मालवण :
मालवण शहराचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी आपल्या “वैयक्तिक” कारणास्तव शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र करण्याची घोषणा करून काही दिवसांपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र यानंतर शिवसेना खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर महेश कांदळगावकर पुन्हा एकदा शिवसेनेच्या उपक्रमात सक्रीय झाल्याचे मंगळवारी दिसून आले. शिवसेनेच्या वतीने मंगळवारी रेवतळे येथे आरसीसी पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आली. या कार्यक्रमाला महेश कांदळगावकर यांनी उपस्थिती दर्शवली. तर मालवण तालुक्यातील एका माध्यमिक शाळेत नवोदय परीक्षेसाठी मुलांची बोगस प्रवेश प्रक्रिया दाखवली जात असल्याच्या प्रकारची शिवसेना आणि युवा सेनेने पोलखोल केली. यावेळी देखील महेश कांदळगावकर उपस्थित होते. त्यामुळे सक्रिय राजकारणापासून दूर जाऊ पाहणाऱ्या महेश कांदळगावकर यांचे मतपरिवर्तन करण्यात शिवसेना आमदार, खासदार यशस्वी ठरल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महेश कांदळगावकर यांच्या चाहत्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.