You are currently viewing पेहराव

पेहराव

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री जयश्री कुलकर्णी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीवर भाष्य करणारा अप्रतिम लेख

शिवजयंती आली की, वातावरण सगळं भगवं होऊन जातं.ठिक ठिकाणी महाराजांचे पुतळे उभे करण्यासाठी भरपूर खर्च करून, मोठे मंडप तयार केले जातात, आणि तिथे महाराजांचे पुतळे उभे करून, त्यांना हार घालून त्यांची पूजा केली जाते. मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवर, महाराजांची, त्यांच्या मावळ्यांची, जीवनगाथा सांगणारे पोवाडे लावले जातात .तरुणाईमध्ये जास्त उत्साह दिसतो या दिवशी !कोणी मुद्दाम आवर्जून गड-किल्ल्यांची सफर करायला जातो त्या दिवशी. अशातच काही ठिकाणी मिरवणूका काढल्या जातात. बँड किंवा ढोल पथके वरूनही लेझीम खेळत असतात. भगवे ध्वज नाचवत मिरवणूक पुढे जात असते.कधी कधी घोड्यावर, शिवाजी महाराजांचा पेहराव करून, तरुण किंवा बालक स्वार झालेले असतात .हुबेहूब महाराजांचा पोशाख! तसाच जिरेटोप ,तशाच भरदार दाढी-मिशा, कपाळावर गंध, कानात बाळी ,आणि हातामध्ये भवानी तलवार!” जय भवानी, जय शिवाजी” चा घोष चाललेला असतो. सगळ हे सगळं पाहिलं तर असं वाटतं की, आत्ता शत्रू आला तर शीर उडवलं जाईल त्याचं अगदी! भारलेलं वातावरण असतं .मनात विचार येतो ,आपण उगाच म्हणतो, तरुणाई बिघडली आहे .तरुणाईला उत्साहच नाही .किंवा तरुणाईला या आपल्या देशाचं, संस्कृतीचं, काही पडलेले नाही .पण आहे बुवा !तरुणाई जागी आहे! अजुनही वेळ गेली नाही .कुठेतरी स्फुल्लिंग शिल्लक आहे अजून!
आणि शिवजयंतीच्या दुसऱ्या दिवशी ,सगळीकडे भगव्या पताका, काल डौलात फडकत होत्या त्या पायदळी पडलेल्या असतात .ते पुतळे, ती सजावट ,अर्धवट आवडलेलं, तो सगळा मंचक केविलवाणा दिसतो .आणि कहर म्हणजे ,काल शिवाजीच्या पोशाखात तळपत असलेला तो हिरो, गुटका चघळून, कुठेतरी थुंकताना दिसतो. विशेष म्हणजे त्याची महाराजांसारखी दाढी ,मिशी खरी असते .कानातली बाळी पण खरी असते .त्यासाठी त्यांने कान ही टोचून घेतलेले असतात. हे पाहिलं की वाटतं, अरे, म्हणजे काल केलेला सगळा देखावा होता? महाराजांचा देखावा! महाराज ही काय देखाव्याची वस्तू आहे? अरेरे ,काय आहे हे ?आपल्याला किती समज आहे या गोष्टींची ?आपल्या संस्कृतीचे मारेकरी, बाहेरची एखादी शक्ती नाही, तर आपणच आहोत आपल्या संस्कृतीचे मारेकरी! निर्लज्ज! शरम वाटत नाही आपल्याला? कोणाचे नाव घेतो? कोणाचा पेहराव करतो ?जरा कशाची चाड ?ज्यावेळी शिवबांचा, तुकोबांचा ,कुठल्या संतांचा ,पोषाख करतो आपण ,तेव्हा त्यांचं जीवन आधी समजून घेतलं पाहिजे .आणि मगच पेहरावाला हात लावला पाहिजे. आज पेहराव करायचा, आणि उद्या उतरून टाकायचा, अशी व्यक्तिमत्व नाहीत ही! उत्तुंग व्यक्तिमत्वं आहेत !की तो पेहराव केल्यानंतर ,ते व्यक्तिमत्त्व अंगात भिनलं पाहिजे. त्यांचं कार्य, त्यांची तडफ ,असं सहजासहजी उतरवून ठेवू शकत नाही कुणी !शिवाजी म्हटलं की,” शिवकल्याणराजा “!,की जो महिलांचा सन्मान करतो .

“अशीच आमची आई असती,
सुंदर रूपवती,
आम्हीही सुंदर झालो असतो,
वदले छत्रपती”

सुंदर स्त्री पाहिल्यावर विकार उतरला नाही त्यांच्या डोळ्यात, तर त्या ठिकाणी ,त्यांना आई दिसली. म्हणून ते मोठे !म्हणून ते वंदनीय! आणि हा तरुण तिठ्यावर उभा राहून, येणाऱ्या-जाणाऱ्या तरुणींची छेड काढत उभा असतो !स्त्री पाहिली की डोळे वासनेने मदांध होतात त्याचे !सारासार विचार हरवून जातो . स्त्रीला अशी वस्तू समजणारा शिवाजी होऊ शकतो ?अरे शिवाजी तर कोणीच नाही होऊ शकणार !पण शिवाजीसारखे तरी होऊ शकता! वाचा …..वाचा ती चरित्र! म्हणजे कळेल की आपण कुठे आहोत! आपली लायकी काय आहे ?आणि आपण काय करत आहोत!
आपण फक्त पेहराव करत आहोत .हा एका दिवसासाठी पेहराव करणं ,आणि एरवी थिल्लर पणा करणं ,हा त्या व्यक्तिमत्त्वांचा अपमान आहे ,असं नाही वाटत आपल्याला!? जुन्या काळातला संत तुकाराम हा सिनेमा पहा, त्यात तुकारामांची भूमिका करणारे ,”विष्णुपंत पागनीस” त्यांना खरंच विरक्ती आली म्हणे!
याला म्हणतात पेहराव !त्यांना जाणून घ्यायचं, त्यांना समजून घ्यायचं ,त्यासाठी या जयंत्या !टिळक वेडे नव्हते रे !अरे ,आपला देश काय आहे ,आपली संस्कृती काय आहे ? समजून घ्या तरुणांनो. झिंगाट च्या तालावर नाचू नका .तरुणांनो ,जागे व्हा !तुम्ही सांभाळलत ,तर उद्याच्या पिढीपर्यंत पोहोचेल हे वैभव आपलं!
या लोकांच्या पालखीचे भोई व्हा! आपली ही संस्कृती टिकली, ही भव्य विचारधारा टिकली ,तरच ,तरच हा भारत टिकेल, नव्हे ही संस्कृती ,ही विचारधारा ,म्हणजेच भारत !नाहीतर या फक्त बाह्य पेहरावात अडकलात, तर भारत संपायला कितीसा वेळ लागेल ?आता फक्त पेहराव करू नका, नकाच करू पेहराव !पण त्या पेहरावाच्या आतली व्यक्तिमत्त्व, मनात जागी ठेवा! तोच त्यांचा सन्मान आहे .वरवरच्या देखाव्याला नको, तर मनाच्या तळापर्यंत पोहोचू द्या त्यांना .तर ती खरी जयंती होईल.

जयश्री शिवाजी कुलकर्णी ,
नाशिक 98 90 25 89 77

प्रतिक्रिया व्यक्त करा