मुंबई :
लता मंगशेकर यांच्या वाढदिवसानिमित्त ठाकरे सरकारने राज्यात मास्टर दिनानाथ मंगेशकर संगीत विश्वविद्यालय स्थापन करणार असल्याची घोषणा केली, या निर्णयाचं लता मंगेशकर यांनी आभार मानले आहेत. माझ्या मनात फार काळापासून एक इच्छा होती, राज्यात एक जागतिक दर्जाचे संगीत विद्यालय असावे जिथे भारतातील तसेच सर्व पाश्चात्य देशातील अनेक गायन नृत्य वादन प्रकारांचा समावेश असावा असं त्यांनी म्हटलं आहे.
तसेच या विश्वातील वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा ही इच्छा मी चि. आदित्य ठाकरे याला एकदा सांगितली आणि आदित्यने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि सहकाऱ्यांनी यावर निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने माझ्या वाढदिवसानिमित्त मला सुंदर भेट दिली अशा शब्दात लतादिदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकारातून या महाविद्यालयाची निर्मिती होईल. नव्या पिढीचे गायक, संगितकार निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे देशातलं पहिलं संगीत महाविद्यालय लवकरच मुंबईत सुरू करण्यात येणार आहे. मंगेशकर कुटुंबियांचा संगीत क्षेत्रात असलेला वारसा पुढे नेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक गायक, वादक आणि संगीत क्षेत्रात काम करू इच्छिणारे कलाकार तयार होतील, असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.