You are currently viewing वेगळं व्हायचंय मला

वेगळं व्हायचंय मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच….. लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य कवी लेखक दीपक पटेकर यांचा अप्रतिम लेख

आनंदाने भरलेल्या आयुष्यावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळावा… आणि नजरेसमोर दूर दूर पर्यंत सगळं काही धूसर दिसावं..कालपर्यंत फुलांच्या सड्याने सजलेली…हिरव्यागार तृणांच्या काठाने नटलेली वाट आज एका क्षणात रुक्ष वाटावी अशीच परिस्थिती होते जेव्हा आपलं जवळचं…ज्याला आपण आपलं आयुष्य…भविष्य मानून जीवनाची एक नवी सुरुवात केलेली असते तिनेच मागेपुढे न पाहता क्षुल्लक कारणांवरून सांगावं ….*वेगळं व्हायचंय मला..*
जीवन..परमेश्वराने दिलेलं वरदान, त्यात सुख दुःख ही येतंच असतात. जशी दिवसा मागून रात्र येते….ऊन ओसरून काळोख होतो…निशेच्या कुशीत विसावतो अगदी तसंच जीवनात सुख दुःख येत असतंच. आयुष्यातील येणाऱ्या प्रत्येक संकटांना धैर्याने तोंड देऊन जो तरतो तोच जीवनात खराखुरा विजेता बनतो. फुलासारखे कोमल बालपण मुक्तपणे जगून प्रत्येकजण यौवनात पाऊल ठेवतो….अलीकडच्या पुढारलेल्या युगात आणि शिकून सवरून सुशिक्षित, सुसंस्कृत झालेल्या काळात क्वचितच मुले घरच्यांच्या पसंतीने आपला जीवनसाथी निवडतात…बरीचशी मुले आपल्याच पसंतीने आपल्याला शोभेल, साजेल आणि आपले गुणधर्म, स्वभाव, आवडीनिवडी जुळतील असा जीवनसाथी निवडतात….लग्नकार्य पार पडतं….काही दिवस..महिने…वर्षे सोबत काढल्यानंतर मात्र काहींचे स्वभाव…आवडी त्यांनाच खटकू लागतात….आपलं सूत नीट जुळत नाही…असा समज करून रोज उडणारे खटके…भांडण….यावरून कोणताही दुसरा, तिसरा पर्याय न शोधता, एकमेकांच्या भावना…अपेक्षा समजून न घेताच ती जोडपी शेवटचाच पर्याय म्हणून वेगळं होण्याचा निर्णय असा काय घेतात की बालपणी बाहुला-बाहुलीचं लावलेलं लग्नच तोडायचं…. किंबहुना काहीजण तर एखाद्या बाळाचे आई-बाप बनतात परंतु त्या बाळाची देखील त्यांना फिकीर नसते की त्याच्या आयुष्याचा विचार… *खरंच… एवढं सोपं असतं का वेगळं होणं?*
जोड्या स्वर्गात बनतात वगैरे हे सगळे जुन्या लोकांचे समज… परंतु विज्ञान कितीही बदललं..प्रगत झालं तरी जुने उपचार आणि आचार विचार यावरच विज्ञानाची प्रगती येऊन शेवट होतो…विचार जरी जुने असले तरी ते विचारपूर्वक मांडलेले असायचे….”एकदा का लग्न होऊन मुलगी सासरी गेली की जाताना तिची त्या घरी वरात जाईल…अन त्या घरातून बाहेर निघेल ती तिची अंत्ययात्रा…” हे समज खुळे असतील पण त्यात तत्त्व होती आणि मुलींनी ज्या घरात लग्न करून जायचं ते घर स्वतःचं समजून त्या घराला स्वर्ग बनवायचं….अशी शिकवण असायची. म्हणून तर पूर्वीच्या काळात संसार केवळ टिकत नव्हते तर ते फुलायचे…मोहरायचे…संसार वेलींवर गोड, रसाळ फुले…फळे यायची. त्या फळांमध्येही माधुर्य असायचे…संस्कारांची शिदोरी घेऊनच पुढची पिढी वाढायची…जुन्या काळात कुटुंबाची वेगळी शिस्त होती…एकत्र कुटुंब असायची, भले वेगवेगळे हात कमवत होते पण चूल एकत्रच थाटायचे…एकत्र बसून जेवण…पंगती उठायच्या. बाहेर, शहरात शिकलेली पिढी हळूहळू स्वतःमध्ये बदल घडवत गेली…लग्न झालं की एकत्र कुटुंबात राहणे जमत नाही अशी कारणे देत वेगळं राहण्याची भाषा करू लागली. संसार तुटू नये म्हणून वडीलधारी व्यक्ती त्यालाही सहमती देऊ लागली…संसार वेगळा झाला…घरही वेगळं झालं तरी देवघर…सणसोहळे एकत्र व्हायचे…काहींना त्याचाही त्रास व्हायचा.. आणि एकत्र कुटुंबात होणारे सण सोहळे आपापल्या घरी होऊ लागले…नाती दुरावत गेली…मने दुभंगली जाऊ लागली. त्यामुळे जुन्या पिढीचे संस्कार हळूहळू कालबाह्य होऊ लागले.
