You are currently viewing बाळासाहेबांचा शिवसैनिक पदाला हापापलेला नाही शिवसैनिक हेच त्यांच्यासाठी मानाचे पद

बाळासाहेबांचा शिवसैनिक पदाला हापापलेला नाही शिवसैनिक हेच त्यांच्यासाठी मानाचे पद

चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांना शहरातील राजकारणावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

सावंतवाडी शिवसेना उपशहरप्रमुख शैलेश गौंडळकर व विशाल सावंत यांचे प्रत्युत्तर

सावंतवाडी नगरपरिषद बरखास्त होऊन जवळपास अडीज महिने उलटून गेले. अजूनही सावंतवाडी नगरपरिषदेची पुढील निवडणूक जाहीर झालेली नाही, परंतु प्रत्येक पक्षाचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी पुढील नगरपालिका निवडणुकीत पक्षाकडून तिकीट मिळविण्यासाठी धडपड करत आहे. यातच सावंतवाडीतील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या काही भाजप पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या आमदारांसह, नगरसेवक, लोकप्रतिनिधींवर टीका करण्यास सुरुवात केली. भाजपा सावंतवाडीचे युवा पदाधिकारी बंटी पुरोहित यांनी शिवसेनेच्या तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना उपशहरप्रमुख विशाल सावंत यांनी टीकेची राळ उठवली होती. विशाल सावंत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ग्रामपंचायत सदस्य अमित परब यांनी विशाल सावंत यांना उद्देशून बोलताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, तालुकाप्रमुख यांना खूष करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या प्रभागात विद्यमान नगरसेवकाला तिकीट मिळणार असल्याचा पलटवार केला होता.
सतत प्रकाशझोतात राहण्यासाठी चराठा ग्रामपंचायतचे सदस्य असलेले अमित परब यांना सावंतवाडी शहरातील राजकारणावर बोलण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. शिवसेना ही पक्षप्रमुखांचा आदेश मानणारी सेना आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक कधीही पदासाठी हापापलेला नसतो…नाही… आणि नसणार. शिवसैनिक हेच त्यांच्यासाठी मानाचे पद असते. आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी व मीडिया मध्ये आपले नाव येऊन चार लोकांमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी तळमळणारे चराठा ग्रामपंचायत सदस्य अमित परब हे स्वतः चराठा गावातून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले आहेत, तर त्यांची बायको मागील निवडणुकीत सावंतवाडी मधून शहरांमधून आपलं नशीब आजमावत होती. म्हणजे अमित परब यांचे मत चराठा गावात तर बायकोचे मत सावंतवाडीत अशी “एक पाय मळ्यात एक पाय तळ्यात” परिस्थिती असलेले चराठा ग्रामपंचायतचे सदस्य अमित परब हे सावंतवाडी शहराच्या राजकारणावर बोलतात हेच हास्यास्पद आहे. ज्यांना स्वतःचेच मत कुठे आहे हे शोधण्याची वेळ येते, त्यांनी सावंतवाडी शहराच्या राजकारणावर न बोललेलं बरं.
शिवसैनिक कधी पदाच्या मागे लागलेला नसतो तो आपल्या पदाचा त्याग करण्यास कधीही तयार असतो. पक्षहित आणि लोकांच्या विकासासाठी सदैव झटणारा म्हणजे शिवसैनिक. विशाल सावंत हे सावंतवाडी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना आपली पातळी सोडून शहरातील पदाधिकाऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शहराबद्दल बोलण्यासाठी भाजपकडे कोणीही नेता उरलेला नाही का? असाही सवाल अमित परब यांच्या प्रत्युत्तरानंतर उपशहरप्रमुख शैलेश गौडळकर व विशाल सावंत यांनी उपस्थित केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 11 =