You are currently viewing संकल्प सिध्दीचे गुपित

संकल्प सिध्दीचे गुपित

 *विश्वप्रार्थनेत सर्वांसाठी प्रार्थिलेले आहे तर त्याचे महत्त्व काय व सर्वांसाठी प्रार्थना का करायची ?*

 

*विश्वप्रार्थनेत ‘सर्वांना’ हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे, याचे कारण सर्वसाधारण माणसे फक्त स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात. फक्त स्वतःचा विचार केल्यामुळे व त्याप्रमाणे आचरण घडत राहिल्यामुळे इतरांशी संघर्ष निर्माण होण्याचे प्रसंग वारंवार उद्भवतात. या कुपमंडुक वृत्तीमुळे माणसामाणसात दुरावा निर्माण होतो. ‘आपण भले आणि आपले घर बरे, इतरांशी आपणाला काहीही कर्तव्य नाही’ अशा संकुचित वृत्तीमुळे, मुळांतच असलेली स्वार्थपरायण बुद्धी अधिकच बळावत जातें. दिवसेंदिवस माणसातील माणुसकीच लयास जात आहे. माणूस ‘माणूस’ राहिलेला नाही. त्यामुळेच जगात विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या समस्या सोडविण्यासाठी विविध मार्ग चोखाळता-चोखाळता मानवजातीची दमछाक झालेली आहे व होत आहे. या समस्या सोडविण्यासाठी अचूक मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात जीवनविद्येचे खालील सिद्धांत अत्यंत महत्त्वाचे आहेत :*

🎯 *१) इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे, या सत्याची जाणीव ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.*

🎯 *२) इतरांना सुख देण्याचा प्रयत्न कराल तर सुख तुमच्या घरी पाणी भरेल, याच्या उलट दुसऱ्यांना दुःख देत राहाल तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल*.

🎯 *३) आनंद वाटता-वाटता आनंद लुटण्यासाठीच माणसाचा जन्म आहे.*

🎯 *४) सर्व सुखी तर आपण सुखी इतर दुःखी असतील तर आपण सुखी होऊ शकत नाही.*

*जीवनविद्येचे वरील सिद्धांत लक्षात घेतले की मगच विश्वप्रार्थनेतील ‘सर्वांना’ या शब्दाचे महत्त्व लक्षात येईल. आपल्या कुटुंबातील एक माणूस जरी आजारी किंवा दुःखी झाला तरी कुटुंबातील इतर सर्वांचे स्वास्थ्य बिघडते व सुख हरपते. याच्या उलट कुटुंबातील सर्व माणसे सुखी व आनंदी असतील तर नित्य आनंदाची दिवाळी कुटुंबातील सर्वांना अनुभवता येते. जी गोष्ट कुटुंबाची तीच गोष्ट समाजाची, राष्ट्राची व विश्वाची आहे, म्हणूनच जीवनविद्या सांगते.*

🎯 *माणसांनी माणसांबरोबर माणसासारखे वागून परस्परांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे, हीच आहे भक्ती-उपासना,तेच आहे भजन-पूजन आणि तोच आहे खरा धर्म.*

*या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज सांगतात,*

*हे विश्वची माझे घर | ऐसी मती जयाची स्थिर |*

*किंबहुना चराचर आपणची जाहला ।।*

 

*त्याचप्रमाणे तुकाराम महाराज सांगतात,*

*१)जगी जगदीश शास्त्रे बोलती सावकाश*

*जनी जनार्दन सांगती पुराणे ।।*

*२) जेथे देखे तेथे तुझीच पाऊले । त्रिभुवन संचले विठ्ठला गा ।।*

🎯 *हेच वेगळ्या शब्दात सांगायचे म्हणजे सर्वात सर्वेश्वर आहे आणि सर्व सर्वेश्वरात आहे, या सत्याची लोकांना जाणीव देण्यासाठी ‘सर्वांना’ हा शब्द विश्वप्रार्थनेत आहे.*

🎯 *तात्पर्य, यथाशक्ती इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात सर्वच सुखी होतात, म्हणूनच विश्वप्रार्थनेत सर्वांसाठी प्रार्थना केलेली आहे. त्याचप्रमाणे ही विश्वप्रार्थना सर्वांसाठी म्हणायची असते, याचे दुसरे कारण असे की, सर्वांसाठी प्रार्थना आपण करतो तेव्हा सर्वांमध्ये आपण असतोच. म्हणजे एका बाजूने विश्वप्रार्थना आपण सर्वांसाठी करतो तर दुसऱ्या बाजूने ती आपण आपल्यासाठीसुद्धा करत असतो. थोडक्यात, विश्वप्रार्थनेत लोकांना कुपमंडुक वृत्ती सोडून इतरांचा विचार करण्यास प्रवृत्त केलेले आहे. जे दुसऱ्यांचा विचार करीत नाहीत, त्यांच्याकडे इतर लोक तर सोडाच पण कुत्रासुद्धा ढुंकून पहात नाही. याच्याउलट, जे दुसऱ्यांचा विचार करतात त्यांचा इतर लोक आदरपूर्वक व आवर्जुन विचार करतात. तात्पर्य, स्वार्थ व परार्थ साधून परमार्थ साध्य करण्याचा उत्तम उपाय म्हणजे यथाशक्ती इतरांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करणे हा होय. प्रार्थना करणे हा त्या प्रयत्नांचाच एक भाग आहे. दुसरा मुद्दा असा की, सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जी माणसे स्वत:ला धार्मिक समजतात ते फक्त कर्मकांड करण्यातच धार्मिकता आहे असे समजतात. कर्मकांड करणारी ही माणसे अपवाद वगळता दैनंदिन जीवनात खोटे व्यवहार करताना दिसतात. यापैकी बरेच लोक एका बाजूने कर्मकांड करीत असतात तर दुसऱ्या बाजूने पैसा मिळविण्यासाठी वाटेल त्या थराला जातात.*

🎯 *जीवनविद्या सांगते, कर्मकांड करण्यात खरी धार्मिकता नसून माणसाने माणुसकी जोपासण्यात खरी धार्मिकता आहे.*

*या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत चिंतनीय आहे.*

🎯 *देवाचे दिव्यत्व, धर्माची धार्मिकता व माणसाचे माणूसपण या तीन गोष्टींचा त्रिवेणी संगम ‘माणुसकी’ या प्रेरणेत आहे. म्हणून माणुसकीला जो जागला त्यानेच देव पूजला, त्यानेच धर्म पाळला व तोच माणूस या पदाला शोभला.*

🎯 *या संदर्भात प्रत्येक माणसाने एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवल पाहिजे ती ही की, त्याला मिळालेले जीवन हे त्याचे एकट्याचे नसून ते त्याच्या कुटुंबाचे, समाजाचे, राष्ट्राचे व विश्वाचे आहे. परंतु याची जाणीव बहुसंख्य लोकांना नसते. उलट ही माणसे बिनदिक्कत सांगतात की,*

*It is my life and others have no right to interfere with my life.*

*वास्तविक, ही त्यांची धारणा संपूर्ण चुकीची तर आहेच पण ती सर्वांनाच घातक ठरू शकते. माणूस हा समाजात राहणारा प्राणी आहे आणि तो जीवन जगत असताना त्याला समाजाकडून विविध प्रकारे लाभ होत असतो. माणसाचे संपूर्ण जीवनच समाजाच्या आधारावर उभारले जाते, या सत्याची जाणीव ठेऊन माणसाने जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे.*

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै*🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + ten =