You are currently viewing शिवजयंती उत्सवाचे बदलते स्वरूप

शिवजयंती उत्सवाचे बदलते स्वरूप

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच…लालित्य नक्षत्रवेल समूहाचे सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा लेख*

 

*शिवजयंती उत्सवाचे बदलते स्वरूप*

 

*”प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय”* ही शिवगर्जना कानावर पडताच अंगावर काटा उभा राहतो… छाती गर्वाने फुलून येते….आणि आपल्या राजाच्या पराक्रमांची आठवण येताच उर भरून येतो…असे मराठ्यांचे राज्य निर्माण करणारे…अवघे ५० वर्षे लाभलेले आयुष्य स्वराज्यासाठी वेचलेले…गोरगरीब रयतेच्या सुखासाठी, स्त्रीच्या सन्मानासाठी झटलेले…छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. कुशल नेतृत्व, कर्तुत्व, संघटन, सावधानता हे गुण महाराजांच्या अंगी होते. प्रजाहितदक्ष, एक प्रखर योद्धा, कुशल राज्यकर्ता, उदार व लोककल्याणकारी राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगाला प्रेरणादायी आहे. त्यांनी अन्यायाविरूद्ध आवाज उठवून स्वकियांमध्ये आत्मसन्मान जागविला. अद्वितीय योद्धा म्हणून महाराज जगभर परिचित आहेत. गनिमी काव्याचा प्रभावी उपयोग केला, देशात सर्वप्रथम नौसेनेची स्थापना केली, अनेक गड किल्ले उभारले. जातपात, धर्म यापेक्षा त्यांनी आपल्या राज्यकारभारात कर्तृत्वाला महत्व दिले. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होताना आपल्याला शिवाजी महाराजांचे कार्य पुढे नेण्यासाठी जोशात असणाऱ्या लोकांमध्ये यातला एक तरी गुण दिसतो का?

महाराजांच्या अंगी कुशल नेतृत्व, संघटन कौशल्य, अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे सामर्थ्य होते…आजकाल छत्रपतींसारखी दाढी वाढवून…माथ्यावर भगवा टिळा लावून फिरणाऱ्या प्रवृत्ती भरपूर दिसतात…परंतु महाराजांचे गुण असलेली वृत्ती मात्र त्यांच्यात सापडत नाही. शिवजयंती हा उत्सव नव्हे तर आपल्यासाठी एक सणच…परंतु शिवजयंतीच्या एका दिवशी लोकांच्यात शोभेसाठी संचार येतो…महाराजांचे चित्र असलेले भगवे झेंडे दुचाकी, चारचाकी वाहनांना लावून….डोक्यावर भगवा फेटा आणि अंगात पांढरा सलवार कमीज….पायात मोजड्या घालून….एका दिवसाच्या देखाव्यासाठी बापाला दोन तिन हजारांची कात्री लावून बापाच्या पेट्रोलवरच दिवसभर डिजे लावून धिंगाणा घालतात…. परंतु खरंच…..

महाराज असते तर अशा धिंगाणा घालणाऱ्या औलादी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिल्या नसत्या का?

महाराजांच्या शौर्याने प्रत्येकाच्या अंगात संचार आलाच पाहिजे…परंतु त्यातून नव्या पिढीला महाराजांच्या अतुलनीय कार्याची माहिती मिळाली पाहिजे….महाराजांच्या आदर्शावर चालण्याची प्रेरणा मिळाली पाहिजे…परंतु गाडी घोडे घेऊन बेभान होऊन रस्त्यावर भिरभिरणारी तरुणाई त्यातून उत्पन्न होणारे वाद आणि जनतेला त्याचा त्रास होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. परंतु छत्रपतींच्या जन्मदिवसासाठी एक दिवस मिरवणूक असे दाखवीत अनेक ठिकाणी रस्त्यांवर होणारी कोंडी…..आणि पादचाऱ्यांना होणारा त्रास…दिवसभर कर्णकर्कश आवाजात डिजेवर वाजणारी हिंदी, इंग्रजी गाणी यामुळे ही छत्रपतींची जयंती आहे की अन्य काही याचा अंदाज देखील येत नाही…अपवादात्मक काही ठिकाणी छत्रपतींच्या शौर्याची गाथा, पोवाडे गायले जातात…. पोवाड्यांच्या सादरीकरणातून इतिहास हुबेहूब उभाही केला जातो….

महाराजांनी आपल्या समोर त्यांच्या कार्यातून, कृतीतून…वागणुकीतून ठेवलेला आदर्श घेऊन समाजाने आपल्यातील वागणुकीत बदल करणे आवश्यक आहे. महाराजांचा जयंती उत्सव हा त्यांनी दिलेल्या प्रेरणेतून आदर्शातून केला पाहिजे…महाराजांनी मोघल, आदिलशाही, निजाम, पोर्तुगीज इत्यादी सर्व शक्तींचा बिमोड करूनही कधी आपल्या कर्तृत्वाचा देखावा केला नव्हता….मग महाराजांच्या कर्तृत्वाचा देखावा आपण केलेला महाराजांना अभिप्रेत आहे का? महाराजांच्या जयंतीच्या दिवशी उत्सवाचे बदललेले स्वरूप नक्कीच वेदनादायी आहे….त्यात बदल होणे आवश्यक आहे.

 

©[दिपी]

दीपक पटेकर, सावंतवाडी

सिंधुदुर्ग ८४४६७४३१९६

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − eleven =