You are currently viewing आज तू गोतावळा दाखव मला

आज तू गोतावळा दाखव मला

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य गझलेतील शिवाजी अशी ओळख असणारे अहमनगर येथील डॉ.शिवाजी काळे यांची अप्रतिम गझल

आज तू गोतावळा दाखव मला
एकटी पडलीस की आठव मला

मी तुझ्या खेळातले प्यादे जणू
चाल फसली तर पुढे सरकव मला

वाढप्याला दोष देऊ मी कसा
माहिती नाही तुपाची चव मला

जन्मभर जागाच आहे मी चिते
शांत चित्ताने अता झोपव मला

मर्त्य स्वप्नाला असे सजवू नका
ओळखू येणार नाही शव मला

फक्त वाटाड्या म्हणूनच हात धर
वाट सरल्यावर परत पाठव मला

मी बरा आहे मनाने कोरडा
मानवत नाही कुणाचे दव मला

आजवर मी झूल मागितली कुठे
प्रेत पुरताना तरी रंगव मला

कबुतराचे रक्तरंजित पीस मी
शांतते…जमलेच तर वाचव मला

डॉ. शिवाजी काळे

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 16 =