You are currently viewing 16 डिसेंबरला वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक

16 डिसेंबरला वीज ग्राहक संघटना सावंतवाडीची विभागीय बैठक

*आंबोली व कलंबिस्त विभागात आयोजन*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना कार्यरत असून जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना उल्लेखनीय असे कार्य करीत आहे. सावंतवाडी तालुक्यातील गावागावांमध्ये वीज ग्राहक संघटना पोहोचलेली असून गावातील वीज समस्यांचे निराकरण करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेने सबस्टेशन निहाय वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली व कलंबिस्त या दोन गावांमध्ये दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी विभागीय बैठकीचे आयोजन केले आहे.

सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना आयोजित आंबोली विभागाची पहिली बैठक दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आंबोली ग्रामपंचायत येथे पार पडणार आहे. आंबोली विभागातील आंबोली गेळे, चौकूळ आदी गावातील वीज ग्राहकांच्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन महावितरण कडून त्यावर योग्य तो तोडगा काढण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर सांगेली विभागाची बैठक कलंबीस्त ग्रामपंचायत येथे दुपारी 3.00 वाजता आयोजित करण्यात आली असून या बैठकीमध्ये माडखोल, सांगेली, सावरवाड, कलंबिस्त, वेर्ले, शिरशिंगे, गोठवेवाडी आदी गावातील वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण केले जाणार आहे.

या बैठकींसाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेचे पदाधिकारी त्याचबरोबर सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समस्या लेखी स्वरूपात घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. सबब, सदर विभागांतर्गत येणाऱ्या गावातील वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने बैठकीसाठी उपस्थित राहून आपल्या समस्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे आवाहन सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष आदी कार्यकारिणीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा