You are currently viewing लोकसंत गाडगेबाबा आणि श्री दिगंबरदास महाराज : एक प्रसंग
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

लोकसंत गाडगेबाबा आणि श्री दिगंबरदास महाराज : एक प्रसंग

जागतिक साहित्य व्यक्तित्व विकास मंचचे सदस्य लेखक, कवी श्री लीलाधर दवंडे यांनी लिहिलेला कर्मभास्कर लोकसंत गाडगेबाबांच्या पुण्यतिथी, त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा अप्रतिम लेख.

*नाही केला चमत्कार*
*तरी झाला लोकसंत*
*माझ्या गाडगेबाबाचे*
*ऋण आहे रे अनंत*

संत तुकोबारायांनी म्हटलेच आहे “जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले l तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ll”. प्रस्तुत चरण ज्यांना तंतोतंत लागू पडतात आणि वैदर्भीय भूमीला ज्यांचा चरणस्पर्श लाभला अशा कर्मभास्कर लोकसंत गाडगेबाबांची आज २० डिसेंबर ही पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतींना उजाळा म्हणून त्याच्या आयुष्यातील अनेक स्मरणीय प्रसंगातील, आजपर्यंत बहुदा अनेकांच्या समोर न आलेला एक प्रसंग आपणासमोर मांडण्याचा माझा प्रयत्न, हीच त्यांना अर्पण खरी स्मृती सुमने.
अनेकांच्या कवितांतून, लेखांतून आपण त्यांच्याबद्दल बरीच माहिती वाचलेली आहे, ऐकलेली आहे. अनेक विद्यार्थी किंवा वाचक त्यांच्या जन्म आणि मृत्यूलाच अजूनही चिकटून असल्याने या थोर कर्मभास्कराचे आभाळाएवढे कर्तुत्व सामान्य नागरिकांपासून दूरच आहे. फक्त हातात खराटा घेऊन गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तन करून लोकांची मने स्वच्छ करायचे हेच यांना ठाव. परंतु, गाडगेबाबांचे कर्तुत्व याहूनही कितीतरी पटीने मोठे होते, हे जाणण्यासाठी विविध दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे.
ऑनलाईन सोशल मीडियावर सक्रिय असतांना अशीच एक पुस्तक हाती लागली आणि कधीही, कुठल्याही बाबा प्रेमींच्या मनाला बहुदा पटणार नाही ( तेवाचकांचे वैयक्तिक मत असेल ) असा प्रसंग त्यातून वाचनास मिळाला. हा प्रसंग आजच्या लेखात मांडणे खूप गरजेचे वाटले म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून येथे सर्व वाचकांसमोर मांडतो आहे आणि साहित्यिकांनी, वाचकांनी यावर अभ्यास करावा, कुठल्यातरी संशोधनातून यातील बाबी सर्वांसमोर प्रकट व्हाव्या असे वाटायला लागते, म्हणून केलेला हा लेख प्रपंच.
महाराष्ट्र ही संत महात्म्यांची, थोर पुरुषांची , शिव छत्रपतींची, विचारवंत, सत्पुरूषांची भूमी. अनंत काळाचा गौरवपूर्ण इतिहास या भूमीला लाभलेला आहे. अशाच संत महात्म्यांच्या मंदियाळीमध्ये एक नाव कोकणातील चैतन्यसूर्य श्री संत दिगंबरदास महाराज यांचे आहे.( लेख गाडगेबाबा यांच्यावर असल्याने दिगंबरदास महाराजांबद्दल जास्त लिहिणे यात अनिवार्य नाही)
लहानपणापासून वैराग्यमूर्ती असणारे दिगंबरदास महाराज कुशाग्र बुद्धीमत्ता, भाषा प्रभुत्व, मूलगामी विचार करण्याची क्षमता असे बहुगुणी होते.तरीही त्यांचे मन शिक्षणापेक्षा ईश्वर चिंतन, नामस्मरण, पूजा अर्चा, सत्पुरुषांची चरित्र वाचन यातच गुंतलेले असायचे. त्यावेळचे श्रीसंत नारायण महाराज केडगावकर यांचा आशीर्वाद त्यांना १२-१३ वर्षांचे असतांनाच लाभला होता. वडील श्री गणेशपंत हे श्रीरामाचे आणि श्री हनुमंताचे उपासक होते. दिगंबरदास महाराजांचे ( श्री विठ्ठल जोशी )  कुटुंब बरेच मोठे होते.
अध्यात्मिक ओढ असलेले दिगंबरदास महाराज पोरवयात असतांना श्री गाडगेबाबा कोकण दौऱ्यावर असतांना त्यांच्या भेटीचा सुवर्णयोग आला. रत्नागिरीला गेल्यावर बाबांचा मुक्काम बेर्डे आडनाव असलेल्या एका सद्गृहस्थाच्या घरी असायचा. गाडगेबाबा कुणालाही आपल्या पाया पडू द्यायचे नाही, हे सर्वज्ञात आहे. दिगंबर महाराजांनी वडिलांची परवानगी घेऊन बेर्डे यांचे घर गाठले. दिगंबरदासांनी मागच्या दरवाज्याने जाऊन बेर्डे यांच्या घरी एकांतात चिंतनात बसलेल्या गाडगेबाबांचे पाय धरले. तत्क्षणी गाडगेबाबा फार रागावले. ” कोण आहे ते? ठार मारून टाकीन! ” असे म्हणणाऱ्या गाडगेबाबांना