You are currently viewing सिंधुदुर्ग विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व

सिंधुदुर्ग विकासाचे व्हिजन असलेले नेतृत्व

संपादकीय….

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत अनेक मोठमोठे नेते आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण करून गेले. बॅरिस्टर नाथ पै पासून केशवराव राणे, आप्पासाहेब गोगटे असे अनेक निष्कलंक नेते सिंधुदुर्ग जिल्ह्याने पाहिले. अगदी त्यांच्यासारखाच निष्कलंक नेता म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर !..सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आजपर्यंतच्या इतिहासात जेवढा निधी आपल्या पालकमंत्रिपदाच्या कारकिर्दीत कोणत्याही मंत्र्यांनी आणला नाही तेवढा निधी दीपक केसरकर यांनी आपल्या पालकमंत्रिपदाच्या कार्यकाळात आणला. दिपक केसरकर यांच्या शांत,संयमी स्वभावामुळे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या कामात कुचराई करून निधी खर्च करण्यात कमी पडले, त्यामुळे दीपक केसरकर मंत्री असून देखील अधिकाऱ्यांवर वचक नाही म्हणून ओरड सुरू झाली, त्यातच निधी आणून देखील जिल्ह्याचा विकास रखडला, परिणामी दीपक केसरकर यांना मिळालेले मंत्रीपद त्यांच्या पुढील कारकिर्दीत त्यांना राखता आले नाही. सावंतवाडी मतदार संघ विशेषतः मोठ्या प्रमाणात मराठा मतदार असलेला मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात आजपर्यंत फार पूर्वीच जरी पाहिलं नाही तरी प्रवीण भोसले, शिवराम दळवी हे मराठा समाजाचे आमदार होऊन गेले. त्यापैकी प्रवीण भोसले राज्यमंत्री होते. त्यापूर्वी जनता दलाचे माजी आमदार जयानंद मठकर हे बहुजन समाजाचे आमदार झाले होते. शिवराम दळवी यांच्या नंतर सावंतवाडी मतदार संघात दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून पहिली आमदारकीची टर्म पूर्ण केली. त्यानंतर शिवसेनेकडून निवडून येत त्यांनी पाच वर्षे राज्यमंत्री पद व जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषविले. तिसऱ्यांदा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येत त्यांनी सावंतवाडीत तीन वेळा आमदार होण्याचा बहुमान मिळविला. दीपक केसरकर यांच्या व्यतिरिक्त सावंतवाडी मतदार संघातून इतर कोणीही तिसऱ्यांदा आमदार होऊ शकले नव्हते. दीपक केसरकर हे वैश्य समाजाचे असूनही त्यांचा स्वभाव व वागणूक यामुळेच मतदार संघातील जनतेने त्यांना तीन वेळा आमदार केले. यावरूनच मतदारसंघातील जनतेचे त्यांच्यावर असलेले प्रेम दिसून येते. दीपक केसरकर यांनी तत्कालीन सरकारमध्ये मंत्री असताना चांदा ते बांदा या योजनेच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी देत अनेक विकास कामांना सुरुवात केली होती. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध विकास कामे सुरू आहेत. त्याचे श्रेय सुद्धा दिपक केसरकर यांना जाते. गेली अनेक वर्ष सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीतील कबुलायतदार गावकार जमीन प्रश्न आ वासून उभा आहे. परंतु कबुलायतदार गावकर जमीन प्रश्न का निर्माण झाला? हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे. तत्कालीन महसूल मंत्री नारायण राणे यांच्या कारकिर्दीत आंबोली येथील कबुलायतदार गावकर प्रश्न निर्माण झाला आहे. तद्नंतर देखील काँग्रेस च्या मंत्रीमंडळात नारायण राणे त्यांनी महसूल मंत्री पद भूषविले होते, परंतु त्या वेळी देखील कबुलायतदार गावकर प्रश्न निकालात निघाला नाही.
