भविष्याची गरज ओळखुन पाण्याच्या बचतीचे नियोजन करणे गरजेचे – जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
भविष्याची गरज पाण्याच्या बचतीचे तसेच पाण्याच्या वापराचे नियोजन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात आज जागतिक जल दिनानिमित्त जल जागृती सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर भूसंपादन उपजिल्हाधिकारी वर्षा शिंगण, दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधिक्षक अभियंता विजयकुमार थोरात, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महादेव कदम, मध्यम प्रकल्प विभागीय पथकाचे कार्यकारी अभियंता हर्षद जाधव, सिंधुदुर्ग पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे, सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग अंबडपालचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीमंगले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता श्री. उपरेलू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस.एन.म्हेत्रे, दक्षिण कोकण पाटबंधारे मंडळाचे प्रमुख आरेखक मकरंद देसाई आदी उपस्थित होते.
जिथे पाणी आहे तिथे जीवन आहे, जगातील सर्वच संस्कृतींची सुरुवात व विकास हा पाण्याच्या स्त्रोतांजवळ झाल्याचे सांगून जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी म्हणाल्या, जीवनाची उत्क्रांतीही पाण्यातूनच झाली आहे. पाण्यावरून अनेक वाद आहेत. पाण्याच्या बचतीचे नियोजन प्रत्येकाने स्वतःपासून करावे. मुलांना पाणी बचतीचे महत्व सांगावे. तसेच पाण्याचे बचत करण्याच्या सवयी मुलांना शिकवाव्यात. आपला जिल्हा हा पाण्याच्या बाबतीत सधन आहे. पाण्याच्या पुरवठ्यामध्ये वाढ होण्यासाठी कृषी व पाटबंधारे विभागाने एकत्र काम करावे. पाण्याचे चांगले नियोजन कशा प्रकारे करता येईल याचा विचार करावा. तसेच भविष्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करावे.
दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. थोरात यांनी सप्ताहाचा उद्देश सांगताना लोकांमध्ये जल साक्षरता निर्माण करणे गरजेचे असल्याने या सप्ताहाची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. तर प्रस्तावनेमध्ये श्री. कदम यांनी जल सप्ताहाचे महत्व, पार्श्वभूमी यांची माहिती दिली.
सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील 7 उपखोऱ्यातील तिलारी, तेरेखोल, कर्ली, गड, आचरा, देवगड व वाघोटन नद्यांच्या पाण्याचे पूजन करण्यात आले. मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. यादव यांनी उपस्थितांचे आभार मानले.