You are currently viewing शिरवल रस्ता खड्डेमय :दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी स्व.शेखर शिरसाट मित्रमंडळाकडून श्रमदानातून डागडुजी…

शिरवल रस्ता खड्डेमय :दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी स्व.शेखर शिरसाट मित्रमंडळाकडून श्रमदानातून डागडुजी…

 

कणकवली

कणकवली शिरवल कळसुली रस्ता खड्डेमय बनला असून या मार्गावरून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. याबाबत अनेकदा प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष ही वेधण्यात आले. मात्र रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित बांधकाम विभागाने आणि लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याने शिरवल येथील स्व. शेखर शिरसाट मित्रमंडळाने पुढाकार घेऊन श्रमदान करुन रस्त्यावर पडलेले खड्डे जांभ्या दगडाने भरुन डागडुजी करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून स्व. शेखर शिरसाट मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरावस्थाकडे लक्ष देवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिरवल ग्रामस्थांनी दिला आहे. कणकवली शिरवल कळसुली मार्ग हा वर्दळीचा मार्ग असल्याने या मार्गावरून वाहनधारकांची आणि प्रवाशांची मोठी वर्दळ असते. कणकवली हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शाळा, कॉलेजचे विद्यार्थी शिक्षणासाठी तसेच नोकरी- व्यवसायासाठी कामगार वर्ग, तसेच अनेक आजारी रुग्ण ही कणकवलीत रुग्णालयात उपचारासाठी येण्यासाठी याच मार्गावरून ये-जा करीत असतात. कणकवली शिरवल कळसुली मार्गावर यापूर्वी एस.टी.च्या बारा बसफेर्या सुरु होत्या. मात्र लाँकडाऊन मुळे सध्या चार फेर्या सुरु आहेत.हा मार्ग रहदारीचा असल्याने सतत वाहतुकीची वर्दळ असते. शिरवल गावामधून जाणारा रस्ता खड्डेमय बनला असून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत असल्याने स्व.शेखर शिरसाट मित्रमंडळाच्या वतीने श्रमदान करुन शिरवल रस्त्यावर पडलेले खड्डे जांभ्या दगडाने भरुन डागडुजी करण्यात आली.

यावेळी प्रशांत कुडतरकर, कृष्णा कुडतरकर, बबन शिरसाट, प्रमोद नानचे, प्रवीण कोरगांवकर, तुळशीदास कुडतरकर,, माजी सरपंच मनोज राणे, योगेश कोदे,राज प्रभूपाटकर, वैभव कोदे, मनिष कुडतरकर प्रथमेश नानचे, स्वप्नील शिरसाट, दिनेश कुडतरकर, योगेश कुडतरकर, प्रसाद नानचे आदी उपस्थित होते. शिरवल चव्हाठा ते शिरवल फणसस्टाँप हा तीन किलोमीटर अंतर असलेला रस्ता खड्डेमय बनल्यामुळे हा रस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे.खड्डयात पाणी साचत असल्याने रस्त्यावरून जात असलेले वाहन खड्डयातून गेल्यावर चालत जात असलेल्या पादचारी यांच्या अंगावर चिखल उडत आहे. याचा फटका पादचारी यांना बसत आहे. २०ते२२ वर्षापूर्वी केलेल्या डांबरीकरणानंतर अद्याप पर्यंत शिरवल चव्हाठा ते शिरवल फणसस्टाँप हा तीन किलोमीटर अंतर असलेला रस्ता डांबरीकरण न झाल्याने खड्डेमय बनल्यामुळेच रस्त्याची चाळण झाली आहे.वाहनधारक जीव मुठीत धरुन या मार्गावरुन वाहने हाकत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी खड्डेमय रस्त्याची समस्या मार्गी लाावावी यासाठी ग्रामस्थ, वाहनधारकांनी आणि प्रवाशांनी रस्ता दुरुस्तीची मागणी करुन लक्ष वेधले आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून, प्रशासनाकडून आणि लोकप्रतिनिधींकडून सामान्य जनतेची आश्वासने देवून आजपर्यंत बोळवण केली जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या बद्दल चिड निर्माण झाली असून संतापाची भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत.कणकवली शिरवल कळसुली मार्गावरील रस्त्यावर पडलेलेे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ भरण्यात यावेत आणि हा रस्ता वाहतुकीसाठी निर्धोक करावा, अन्यथा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा शिरवल ग्रामस्थांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 18 =