दोन दिवसापूर्वी दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेत जर प्रशासकीय अधिकारी अधिकार क्षेत्राच्या बाहेर वागत असतील तर,विधिमंडळात यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणला जाईल असे म्हटले होते. मुख्य म्हणजे आमदार दीपक केसरकर हे महाराष्ट्र हक्कभंग समितीचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे राज्याच्या विधिमंडळाने दिलेल्या अधिकाराचा ते वापर करू शकतात व अधिकार क्षेत्राच्या बाहेर वागत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणू शकतात. परंतु हीच परिस्थिती जर विधिमंडळातील इतर कोणत्याही लोकप्रतिनिधी समोर उपस्थित झाली असती तर त्याने आकाश पाताळ एक केलं असतं. परंतु केसरकर हे संयमी नेते असल्यामुळे त्यांनी हे प्रकरण संयमाने घेतले आहे. विरोधकांनी मात्र केसरकर यांच्या विरोधात अपप्रचार करण्यातच धन्यता मानली आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी सावंतवाडी तालुक्यातील मडूरा येथील एक कोटीचा पूल जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी मंजूर केला, असे पत्रकार परिषदेत सांगितले. ही गोष्ट प्रशासकीयदृष्ट्या हास्यास्पद आहे. एखाद्या कोट्यावधीच्या कामाला बजेट मध्ये तरतूद होऊन सार्वजनिक बांधकाम खाते महाराष्ट्र शासन यांच्याकडून संबंधित जाॅब  मंजूर करून घेण्याचे अधिकार पालकमंत्री आणि आमदार यांनाच असतो. त्यामुळे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केलेल्या विधानावरून त्यांचे प्रशासकीय अज्ञान प्रकट होते. संजू परब यांनी अशा प्रकारचे अज्ञान प्रकट करण्यापेक्षा तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा अभ्यास करावा, असा सल्ला सेनेच्या नारायण उर्फ बबन राणे यांनी दिला आहे.
सावंतवाडी तालुक्यात जेव्हापासून निवडणुकांचे वारे वाहू लागले व दीपक केसरकर यांनी यापुढे मतदार संघात ठाण मांडून बसणार असे जाहीर केले. तेव्हापासून विरोधकांकडून दीपक केसरकर यांचा अपप्रचार सुरू झाला आहे. सावंतवाडी तालुक्याने, मतदारसंघाने गेले दीड दशक दिपक केसरकर यांच्या पाठीशी राहत त्यांना बळ दिले होते त्यामुळे दीपक केसरकर मतदारसंघाचा विकास करू शकले. सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष असताना देखील दीपक केसरकर यांनी कोणत्याही नगराध्यक्षांनी केला नसेल एवढा विकास सावंतवाडी शहराचा केला होता. त्यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या नगराध्यक्षांच्या समितीच्या अध्यक्षपदावर विराजमान होण्याची संधी मिळाली होती. त्या संधीचा फायदा करून घेत दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरात विविध प्रकल्प आणले आणि सावंतवाडी शहराचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले होते. सावंतवाडी शहरात केसरकर यांनी आणलेले काही विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या अवाजवी भाडे आकारणी यामुळे सुरू होऊ शकले नव्हते. गेल्या काही वर्षांपासून त्यातील काही प्रकल्प सुरू झाले आहेत. परंतु सावंतवाडी शहराची सत्ता हाती असतानादेखील दोन वर्षात ज्यांच्याकडून शहराचा काहीही विकास झालेला नाही, त्यामुळे ते आपण विकासात कमी पडल्याचे झाकण्यासाठीच दीपक केसरकर यांच्या विरोधात अपप्रचार करून सावंतवाडीवाशीयांची दिशाभूल करत आहेत, असा आरोप होत आहे. दीपक केसरकर यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत सावंतवाडी शहर तसेच सावंतवाडी मतदार संघाचा केलेला विकास पाहता एक सुशिक्षित आमदार, व्हिजन असलेला नेता म्हणून मतदारसंघात त्यांची ओळख निर्माण झाली आहे,. आणि त्यामुळेच त्यांना युती सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाचे असलेले गृहराज्यमंत्री तसेच अर्थ व वित्त राज्यमंत्री पद देऊन त्यांचा सन्मान केला गेला होता. दीपक केसरकर हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याने भविष्यातही सावंतवाडी सहित सावंतवाडी मतदार संघाच्या विकासासाठी नक्कीच ते प्रेरणादायी काम करतील याबाबत जनतेच्या मनामध्ये अजिबात संकोच नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight + eighteen =