You are currently viewing सावंतवाडी थाटात पार पडले १६ वे विभागीय कवयित्री संमेलन

सावंतवाडी थाटात पार पडले १६ वे विभागीय कवयित्री संमेलन

आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व को.म.सा.प.सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

 

सावंतवाडी :

सावंतवाडी येथे आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद, सावंतवाडी शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले १६ वे विभागीय कवयित्री संमेलन आज दिनांक ०३ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहामध्ये थाटात पार पडले. १६ व्या कवयित्री संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पैठण, जिल्हा औरंगाबाद येथील साहित्यिका डॉ.उर्मिला चाकूरकर तर उद्घाटक पदी कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर या उपस्थित होत्या. सावंतवाडी येथे पार पडलेल्या विभागीय कवयित्री संमेलनाला राज्याच्या विविध ठिकाणाहून कवयित्रींनी भाग घेतला होता. संध्याकाळी ५.०० वाजता सुरू झालेले सम्मेलन तब्बल तीन तास चालले. सुंदरवाडीच्या रसिक प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहत व कवयित्रींनी सादर केलेल्या कवितांना दाद देत कार्यक्रमात रंगत आणली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस साहित्यिका उषा परब यांनी प्रस्तावना करून उद्घाटक नमिता कीर यांना यांना मनोगत मांडण्याची विनंती केली. उद्घाटक कवयित्री नमिता कीर यांनी आपल्या मनोगतात नवोदित कवींनी पर्यावरण, आपल्या सभोवतालची परिस्थिती, कौटुंबिक व सामाजिक जीवनातील स्थित्यंतरे यावर आवर्जून कविता केल्या पाहिजेत, त्याच प्रमाणे कविता लिहिण्यासाठी कवीकडे प्रतिभा असावी लागते, केवळ शब्दांची जुळवाजुळव म्हणजे कविता नाही, तर अंतकरणातून लय मिळाली तरच कविता निर्माण होते. पूर्वी लावणी, ओव्या हे काव्य प्रकार प्रचलित होते, परंतु १९६० च्या दशकापासून आधुनिक कविता लिहिण्यास सुरुवात झाली. कवी केशवसुत, मर्ढेकर यांच्यापासून कवितेचे रूप बदललेअसे सांगत अनुभव घेऊन चिंतन करून वैशिष्ट्य पूर्ण कविता लिहा, असे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाची दखल घेऊन प्रसिद्धी देतात यासाठी सावंतवाडीच्या पत्रकारांचे विशेष आभार मानले. यानंतर आरती मासिक ने घेतलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना डॉ.जी.ए. बुवा, जिल्हा सचिव गावडे सर व कोमसाप तालुकाध्यक्ष संतोष सावंत यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलनाने कविता वाचनाच्या कार्यक्रमास सुरुवात झाली.

