जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी दीपक पटेकर यांचा मातीच्या घरात असणाऱ्या कोनाड्याच्या आठवणी जागृत करणारा लेख
कोनाडा
(आरसा घराचा)
“कोनाडा” म्हटलं की आजच्या नव्या पिढीला…सिमेंट काँक्रीटच्या जंगलात लहानाचे मोठे झालेल्या…..राहणाऱ्याला त्याचं ज्ञान असणे म्हणजे अलभ्य योगच म्हणावा. मंगलोर कौलारू, स्लॅबच्या घरातील भिंतीत कोरलेली कपाटेच गायब झालीत तिथे कोनाड्याला विचारणार कोण? साधारणपणे ३०/४० वर्षांपूर्वी पर्यंत गाव खेड्यात मातीच्या विटांची, माती भिजवून, कुसवून मातीचे पारे (भिंती) घातलेली घरे पहायला मिळायची. अशा घरांमध्ये बाहेरील पडवीमध्ये, माजघर जिथे अख्ख कुटुंब बसून जेवणावळी उठायच्या तिथे भिंतीमध्ये त्रिकोणी पंचकोनी असे वेगवेगळे आकार दिलेले कोनाडे असायचे. हे कोनाडे म्हणजे भिंतीमध्ये एखादा फूटभर रुंदीचा आठ दहा इंच जाडीचा “खण”. परंतु घरातील बरीचशी मंडळी आपल्या नित्य वापराच्या वस्तू जसे आरसे, कंगवे, पान-सुपारीचे डबे, अशा अनेक वस्तू त्यात ठेवायचे. जुन्या मातीच्या घरांमध्ये वीज ही नसायचीच….घरातील विजेचे मुख्य पॉवर स्टेशन म्हणजे हे कोनाडेच….
माजघरात, पडवीत चार एक फुटांवर असणाऱ्या कोनाड्यात बाटलीच्या झाकणाला भोक मारून चिंधीचा तुकडा घातलेला घासलेटचा दिवा असा काय जळायचा…. सारे घर त्यात दिपवून जायचे…इंद्राच्या स्वर्गालाही लाजवेल असाच सोनेरी प्रकाश असायचा त्या कोनाड्यात…..धुराचे लोट स्वतः झेलत अंग काळं काळं करत कोनाडा घराला सजवायचा…. तेजस्वी प्रकाशाने सतत हसवत ठेवायचा. कोनाड्यातील दिव्यांच्या प्रकाशावरच कित्येक सण साजरे व्हायचे….वराती मागून वराती निघायच्या….त्याच्या जेवणावळी देखील रात्र रात्र याच कोनाड्यातील प्रकाशात उठायच्या…
*दिव्यांची आरास तेव्हा*
*सजायची ती कोनाड्यात*
*राजांच्या महालात आणि*
*गोरगरिबांच्या झोपड्यात*
शाळेतून घरी येणारी पोरं असो वा शेती, कामधंदे आटोपून येणारी बाया, बापडे….आपल्या सर्वच गरजेच्या वस्तू पटकन सारायचे कोनाड्यात. जाता येता हाताला पटकन भेटतील अशी हक्काची जागा म्हणजे कोनाडा.
म्हणतात ना…..
*मनामध्ये असू द्यावा*
*आठवणींचा एक कप्पा*
*म्हणजे हव्या तेव्हा मारता येतात*
*दूर असलेल्यांशी गप्पा*
अगदी तसाच…. कोनाडा म्हणजे बालपणीच्या….जुन्या परिस्थितीतील आठवणींचा कप्पा. मुलींनी खेळायला जाताना काढून ठेवलेले कानातले रिंग….बायांची नाकातली नथ… आजही त्या कोनाड्यांमध्ये एकमेकांशी बोलत असेल…. शोधत असतील त्या निष्पाप मुलीना….कामांनी घामेजल्या बायांना..त्या मुलांनी आयुष्यातील कितीतरी स्वप्न जपून, सांभाळून ठेवली होती त्या कोनाड्यात…तीच स्वप्न उराशी घेऊन कोनाडा सुद्धा भक्कमपणे उभा असायचा….दिवसा काळोख झेलत तर रात्री तेजाने उजाळत….तर कधी शेजारच्या खुंटीला टांगलेल्या पिशवीकडे टकमक पाहत…कोनाडा जतन करत होता आनंदाचे, सुखाचे क्षण….
घाट माथ्यावर तर कोनाडे म्हणजे… गणेश चतुर्थीमध्ये श्रींच्या विराजमान होण्याचे सिंहासन…..त्यावेळी मात्र कोनाडे साफ व्हायचे….मातीच्याच रंगाने रंगले जायचे…वर चुन्याची टिकल्यांची रांगोळी…आणि या सजलेल्या कोनाड्यात गणराज देखील आशीर्वादाने हात वर करून बसायचे…उत्सव देखील आनंदात साजरा व्हायचा. कोनाड्याच्या एक ना अनेक आठवणी आज मनात घर करून आहेत. भल्या मोठ्या मातीच्या भिंतींना असणारे हे कोनाडे म्हणजे घराचा आरसाच…..घरात कोण आलंय, कोण बाहेर जाते हे कोनाड्यातून गायब असलेल्या वस्तूंवरून देखील समजून यायचं…म्हणून तर कोनाड्याला घरात अनन्यसाधारण महत्त्व असायचं..आजकाल कपाटाच्या, मेकअप टेबलच्या आरशात पाहून मेकअप केला जातो….परंतु त्या काळात युवती असो वा वयस्कर ..प्रत्येकाचं मेकअप टेबल म्हणजेच…..कोनाडा…कोनाड्यात आरसा उभा करूनच साजशृंगार केला जायचा…आरसा छोटा असला तरी अगदी गुडग्यापर्यंत वाढलेले काळेभोर केस….कोनाड्यातील आरशात मावत असायचे…जाड पिळदार वेणीमध्ये माळलेला मोगऱ्याचा गजरा असो वा आबोलीचा वळेसार…. कोनाड्यातील आरशात खुलून दिसायचा….आणि जणू काय…..कोनाड्यानेच साजशृंगार केल्याचा भास व्हायचा…
मातीचा असला तरी मायेचा उबदार स्पर्श होता…कोनाड्यात….
भिंतीत कोरलेला असला तरी… हृदयाचा ठाव मिळायचा कोनाड्यात…
दिव्यांच्या काजळीने काळवंडला असला तरी….. दिव्यांच्या प्रकाशानेच रात्री उजळायच्या कोनाड्यात…
छोटासा असला तरी…घरातल्या प्रत्येकाचा जीव घुटमळायचा… कोनाड्यात…
खरंच……
माणसाच्या मनातही असावा असाच एक कोनाडा…..जो जपून ठेवील आठवणी…भूतकाळातल्या….पुन्हा पुन्हा जागृत होण्यासाठी..
©【दिपी】
दीपक पटेकर, सावंतवाडी.
८४४६७४३१९६