आज केवळ व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर नवीन पिढी बरबाद होत चालली आहे. मुळात ज्या घरात लहानाची मोठी होतात त्याच घरात संस्कारांची योग्य शिदोरी बांधून मिळाली तरंच नव्या पिढीला चांगले वळण लागते अन्यथा एकदा का वाट भरकटली की मुले मुली स्वातंत्र्य म्हणून रात्री अपरात्री बाहेर राहू लागतात…रात्र पार्टी आणि मौजमजा म्हणजे आयुष्य… अशा नको त्या सवयी मुळे लग्नानंतरचे आयुष्य म्हणजे त्यांना बंदिवान वाटू लागते. लग्नाच्या आधी आपल्या प्रियकरासोबत देखील मौजमजा करतात परंतु लग्नानंतर परक्या घरी गेल्यावर मौजमजेवर नियंत्रण येते आणि तिथून धुसफूस सुरू होते. बऱ्याचदा लग्नाच्या पूर्वी आपला प्रियकर, प्रेयसी म्हणजे सर्वोत्तम वाटत असतो…परंतु लग्न झाल्यावर नवऱ्याचे बदललेले विचार किंवा संसारात पडल्यावर पेलाव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्या आदी मुळे नवरा काही वेळा आपल्यात बदल करून घेतो व पत्नीला ते अपेक्षित नसते. अशावेळी एकमेकांना समजून घेऊन संसार रथ हाकण्यापेक्षा वारंवार वाद होतात, भांडणे होतात त्यातून अबोला धरला जातो आणि शेवटी ताणलेल्या संबंधांचे पर्यवसान नाते तुटण्यात होते…तिथेच वेगळं होण्याचे सूर आळवू लागतात आणि पर्याय न शोधता नात्यांची ताटातूट होते.
पाण्यावर कितीही जोराने काठी मारली असता ते दुभंगते…परंतु काहीवेळाने लहरी शांत झाल्या की पुन्हा एकरूप होते….आणि संथ वाहते…जीवनाचे..नात्यांचे देखील तसेच आहे…संयम आणि सहनशीलता असल्यावर भांडण, तंटे…वाद विवाद झाले तरी…नाते न तुटता अभंग राहू शकते…केवळ एक दुसऱ्याला समजून घेण्याची मानसिकता मनात असावी लागते. एकाने तोडलं तर दुसऱ्याने ते जोडायचे…एकाने जोडले तर दुसऱ्याने सांभाळायचे…जपायचे असते. शेवटी एक दुसऱ्याचे सुख हे नाते अभंग, अभेद्य राखण्यात आहे.
