*माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी घेतली आरोग्य मंत्र्यांची भेट*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे युवा रक्तदाता संघटना व इतर काही रक्तदाता संघटनांनी रक्तदानाची चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू केलेली आहे. त्यामुळे सावंतवाडी सह जिल्हात इतर ठिकाणी तसेच गोवा येथे जिल्ह्यातील जे रुग्ण दाखल होतात त्यांना सुद्धा रक्ताचा तुटवडा कधी भासत नाही. अशावेळी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे सुरू असलेले रक्तपेढी तेथील रिक्त पदांच्यामुळे बंद करण्यात आली होती. सावंतवाडीतील रक्तपेढी बंद केल्यामुळे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सहित इतर खाजगी रुग्णालयांमध्ये भविष्यात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात भासला असता. तसेच रक्तदात्यांना ओरोस येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावे लागले असते. पर्यायी सावंतवाडीतील रुग्णांना तात्काळ रक्त उपलब्ध होणे कठीण झाले असते.
सावंतवाडीतील राष्ट्रवादीचे नेते तथा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तपेढी सुरू करण्याचे आदेश तात्काळ आरोग्य खात्याचे मुख्य सचिव यांना दिले व त्याची त्वरित कारवाई झाल्याचे मुख्य सचिव यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कळवले आहे. आपल्या मुंबई येथील भेटीत माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा येथे होणाऱ्या मेडिकल कॉलेजकडेही लक्ष वेधले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज लवकरात लवकर सुरू करण्याबाबत पूर्ण लक्ष दिले जाईल, अशी खात्री दिली. त्याचबरोबर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. उत्तम पाटील हे निवृत्त झाल्यानंतर कोरोना काळात मुदत वाढीवर रुग्णालयाचे अधीक्षक म्हणून काम पाहत होते. परंतु मुदत संपल्याने डॉ. उत्तम पाटील हे निवृत्त होत असून त्यांच्या जागी देखील सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला अधीक्षक म्हणून चांगले डॉक्टर देऊ, असेही चर्चेअंती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या सोबत सावंतवाडी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा श्रीम.अर्चना घारे-परब व मनोज वाघमारे हे उपस्थित होते. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांनी ना.राजेश टोपे यांची भेट घेऊन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथील समस्यांबाबत तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या मेडिकल कॉलेजच्या बाबतीत आरोग्य मंत्र्यांचे लक्ष वेधून त्वरित कारवाई करण्याच्या प्रयत्न केला त्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.