सामाजिक तथा सहकार क्षेत्रात केले उल्लेखनीय काम
सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील माजी उपसरपंच तथा कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सावंतवाडीचे उपाध्यक्ष फ्रान्सिस डिसोजा यांचे गोवा येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघाचे माजी सदस्य मायकल डिसोजा यांचे ते वडील होत. फ्रान्सिस डिसोझा यांनी गेली अनेक वर्षे वीट व लाकूड व्यवसाय केला. वीट व्यवसायात त्यांचे मोठे नाव आहे. आपला व्यवसाय सांभाळून फ्रान्सिस डिसोजा सामाजिक कार्यात तसेच सहकार क्षेत्रातही अग्रेसर होते. गेली अनेक वर्षे त्यांनी कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, सावंतवाडी चे उपाध्यक्ष पद सांभाळले होते, तसेच कोलगाव ग्रामपंचायतीचे ते माजी उपसरपंच होते. त्याचप्रमाणे कोलगाव येथील विविध सहकारी सोसायटी वर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिले होते. त्यामुळे सहकार क्षेत्रात त्यांचा दबदबा होता. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या फ्रान्सिस डिसोझा यांनी आपला हसतमुख व मनमिळावू स्वभाव तसेच साध्या रहाणीमुळे जनमानसात एक चांगला माणूस म्हणून प्रतिमा निर्माण केली होती.
वीट व लाकूड व्यवसायातून त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता, त्यामुळे यशस्वी उद्योजक म्हणून जनमानसात त्यांची ओळख होती. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे फ्रान्सिस डिसोजा गेले काही दिवस आजारी होते. त्यातच गोवा येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.