You are currently viewing पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून

पूर्ववैमनस्यातून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून

इचलकरंजी शहरातील घटना ; तिघा संशयित आरोपींना अटक

इचलकरंजी शहरातील वखारभाग परिसरात पूर्ववैमनस्यातून
दगडाने मारहाण करुन उदय गवळी या पोलीस
रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा निर्घृणपणे खून करण्यात आला. रविवारी रात्री ही घटना घडल्यानंतर अवघ्या 24 तासात शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी अजय उर्फ नवनाथ बापू काशिद , आदित्य दीपक रसाळ व आदम उर्फ संब्या महंमद मुजावर या तिघा संशयित आरोपींना अटक केली
असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली
असल्याची माहिती शिवाजीनगर
पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी पञकारांना दिली.

इचलकरंजी शहरातील वखारभाग परिसरात असलेल्या रिकाम्या जागेतील झाडाझुडुपांमध्ये आज सोमवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या २५ वर्षीय युवकाचा मृतदेह पोलिसांना मिळून आला.यावेळी मृतदेहाच्या हातावरील गोंदण तसेच इतर शरीरावरील खूण नातेवाईकांनी ओळखल्याने रेणुकानगर झोपडपट्टी येथील उदय गवळी याचाच सदरचा मृतदेह
असल्याचे उघडकीस आले. दगडाने मारहाण करुन तसेच कोणत्या तरी हत्याराने वार केल्याने पोलीस
रेकॉर्डवरील उदय गवळी या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याचे तपासात आढळून आले. त्या अनुषंगाने पोलिसांनी गतीने तपास करत संशयितांचा शोध सुरु केला. दुपारच्या सुमारास अजय काशिद, आदम मुजावर व आदित्य रसाळ या तिघा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे पोलिसांनी केलेल्या असून चौकशीत तिघांनीही उदय याचा
पूर्ववैमनस्यातून
खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरिक्षक महादेव वाघमोडे यांनी पञकारांना दिली.या खुनाच्या घटनेत
संशयित तिघेही आरोपी हे एका बारमधून दारु पिऊन बाहेर पडले. त्याचवेळी उदय गवळी दुसर्‍या बारमधून दारु पिऊन बाहेर पडताना दिसला. तिघांनी त्याला बोलावून वखारभाग परिसरातील एका रिकाम्या जागेत घेऊन गेले. उदय याने महिन्याभरापूर्वी त्याच्या आजीला फरशीने मारहाण केली होती.याबाबत संशयितांनी तू तुझ्या आजीला का मारलेस अशी विचारणा केली. त्यावर उदय याने आजी माझी आहे, मी मारेन नाहीतर काहीही करेन, तू कोण विचारणारा असे म्हणत काशिद याला ढकलून दिले. त्यातच दीड वर्षापूर्वी काशिद व गवळी यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्या रागातून तिघांनी उदय गवळी याच्यावर हल्ला करत त्याला
दगडाने व हत्याराने मारहाण केली.यावेळी डोक्याच्या पाठीमागील बाजूस वर्मी घाव बसल्याने उदय जागीच कोसळला. त्यानंतर तिघांनी त्याला मारहाण केल्याने उदय याचे डोके जमिनीत रुतले होते.या हल्ल्यानंतर तिघेही घटनास्थळावरुन फरार झाले. चौघेही मित्र असून त्यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आदम मुजावर याच्यावर चोरीचा तर आदित्य व अजय याच्यावर मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. मयत उदय याच्यावरही मारहाणीसह चार गुन्हे दाखल आहेत. उदय याच्या पश्‍चात आई, आजी व भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधिक्षक बाबुराव महामुनी, गावभागचे पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार आदींनी भेट देऊन पाहणी केली. तर श्‍वानपथक जागेवरच घुटमळत राहिले.घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eighteen =