वेगळं होणं म्हणजे आजकाल खेळ बनला आहे. जेव्हा पती काम करून कमाई करायचा आणि पत्नी घरसंसार सांभाळायची त्यावेळी वेगळं होण्याची हिम्मत होत नव्हती. कारण वेगळं व्हायचं म्हटलं तरी खायचं काय? आणि पतीने वेगळं व्हायचं म्हटलं तरी घर सांभाळायचे कसे? असे प्रश्न उभे राहत होते. परंतु जसजशी परिस्थिती बदलत गेली, स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागल्या तशा काहींच्या मनात “मी सुद्धा कमावते, मलाही अधिकार आहेत, मी कोणाच्या जीवावर जगत नाही”…असे विचार येऊ लागले…त्यातून दोन्ही कमावती असताना छोट्या छोट्या कारणांवरून उडणारे खटके आणि सोशल मीडिया सारख्या माध्यमातून जुळणारे नवे नाते…मैत्री संबंध यामुळे संशय नावाचे नवे वादळ अनेक जोडप्यांच्या संसारात येऊ लागले… त्या मैत्रीच्या नात्यात खरी मैत्री देखील जाळून खाक होत गेली आणि संसार तुटू लागले…काहीवेळा सोन्यासारखा संसार असताना व्हाट्सएपच्या, फेसबुकच्या ओळखी…ज्या एकमेकांना पाहिलेल्याही…समजून घेतलेल्याही नसतात…जिथे आंतरिक ओढ उत्पन्न होऊ लागली…वासनेच्या आहारी जाऊन सुखात असलेल्या संसाराला काळे फासून नवा संसार थाटण्याचे स्वप्न उराशी घेत मागचा पुढचा काहीही विचार न करता….अगदी छोटी मुलं असतानाही त्यांना वाऱ्यावर सोडून दुसरा संसार थाटण्यासाठी….. “मला वेगळं व्हायचंय…” असं सांगण्यापर्यंत मजल गेली.
समाजात पसरलेली ही विकृती पाहता मनात प्रश्न उभा राहतो….”खरंच, गरज आहे का वेगळं होण्याची?”
अग्नीला साक्षी ठेवत देवाच्या कृपेने सप्तपदी घेत ज्याला आपला जीवनसाथी म्हणून स्वीकारलंय त्याला लग्नानंतर आपण समजून घेऊ शकत नाही का? कधीतरी आपला हट्ट मागे ठेऊन आपल्या जोडीदाराची छोटीशी इच्छा पूर्ण केली आणि त्याला समाधान दिलं तर त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदात आपल्याला समाधान भेटणार नाही का? आणि आपल्या जीवनसाथीच्या समाधानात आपण सुख शोधू शकलो नाही तर त्या एक होण्याला…सात फेरे घेऊन एकत्र राहण्याचे वचन देण्याला आणि घरात येताना जमिनीवर स्वतःच्या पायांनी उमटवलेल्या लक्ष्मीच्या पावलांना काही अर्थ राहणार का? आपल्या आयुष्याचा जोडीदाराला कायम सोबत करण्याचे वचन दिले असताना कुठल्यातरी लहानसहान गोष्टीसाठी…काही क्षणांसाठी आयुष्यात आलेल्या कुणासाठी तरी आपण आपलं सुंदर आयुष्य दुःखाच्या खाईत लोटायचं का?
डोंगरावर हवा छान असते…सुखद गारवा भेटतो म्हणून माणूस कायमस्वरूपी डोंगरात जाऊन राहत नाही…कारण तिथे हवा गार असते परंतु हिंस्त्र श्वापदे देखील राहतात…जी जगणे मुश्किल करून सोडतात.. एकमेकांचे सुख आणि समाधान कशात आहे याचा शोध घेऊन आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच *”वेगळं व्हायचंय मला”* असं म्हणण्याची आणि वेगळं होण्याची वेळ कोणावरही येणार नाही…आवश्यकता भासणार नाही…शेवटी रथ जरी घोड्यांच्या रूपाने परमेश्वर हाकत असला तरी…त्या रथाची दोन्ही चाके म्हणजे पती-पत्नी… जोपर्यंत ही रथाची दोन्ही चाके एकत्र चालतील तोपर्यंत वेगळं होण्याची गरज भासणार नाही..केवळ संसाररथ योग्यरित्या चालण्यासाठी दोघांचीही मने एकमेकांच्यात अशी काय गुंतली पाहिजेत…की तो गुंता काही केल्या सुटता नये…तरच आयुष्यात कधीही कोणीही म्हणणार नाही…*वेगळं व्हायचंय मला*!!

©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी
सिंधुदुर्ग, ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा