You are currently viewing पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा शिवसैनिकांना नवसंजीवनी

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग दौरा शिवसैनिकांना नवसंजीवनी

संपादकीय

शिवसेनेचे युवा नेते तथा पर्यटनमंत्री ना. आदित्य ठाकरे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा शिवसैनिकांना नवसंजीवनी देणारा ठरला. शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांमध्ये पर्यटन राज्यमंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे मोठा उत्साह दिसून आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २ कोटी २२ लाख रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते देवगड येथे कोनशिलेचे अनावरण करून करण्यात आले. कोकणात पोहोचण्यासाठी झालेल्या उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त करूनच आदित्य ठाकरे यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सुरुवात केली. देवगड येथे जमलेल्या जिल्हाभरातील शिवसैनिकांना संबोधित करताना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, कोकणात आल्यावर असे एकही ठिकाण नाही जिथे वेळ वाचून पुढे जाता येतं, प्रत्येक ठिकाणी थांबावं असं वाटत असतं. कोकणातील निसर्ग सौंदर्यावर भाष्य करताना त्यांनी निसर्गाने कोकणाला दिलेल्या अवर्णनीय सौंदर्याबद्दल गौरवोद्गार काढले. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते असून कोकणावर त्यांचे विशेष प्रेम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात दाभोळ येथे आजोळ असलेले आदित्य ठाकरे कोकणावर बोलताना खूपच उत्साही दिसून येत होते. आजोळ मधून आंब्याची पेटी दिल्याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
काहीच महिन्यापूर्वी चिपी येथे विमानतळाचे उद्घाटन झाले होते, याबद्दल बोलताना विमानतळ बनविण्यासाठी मेहनत घेतलेले सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत, तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री उदय सामंत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या कामाचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही गेलो तरी चारही बाजूने सौंदर्य ओतपोत भरलेले आहे, असे सांगतानाच कुणकेश्वर दर्शन घेतल्यावर समुद्रकिनारा पाहिला असता एवढा स्वच्छ आणि नितळ समुद्रकिनारा पाहून ते भारावून गेले. कोकणाच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करता पर्यटनासाठी नैसर्गिकरित्या सुंदर निसर्ग, समुद्रकिनारे राज्यात, देशातच नव्हे तर जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि हा कोकणातील सौंदर्याचा आस्वाद घेतील एवढे अलौकिक सौंदर्य कोकणाला लाभल्याचे सांगत त्यांनी कोकणच्या विकासासाठी पर्यटनाच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्या माध्यमातून झालेल्या कामांचे जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना सांगून वाचन केले व आपली कामे लोकांसमोर ठेवली.
मागील पाच वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना दीपक केसरकर यांनी दाखवलेल व्हिजन आपण पुढे नेत आहोत असे सांगतानाच दीपक केसरकर यांची विकासाबाबत असलेली दूरदृष्टी सर्वांच्या समोर उभी केली. त्याचबरोबर खासदार व इतर लोकप्रतिनिधीनी जिल्ह्यातील दाखविलेले कामे करून आपण कोकणाचा विकास करणार आहोत असेही सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेटी, बंदरे, समुद्रकिनारे यांचा शाश्वत विकास होणे गरजेचे असल्याचे सांगतानाच कोकणातील लोकांनीच दिलेल्या प्रेम व आशीर्वादामुळेच आपण राज्यात भगवा फडकवू शकलो याची त्यांनी आठवण करून दिली. आपण घोषणा केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ कोटी २२ लाख रूपयांची कामे सुरू झाली आहेत त्यामुळे पुढच्या वेळी येईन तो या कामांच्या उद्घाटनाला येईन असे त्यांनी आवर्जून सांगितले.
या कामांच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी कोकणात प्रामुख्याने पर्यटनदृष्ट्या भेडसावत असलेले तीन प्रश्न मांडले, त्यात पहिला प्रश्न म्हणजे कोकणातील पर्यटनस्थळांवरील कचऱ्याचा प्रश्न. कचर्‍याच्या प्रश्नावर बोलताना पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी कचऱ्याचे विलगीकरण करणे, त्याचा निचरा करणे यासाठी पर्यटनमंत्री म्हणूनच नव्हे तर एक शिवसैनिक आणि कोकणचा नातू म्हणून आपण विशेष लक्ष घालणार असून कचऱ्याचा प्रश्न नक्कीच मार्गी लावणार असे सांगितले. त्याच बरोबर दुसरा भेडसावत असलेल्या प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न. या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर ही चालू वर्षाच्या पूर्वार्धात त्याचे काम सुरू करणार असल्याचे सांगत पर्यटन दृष्ट्या तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मोबाईल फोनला प्रत्येक किलोमीटरला नेटवर्क येण्यासाठी काम करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. कोकणातील तरुण पिढीला पुढे नेण्यासाठी त्याचबरोबर शिक्षणासाठी गेल्या दोन वर्षात सुरू असलेल्या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण घेणे ही काळाची गरज बनली होती, त्यामुळे मोबाईल नेटवर्क ही सर्वांसाठी अत्यावश्यक बाब झाली. त्यावर बोलताना त्यांनी खासदार विनायक राऊत यांना जिल्ह्यातील गावागावात मोबाईलचे नेटवर्क येण्यासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सूचित केले, यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले. कचरा, पाणी व मोबाइल कनेक्टिविटी ही सर्वांसाठीच आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. देवगड नगरपरिषदेवर असलेली विरोधकांची सत्ता खालसा करून शिवसेना-राष्ट्रवादी युतीची सत्ता स्थापन केल्याबद्दल देवगडच्या नगराध्यक्ष, नगरसेवक व शिवसैनिकांचे त्यांनी अभिनंदन केले. देवगडच्या नगरसेवकांना देवगड नगरपरिषदेवर मिळालेल्या सत्तेची जबाबदारीची जाणीव करून देताना जनतेसाठी सर्वोत्तम काम करावे. लोकांनी नगरपालिकेसाठी आपल्याला दिलेले प्रेम याचे भान ठेवून देवगड साठी जे जे काही चांगले काम करायचे असेल त्यासाठी आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत, असे सांगून देवगड जामसंडे नगरपरिषदेसाठी सर्वोत्तम काम करण्याचे सूचित केले. या उद्घाटन समयी त्यांनी देवगड येथील बचत गटांचे सन्मान केले, त्याचबरोबर देवगडचे नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष व इतर सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. या दौऱ्याच्या प्रसंगी जिल्हा व्यापारी संघ व मच्छिमारांनी आपापल्या मागण्यांबाबत त्यांच्याजवळ निवेदन दिले. देवगड येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम देवगड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांनी आदित्य ठाकरे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. प्रास्ताविक सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्याने पूर्वीपासूनच शिवसेनेला भरभरून यश दिले आहे, त्यामुळे जिल्हावासियांचे आभार मानताना आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणातून याबाबतच्या आठवणी जागृत केल्या व सिंधुदुर्ग जिल्ह्यावर ठाकरे कुटुंबियांचे असलेले प्रेम पुन्हा एकदा दाखवून दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा