You are currently viewing एस्टीची साथ

एस्टीची साथ

जिल्ह्यातील नावाजलेले लेखक कवी विनय सौदागर यांनी मांडलेली एसटी आणि प्रवाशांचा सबंध

एस्टीची साथ
(ST ची SaTh)

आम्हा सर्व गाववाल्यांना सर्वात जास्त साथ कोणत्या वाहनाची लाभली असेल, तर ती एस्टीची. होय, बालपणी सायकली होत्या, पण त्या पुरुष वर्गाकडे. टू व्हीलर, फोर व्हीलर चा सुळसुळाट अजून व्हायचा होता. पण ही एस्टी मात्र सर्वकालीन सर्वासाठी होती.
आता एस्टी संपामुळे अनेकांची पंचाईत झाली आहे. आमची कामवाली मला रोज विचारते, “काय वो, येश्टेचा काय झाला?आजून नाय मां सुरू? “. मी ‘नाही’म्हणतो.
“सगळी पंचायत करून ठेयलीहा. खडे जावक नको, आनी येवक नको. “असं म्हणून ती जोरजोरात कपडे आपटायला जाते.
एस्टीत मी लवकर बसलो, तरी तिचा खरा सहवास मला काॅलेजात गेल्यावर लाभला. एफ् वाय,एस् वाय आणि टी वाय अशी सलग तीन वर्षे मी एस्टीने प्रवास केला. काॅलेजात जाणाऱ्या सर्वच मुलाना एस्टी हाच पर्याय होता. आम्ही आजगाव शिरोड्याहून सावंतवाडीला जायचो. बांदा, कुडाळ, वेंगुर्ला अशीही मुलं यायची.
आर्ट्स, काॅमर्स ची मुलं सक्काळी जाऊन दुपारी यायची; तर आम्हा सायन्सच्या मुलाना शिरोड्याहून सावंतवाडीला जायला सकाळी ७.४०व ९.२० ची गाडी, तर येताना सायंकाळची ५.४० गाडी मिळायची. यातील ९.२० व ५.४०च्या गाड्या आम्हा विद्यार्थ्यांच्याच असायच्या. सर्व सामान्य लोक काॅलेज विद्यार्थ्यांच्या या गाड्या टाळायचेत. आमचं काॅलेज पूर्ण करायला या एस्टीची खरी साथ लाभली. अनेक कडुगोड आठवणीही तिच्याशी निगडीत आहेत. सकाळच्या वेळी 5790 नंबरची एक डब्बा गाडी कायम आमच्या नशिबाला असायची,ही सर्वात कटू आठवण. सगळा मूडच खराब करून टाकायची
एस्टीत अनेकांच्या वेगवेगळ्या आवडत्या सीटस् होत्या. पण एक ‘जाई’नावाची मुलगी नेहमी पाच नंबर च्या सीटवरच बसायची. कसेही करून ती सीट ती पकडायची. पुढे पुढे तिची नकळत दहशतच निर्माण झाली. आम्ही कोणच त्या सीटवर बसत नसू. काॅलेज पूर्ण झाल्यावरही मी पुढे नोकरी निमित्त याच एस्टीतून शिरोडा- सावंतवाडी प्रवास करायचो. तेव्हाही कधी पाच नंबर सीटवर बसायचो नाही. वाटायचं, अचानक जाई येईल आणि मला त्या पाच नंबर सीटवरून उठवील.
एस्टी कधीही फारशी स्वच्छ नसायची, पण ते तसं चालायचं. कारण एक तर तक्रारीला वाव नव्हता. आणि दुसरे म्हणजे आम्हीही काही फार स्वच्छ,टाईट नव्हतो.
काही कंडक्टर, ड्रायव्हर आमचे मित्र होते, तर काही द्वेष्टे. या मित्रांच्या सहाय्याने आम्ही आमच्या गरजा पूऱ्या करायचो. गरजा तरी मेल्या कसल्या? ‘गाडीत जागा मिळणं’ ही गरज आणि ‘विंडोसिट मिळणं’ ही चैन.
खेडेगावात वस्तीला जाणाऱ्या एस्टी अनेकदा लेट असत. मी एकदा लक्ष ठेवून होतो. आमच्या इथली फणसखोल ही वस्तीची गाडी लेट होती. मी अर्ध्या तासाने कंट्रोल केबीनला विचारले. ते म्हणाले, ‘गाडी कधीच गेली. इनटाईम होती. ‘ तशी तिथली नोंदही त्यानी दाखवली.
मी म्हटलं, “कंडक्टर कोण?” त्यानी मला नाव सांगितलं. मी त्याला शोधून काढलं.जोरात बोललो,” काय हो, केबीन मध्ये सही करून इथे फिरताय काय?”. तो शांतपणे म्हणाला, “चला जावया मवो.” मग त्याने गाडी लावली,आम्ही निघालो. फार राग यायचा तेव्हा. आता कळतं की, खेडेगावात वस्तीला जायचं म्हणजे, तिथल्या अपूऱ्या सुविधेत रात्र काढायची. जवळपास हाॅटेल नसल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी कुणाकडेतरी फुटी चाय मिळेल का ,याची वाट पहायची. कुणाची तरी सहानुभूती घेत ,हे असे खडतर दिवस ढकलायचे. हे सर्व ते निमूटपणे भोगीत होते.
एस्टी मॅनेजमेंटची कामगिरी मात्र शंकास्पद वाटते. किती जुने महामंडळ आहे हे, पण इतक्या वर्षात तशी सुधारणा नाही. माझा सखोल अभ्यास नाही,पण अलिकडचा गोवा ट्रान्स्पोर्ट बघितला की, येतील विसंगती दिसते. त्यांच्या बहुतांश गाड्या स्वच्छ असतात,वेळेत असतात, कुशन चांगल्या असतात, त्यांच्या मिनी बसेस पण आहेत. इथे आपली जुनी एस्टी त्यामानाने मागे राहिली. गोव्यात त्या ट्रान्स्पोर्टला खाजगी बसेसशी स्पर्धा आहे, इथे तेही नाही. यात कर्मचारी बिचारे भरडत आहेत
एस्टीशी सगळ्यांचे स्नेह बंध आहेत. चाकरमान्यांच्या रातराणीच्या आठवणी, विद्यार्थ्यांच्या शाळा काॅलेजच्या आठवणी, गृहिणींच्या माहेरवासाच्या आठवणी, तर काहींच्या सहलीच्या आठवणी. त्याशिवाय प्रेमाच्या, आजारपणाच्या, भांडणाच्या अशाही अनेक आठवणी असतील. अशी ही अनेकांची साथी एस्टी सध्या गुदमरून गेलीय. भविष्य नसलेल्या पतंगा प्रमाणे हेलकावे खातेय. सामान्यांना समजतच नाहिये की,तिचा दोर अजून शाबूत आहे की तुटलाय.
‘एस्टी हवी की नको’ ,असे सार्वमत घेतल्यास; एक तरी मत ‘नको’ कडे जाईल का?, अशी स्थिती आहे. मग असे का? ड्रायव्हर सीटवर बसलाय, कंडक्टर गळ्यात तिकिटाचा ट्रे अडकवून तयार आहे; पण कुणी हात न दाखवताच स्टाॅप नसलेल्या ठिकाणी ती थांबलीय आणि डबल बेल द्यायला भलताच उशीर होतोय. निदान पाठच्या पत्र्यावर हात मारून तरी ‘जावनेत’ असे कुणीतरी म्हणेल , अशी आशा ती करत असेल. शुभम् भवतु।

*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी.
9403088802…………२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + seventeen =