सावंतवाडी येथील कवयित्री मंजिरी मुंडले यांच्या “किमया” या निसर्ग कवितेपासून कवी संमेलनाची सुरुवात झाली. गोवा येथील कवयित्री आदिती बर्वे यांनी “विरह”, “तू आणि मी” अशा दोन कविता सादर करून वाहवा मिळवली. कोकणसादच्या उपसंपादिका कवयित्री मंगल नाईक- जोशी यांनी “विनाशकाले विपरीत बुद्धि” ही रशिया व यूक्रेन युद्ध यावर भाष्य करणारी कविता सादर करून केली. तिला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. आपल्या शैक्षणिक कालावधीत तीन वर्षे सावंतवाडीत शिक्षण घेतलेली सध्या वाशी मुंबई येथे वास्तव्यास असलेली कवयित्री अनुराधा तांबोळी यांनी देवाशी संवाद साधणारी “कॉन्ट्रॅक्ट” व “अबोल किनारा” या कविता सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कवयित्री शालिनी मोहोळ यांनी “आनंदाचं झाड” सावंतवाडी येथील युवा कवयित्री स्नेहा कदम यांची “म्युझियम” या कविता देखील चांगल्या रंगल्या. मुंबई येथील कवयित्री अनुराधा म्हापणकर यांनी “मूठभर ठसठसती वेदना” व “कळलं नाही” या कविता सादर करून कार्यक्रमाचा माहोलच बदलून टाकला. कवयित्री अनुराधा म्हापणकर यांच्या अप्रतिम सादरीकरणाला रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. कुडाळ येथील कवयित्री अनुष्का रेवंडकर यांची “आत्मसन्मान” कल्पना बांदेकर यांची मालवणी कविता “जपलाला कनवटीचा” या विशेष दाद मिळवून गेल्या. संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.उर्मिला चाकूरकर यांनी “विठोबा” या त्यांच्या कविता संग्रहातील “शिळा” व “विठू पावतो” या दोन कविता सादर केल्या, तर संमेलनाच्या उद्घाटक नमिता कीर यांनी देखील अप्रतिम दोन कविता सादर केल्या. ठाणे येथील झुणझुणवाला कॉलेजच्या मराठी विभागाच्या प्राध्यापिका दीपा ठाणेकर यांनी “सीमोल्लंघन” व नव्या दमाची “हार्ट डिस्क” या कविता सादर केल्या. बांदा येथील मीनाक्षी अडवणी यांनी “पुरुष हो” तर हर्षवर्धिनी सरदार सावंतवाडी यांनी “तू गेलीस तेव्हा” व गोवा येथील प्रसिद्ध कवयित्री चित्रा क्षीरसागर यांनी “ऋतु नसताना” या कविता सादर करून सर्वांची वाहवा मिळवली. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मालवण येथील कवयित्री मधुरा माणगावकर यांनी “वादळांना झेलताना” ही अप्रतिम काव्य रचना सादर केली तर आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या प्रा.कवयित्री श्वेतल परब यांनी “थेंबभर कविता” ही काव्य रचना सादर केली.

कार्यक्रमाच्या शेवटी संमेलनाध्यकक्षा डॉ.उर्मिला चाकूरकर यांनी अध्यक्षीय भाषणात कवयित्रींनी “बंडखोर व्हा” असा संदेश दिला. डॉ.चाकूरकर या स्त्रीरोग तज्ञ असल्याने त्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय व इतर काव्यसंग्रह, कादंबरी इत्यादी वरून महिलांना लिखाणाबाबत जागृत करत उत्तम लिखाण करण्याचा सल्ला दिला. केवळ कविता लिहून न थांबता इतरही लिखाण करा असेही आवाहन केले. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या काव्य संमेलनात राज्यभरातून आलेल्या कवयित्रींच्या उत्कृष्ट कवितांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी शिरसाट व उषा परब यांनी केले. आभार प्रदर्शन कोमसाप सावंतवाडी शाखेच्या सचिव प्राध्यापिका प्रतिभा चव्हाण यांनी केले सोळावे विभागीय कवयित्री संमेलन यशस्वी होण्यासाठी आयोजिका साहित्यिका उषा परब, प्रा. प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर, मेघना रावळ सौ परब, प्रा.श्वेतल परब, माधवी शिरसाट यांनी विशेष परिश्रम घेतले.

आरती मासिकाच्या वतीने एका सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळाचा सत्कार करण्यात येतो, यावर्षी डॉ.तुपकर यांच्या माठेवाडा येथील काडसिद्धेश्वर स्वामींच्या मठात चालणाऱ्या योगा मंडळाचा सत्कार करण्यात आला. कोमसाप सावंतवाडी शाखेच्यावतीने अध्यक्ष संतोष सावंत सचिव प्रतिभा चव्हाण व कवी दीपक पटेकर यांनी केंद्रीय अध्यक्ष कोमसाप नमिता कीर संमेलनाध्यक्ष डॉक्टर उर्मिला चाकूरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या संमेलनासाठी कोमसाप सावंतवाडीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सहित कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते, त्याच प्रमाणे मोठ्या संख्येने सुंदरवाडीतील रसिक श्रोते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा