You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरोधक केवळ केसरकरांवर टीका करतात

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विरोधक केवळ केसरकरांवर टीका करतात

आमदार दीपक केसरकर यांच्यामुळेच सिंधुदुर्गात शिवसेनेला आले होते सुगीचे दिवस

राजकिय विशेष

एकेकाळी जिल्हा भगवामय केलेली शिवसेना नारायण राणे यांच्या पक्ष त्यागानंतर केवळ हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्याच लोकप्रतिनिधींसह उभी होती. कधीकाळी जिल्ह्यात पहिल्या नंबरवर असलेली शिवसेना त्यावेळी चौथ्या नंबरवर फेकली गेली होती. परंतु राष्ट्रवादीचे आमदार असलेले सावंतवाडीचे दीपक केसरकर व शरद पवार यांचे मतभेद झाल्यामुळे पक्षत्याग करून केसरकरांनी शिवसेना प्रवेश केला. नारायण राणे यांच्या कार्यपद्धतीला असलेला कट्टर विरोध दीपक केसरकर यांच्या राष्ट्रवादी त्यागाचा मुख्य विषय बनला होता. नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला राजकीय दहशतवाद संपविण्याचा विडा उचललेले सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेना प्रवेश करताच अधिक आक्रमक होत संपूर्ण जिल्हा पिंजून काढून नारायण राणे यांच्या विरोधात जिल्ह्यात मतप्रवाह निर्माण केला, त्याचाच परिणाम म्हणजे काहीच दिवसानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांचा प्रचंड मतांनी विजय झाला. त्याचबरोबर विधानसभेच्या निवडणुकीत दीपक केसरकर सावंतवाडी मतदार संघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून तर आलेच, परंतु कुडाळ येथून कधीही पराभवाचा सामना न केलेले नारायण राणे यांचा वैभव नाईक यांनी पराभव केला. त्यामुळे संपूर्ण जिल्हा भगवामय झाला आणि दीपक केसरकर हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्या लढाई बाण्यामुळे त्यांना युतीच्या सरकारमध्ये गृह,अर्थ व वित्त राज्यमंत्री ही खाती त्यांच्याकडे सोपवली. त्याच बरोबर दीपक केसरकर यांनी जिल्हा नियोजनाच्या बैठकीत राणा भीम गर्जना केली होती “मी सुद्धा कधीतरी या जिल्ह्याचा पालकमंत्री होईन” ते पालक मंत्री पद सुद्धा दीपक केसरकर यांच्या पदरात पडले आणि त्यांचे स्वप्न साकार झाले.
एकंदरीत या सर्व घडामोडी पाहता दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेनेला उर्जितावस्था आणली. त्यामुळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात वाढली. पाच वर्षाच्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत दीपक केसरकर यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला आणि जिल्हा विकासाकडे देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जिल्हा विकासासाठी आणलेला निधी काही प्रमाणात अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे अखर्चित राहून परत गेला, त्यामुळे दिपक केसरकर यांच्यावर विरोधकांनी तसेच पक्षीय विरोधकांनी सुद्धा टिकास्त्र सोडले. त्यातूनच पुढील विधानसभेला देखील तिसऱ्यांदा निवडून येत *हॅट्रिक*केलेले दीपक केसरकर यांचे मंत्रिपद हुकले व जिल्हा विकासकामात मागे राहिला.
मोठ्या अपेक्षेने रत्नागिरी जिल्ह्यातील युवा नेते असलेले शिवसेनेचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली. आपल्या कणखर नेतृत्वसाठी नावाजलेले तडफदार युवा नेते म्हणून उदय सामंत यांची ओळख होती. त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा जिल्ह्यात जोमाने वाढेल अशी अपेक्षा असतानाच उदय सामंत यांच्याकडून म्हणावे असे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्ष मोठे करण्यासाठी काम झालेले दिसत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये शिवसेना हि मागेच राहिली. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश केलेले नारायण राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजप पक्ष जिल्ह्यात मोठा केला. जिल्ह्यात दुसऱ्यांदा जवळपास दीड लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येत लोकसभेवर गेलेले विनायक राऊत यांचेदेखील जिल्ह्यात दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विरोधकांना पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांची भीती वाटत नसून दीपक केसरकर हे फिनिक्स पक्षाप्रमाणे कधीही भरारी घेतील आणि पुन्हा एकदा राजकारणात वरचष्मा गाजवतील. म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना विरोधक केवळ आमदार दीपक केसरकर यांच्यावर टिकेचा रोख करतात. जेणेकरून दीपक केसरकर यांचे खच्चीकरण करता येईल आणि तसे झाल्यास सेना नक्कीच बॅकफूटवर जाईल व भारतीय जनता पक्षाला रान मोकळे होईल याचा त्यांना ठाम विश्वास आहे. गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची झालेली पीछेहाट पाहता शिवसेनेला आक्रमक होऊन विरोधकांना धोबीपछाड देणे आवश्यक आहे. अशावेळी शिवसेनेकडून कोणीतरी विरोधकांवर आक्रमण करणे गरजेचे असल्याने दीपक केसरकर यांच्यावर शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी जबाबदारी सोपविल्याची सूत्रांकडून माहिती मिळते आहे. त्यामुळे येत्या काळात नक्कीच दीपक केसरकर यांचे बदललेले रूप पाहण्यास मिळेल अशी खात्री वाटत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा