सामाजिक कार्यकर्त्याने प्रश्नाच्या तळाशी जाऊन तो मुळापासून सोडवावा
महिला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतीमधील सूर
सिंधुदुर्गनगरी
सामाजिक कार्यकर्त्याने समस्येच्या तळाशी जाऊन त्याचा शोध घ्यावा आणि तो प्रश्न मुळापासून सोडवला पाहिजे असा सूर जिल्ह्यातील 5 महिला समाजिक कार्यकर्त्यांच्या मुलाखतीमध्ये समोर आला. जागतिक समाजकार्य दिन व सप्ताहाच्या निमित्ताने मुंबई विद्यापिठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्रामध्ये खास मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते.
दरवर्षी मार्च महिन्यातील तिसऱ्या आठवड्यातील मंगळवार हा दिवस जागतिक समाजकार्य दिन म्हणून साजरा केला जातो. या वर्षाचे समाजकार्य दिनाची थीम को बिल्डींग न्यू इको सोशल वर्ल्ड : लिविंग नो वन बिहाइंड हे होते. या थीम प्रमाणेच समाजातील कोणताही घटक मागे राहू नये यासाठी काम करण्याऱ्या जिल्ह्यातील धडाडीच्या कार्यकर्त्या निरामय विकास केंद्र, कोलगाव संचालिका वंदना करंबेळकर, गोपुरी आश्रम, कणकवली संचालिका अर्पिता मुंबरकर, माऊली महिला मंडळ, शिरोडा संस्थापक अध्यक्षा रेखा गायकवाड, जेष्ठ समुपदेशक, मालवण चारुशीला देऊलकर तसेच जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, कुडाळ कमलताई परुळेकर यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाजकार्य विभागाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस समाजकार्याच्या विषयी माहिती देणाऱ्या भित्तीपत्रकाचे अनावरण वंदना करंबेळकर याच्या हस्ते करण्यात आले. समाजकार्यकर्ता म्हणून समाजात काम करताना विद्यार्थायाकडे शिस्त आणि वाचन ह्या गोष्टी असणे फार गरजेचे आहे असा मोलाचा संदेश श्रीमती करंबेळकर यांनी दिला. अर्पिता मुंबरकर म्हणाल्या, आपल्याकडे इच्छाशक्ती आणि संवेदनशीलता असेल तर सोशल वर्कर हा Multitasker म्हणून हि काम करू शकतो. विद्यार्थ्यासोबत त्यांनी होळीनिमित्त ‘व्यसनाची होळी’ हा अनोखा उपक्रमदेखील घेतला. आपल्यातल्या एखादी वाईट वृत्ती, व्यसन एका कागदावर लिहून त्या कागदाला होळीत टाकण्यात आले. व्यसन करणार नाही अशी प्रतिज्ञा ही घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी समाजकार्य करत असताना संयम, जिद्द आणि सातत्य ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे सामाजिक बदल घडला पाहिजे यासठी आपण झटले पाहिजे आणि बदलाची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे, अशे रेखा गायकवाड यांनी सांगितले. चारुशीला देऊलकर यांनी समुपदेशन करणे म्हणजे नेमके काय आहे याबद्दल सांगताना समुपदेशन करणे म्हणजे फक्त सल्ला देणे असे होत नाही तर समुपदेशनाची व्याप्ती आणि मह्त्व त्यांनी विद्यार्थी समाजकार्यकर्त्याला समजावून सांगितले. कमलताई परुळेकर म्हणाल्या, विद्यार्थी समाजकार्यकर्त्यांनी कधीही कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये असे सांगितले. तरुणांनी लोकशाही टिकवण्यासाठी राजकारणात यावे. चांगले समाजकारण करण्यासाठी आपल्याला राजकारणात गेले पाहिजे तिथेही आपल्याकडे हजरजबाबीपणा असणे गरजेचे आहे.
जागतिक समाजकार्य दिनानिम्मित MSW च्या दोन्ही वर्गातील विद्यार्थ्याकरिता भारतातील सुधारक महिला समाजसेविका या विषयावरील पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये प्रियंका कांबळे, प्रथम क्रमांक, सुर्ष्टी तावडे, द्वितीय क्रमांक तर मेघा वजराटकर तृतीय क्रमांक तर उतेज्नार्थ म्हणून वनिता जंगले आणि वैष्णवी कदम हिला परितोषित देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. माया रहाटे, प्रा. अमर निर्मळे, प्रा. पुनम गायकवाड यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग उपकेंद्र प्रभारी संचालक श्रीपाद वेलींग व रत्नागिरी उपकेंद्र प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांचे मार्गदर्शन लाभले.