दिगंबरदासांनी अत्यंत मृदू स्वरात “आपण मारलंत तर मोक्षच मिळेल” असे  भावपूर्ण उत्तर देताच गाडगेबाबांचे कोमल मन विरगळून गेले. बाबांचा राग सरून त्यांनी दासांना उराशी घट्ट कवटाळले. इतक्या लहान वयात इतकी मोठी समज म्हणून दासांचे कौतुक केले. यानंतर  दोघांमध्ये प्रेम वाढून वेळोवेळी झालेल्या भेटींत त्यांच्यात बरीच अध्यात्मिक चर्चा व्हायची असे ” श्री सदगुरू दिगंबरदास महाराज सेवा मंडळ, मुंबई ” द्वारा प्रकाशित “चैतन्यसूर्य श्री सदगुरु दिगंबरदास महाराज” या पुस्तकात म्हटल्या गेले आहे. गाडगेबाबांचा मुक्काम, मुंबईत आले असतांना बऱ्याचदा काळबादेवी परिसरात असायचा. त्यावेळी त्यांच्या दर्शनाला दास महाराज नेहमी जायचे. अनेकदा दोघेही गिरगाव चौपाटी, वरळीचा समुद्र किनारा किंवा एखाद्या निवांत स्थळी बसून चर्चा करायचे.
आता पुढील उताऱ्यात गाडगेबाबांनी दाखविलेला चमत्कार बघता साहित्यिकांनी, संशोधकांनी यात रस दाखवून माहिती गोळा करायला हवी, याच उद्देशाने प्रस्तुत लेख लिहिलेला आहे. यातून बरीच काही नवी माहिती समोर येऊ शकते. गाडगेबाबांचे कार्य सर्वज्ञात असले तरी दिगंबरदास महाराज म्हणजे पूर्व श्रमीचे श्री विठ्ठल गणेशपंत जोशी यांची गुरू परंपरा सुद्धा फार मोठी आहे. स्वामी समर्थांचे थोर शिष्य श्री बिडकर महाराज आणि बाबा महाराज सहस्रबुद्धे हे त्यांचे गुरू होते तर श्री काका महाराज हे महाराजांचे शिष्य होते. स्वातंत्र्य चळवळीत सुध्दा श्री महाराजांचा सहभाग होता तर काहींना त्यांनी  रत्नागिरी जिल्ह्यातील खानू या गावी श्री साई बाबांच्या रुपात दर्शन दिल्याचे वाचनात आले आहे. अनेक सामाजिक कार्य सुध्दा त्यांनी केले आहेत. डेरवण येथील प्रसिद्ध प्रती किल्ला असणारी शिवसृष्टी त्यांच्याच मार्गदर्शनात उभारली गेली आहे. प्रस्तुत पुस्तकाची ई बुक बुकगंगावर अधिक माहितीसाठी उपलब्ध आहे.याची नोंद घ्यावी.
असेच एका भेटी दरम्यान गाडगेबाबा आणि श्री दिगंबरदास महाराज वरळीच्या समुद्र किनारी निवांत बसले होते.त्यावेळी गाडगेबाबा अतिशय प्रसन्न होते. अचानक काय झाले कुणास ठाऊक, गाडगेबाबा श्री दास महाराजांना म्हणाले, ” मी तुला एक गंमत दाखवतो. बघ मी तुझ्यासमोरच आहे.” असे म्हणता क्षणी श्री दिगंबरदास महाराजांनी त्यांना बघण्यासाठी तोंड वर केले तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.काहीतरी वेगळे घडत असल्याचे त्यांना जाणवले. गाडगेबाबांचा देह हळूहळू मोठा होत जाऊन क्षणार्धात त्या देहाने अती विराट स्वरूप धारण केले. यानंतर ते म्हणतात की त्यांना दास महाराजांचे आराध्य दैवत श्री हनुमंताचे त्या महाकाय देहात दर्शन झाले. तो विशाल देह बघून श्री दास महाराजांचे देहभान हरपले. ते सद्गदित झाले. जणू काही भगवान श्रीकृष्णाने सारथ्य करतांना पार्थास विराट स्वरूप दाखवावे.जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांचे मस्तक गाडगेबाबांच्या मांडीवर होते. गाडगेबाबा माउली प्रमाणे त्यांना कुरवाळत होते. ही आठवण श्री दिगंबरदास महाराजांनी अनेकदा आपल्या शिष्यांना बोलून दाखवली होती.गाडगेबाबांच्या आठवणींनी त्यांना गहिवरून यायचे. गाडगेबाबांनी जनता जनार्दनातील खरा ईश्वर ओळखला म्हणून त्यांच्याप्रती श्री दास महाराजांना विलक्षण आदर होता. गाडगेबाबांनी त्यांना ” तुझा दाता मोठा आहे. तुला योग्य वेळी त्यांच्या दर्शनाचा लाभ होईल” असेही म्हटले असल्याचे यात नमूद केले आहे. यानंतर सुद्धा त्यांच्या भेटीगाठी झाल्या असाव्यात. पण, प्रस्तुत लेखात ही बाब सर्वांसमोर मांडणे मला योग्य वाटली म्हणून केलेला लेख प्रपंच येथेच थांबवतो आणि पुनश्च एकदा लोकसंत गाडगेबाबांच्या स्मृतींना अभिवादन करतो.

*अजूनही गाडगेबाबा*
*पूर्ण कुठे कळले आहे!*
*कारण आमचे काळीज*
*अज्ञानाने मळले आहे*
*शोध घ्या कर्तृत्वाचा*
*मिळेल अजून अमृत*
*आम्ही नुसते स्तुतीसुमने*
*साहित्यात उधळले आहे*
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
*लिलाधर दवंडे*
८४१२८७७२२०

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =