You are currently viewing कुडाळ येथे रंगला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिवादन करणारे “उन्हातले चांदणे”

कुडाळ येथे रंगला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना अभिवादन करणारे “उन्हातले चांदणे”

राहवत नाही म्हणून लिहितो तो लेखक: मधु मंगेश कर्णिक

कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्गच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्य सृष्टीला अभिवादन करणारे साहित्य पुष्प “उन्हातले चांदणे” कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात फुलले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मधुभाईंनी लिहिलेल्या पुस्तकांची ओवाळणी अनुक्रमे साहित्यिका उषा परब, जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, अरुण मर्गज, रुजारीयो पिंटो, विठ्ठल कदम यांच्या हस्ते करण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक पुस्तकाचे अभिवाचन देखील त्यांच्याच हस्ते करण्यात आले त्यातून मधुभाईंच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
कोमसाप मालवण तालुका अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या सुत्रसंचालनात आटोपशीर कार्यक्रम पार पडला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्याचप्रमाणे कोमसापचे केंद्रीय नूतन कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले डॉ.प्रदीप ढवळ यांचा जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मधुभाईंनी आपल्या छोटेखानी भाषणात अनेक गोष्टींचा उजाळा दिला, जुन्या आठवणी नव्याने जाग्या केल्या. यावेळी बोलताना त्यांनी “राहवत नाही म्हणून लिहितो तो खरा लेखक” याबाबतची आठवण सांगताच सर्वांनी त्याला टाळ्यांनी दाद दिली. कार्याध्यक्ष डॉ प्रदीप ढवळ यांनी कोमसापच्या भविष्याचा वेध घेतला तर जिल्हाध्यक्ष मंगेश मसके यांनी प्रास्ताविक केले, आभार प्रदर्शन उन्हातले चांदणे ही कल्पना ज्यांना सुचली ते कवी विठ्ठल कदम यांनी मानले.
कुडाळ येथे झालेल्या उन्हातले चांदणे कार्यक्रमाचा कुडाळ, मालवण, सावंतवाडी व दोडामार्ग तालुका कोमसाप शाखेच्या कार्यकारिणी सदस्य व सभासदांनी आस्वाद घेतला. शांत स्वभावाच्या व प्रत्येक जुन्या सभासदांना नावानिशी ओळखणाऱ्या मधुभाईंनी सर्वांची आस्थेने विचारपूस केली हे मात्र वाखाण्याजोगी होते. मधुभाईंच्या सहवासाच्या आठवणी सर्वांनी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा