकटे व दुःखे त्वरित नष्ट होतील अशी भोळसट व खुळचट कल्पना या लोकांची झालेली असते. प्रत्यक्षात असे काही घडत नसते, हे सत्य लोकांना जेव्हां समजते तेव्हां वेळ निघून गेलेली असते. याच्या उलट ज्ञान देऊन लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा व भयगंड दूर करणारे संत सज्जन समाजात असतात. चुकीचे मार्गदर्शन करणारे लबाड लोक गल्लोगल्ली आढळतात, परंतु अचूक मार्गदर्शन करणारी संत सज्जन माणसे शोधावी लागतात. वास्तविक, परमेश्वर कृपा किंवा कोप कोणावरही करीत नसतो, हे सत्य लोकांना प्रथम उमजले पाहिजे. *मानवी जीवनात ९०% समस्या,संकटे व दुःख माणूसच स्वत:च्या अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, लोभ व असूया यांच्या आहारी जाऊन स्वत:च निर्माण करीतअसतो.* स्वत:च समस्या निर्माण करावयाच्या व त्या सोडविण्यात सर्व आयुष्य घालवायचे, असा विपरीत प्रकार सर्वत्र घडत असतो. *याच्यातून मार्ग काढण्याचा सोपा उपाय म्हणजे सज्जन माणसांच्या सहवासात राहून व त्यांचे अचूक मार्गदर्शन घेऊन ज्ञान व शहाणपण मिळविणे हा होय.* थोडक्यात, *आपणच आपल्या बऱ्या वाईट कर्मांच्या द्वारे स्वत:वर कृपा किंवा कोप करीत असतो.* या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे, *’मानवी शरीर’ हे परमेश्वरनिर्मित आश्चर्यकारक व विलक्षण असा एक कॉम्प्युटर म्हणजे संगणक आहे.* आपण जे चुकीचे किंवा योग्य फिडींग करू त्याप्रमाणे मानव निर्मित कॉम्प्युटर कडून आपणाला चुकीचे किंवा योग्य रिझल्टस् मिळत असतात. अगदी त्याचप्रमाणे *मानवी शरीर या परमेश्वर निर्मित कॉम्प्युटरला आपण इष्ट किंवा अनिष्ट कर्मांच्या द्वारे जे फिडींग करू त्याचप्रमाणे आपल्याला इष्ट किंवा अनिष्ट रिझल्टस् प्राप्त होतात. शुभ किंवा अशुभ चिंतन करणे, शुभ किंवा अशुभ इच्छा करणे, शुभ किंवा अशुभ बोलणे आणि शुभ किंवा अशुभ करणे या स्वरुपात आपण मानवी शरीराच्या कॉम्प्युटरला इष्ट किंवा अनिष्ट फिडींग करीत असतो व त्याचप्रमाणे आपल्याला इष्ट किंवा अनिष्ट प्रतिसाद, सुखदुःखाच्या स्वरुपात या कॉम्प्युटरकडून मिळत असतो.* या मानवी शरीराच्या विलक्षण कॉम्प्युटरचे सर्व कार्य अत्यंत पद्धतशीरपणे, अचूकपणे, गुप्तपणे व व सहजपणे, चालत असते. या मानवी शरीराच्या निसर्गनियमानुसार कॉम्प्युटरच्या वरील कार्यात परमेश्वर कुठल्याही प्रकारे ढवळाढवळ किंवा हस्तक्षेप करीत नाही.

*थोडक्यात,परमेश्वर माणसावर कृपा किंवा कोप करीत नसून केवळ माणूसच स्वत:च्या शुभ किंवा अशुभ कर्मांच्या द्वारे स्वत:वरच कृपा किंवा कोप करीत असतो.*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा