You are currently viewing आली वयाची पन्नाशी
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

आली वयाची पन्नाशी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या ज्येष्ठ लेखिका सौ भारती रायबागकर यांनी पाणी प्रश्नावर काम करणारे जलनायक “श्री. राजेंद्रसिंह” यांच्या जीवनावर आधारित लिहिलेल्या “जोहड” या सुप्रसिद्ध कादंबरीच्या लेखिका ^सुरेखा शहा^ यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त काढलेल्या “चंद्ररेखा” या गौरव ग्रंथात लिहिलेला अप्रतिम लेख

*साहित्य-सम्राज्ञी सुरेखा शहा*

*आली वयाची पन्नाशी*
*होते जीवाची कासाविशी*

असं म्हणत कांही जण पन्नाशीच्या आगेमागे उसासे टाकु लागतात…

“तेव्हां काय बाई, जेमतेम पन्नाशीचे आहेत, पण केवढे उसासे टाकताहेत.”
असं म्हणत त्या आपली लेखणी ऊचलुन लिहु लागत असाव्यात.

*साठी बुद्धी नाठी*
*हाती घेऊ काठी*

असं म्हणत कांही जण दुखणाऱ्या गुडघ्यांना कुरवाळत हाश्श् हुश्श् करत असतात तेव्हां…

“आधीच काळजी घेतली असती तर, बरं ठीक आहे, आतां उपाय करून घ्या” असं म्हणत त्या हातांत लेखणी घेऊन ‘कुठं बरं होतो आपण’ असं म्हणुन पुन्हां लिहायला सुरूवात करत असाव्यात.

*अवघे पाऊणशे वयमान* असलं तरी… *त्या अर्थाने नव्हे* … “आतां आमचं काय राहिलंय, काढदिवस हो आमचे आतां” असं म्हणत नाईलाजाने आयुष्य कंठत असणाऱ्यांना…

“कशाचे काढदिवस!” असं म्हणायची पद्धत असली तरी उगीच कां म्हणायचं! अजुनही मस्त जगता येईल”
असं म्हणत त्या पुन्हा आपल्या लेखणीला सोबत घेऊन मागील पानावरून पुढे चालत असाव्यात.

अर्थात हे सगळं आपलं मनांतल्या मनांतच म्हणत असाव्यात बरं! कारण प्रत्यक्ष बोलुन समजावत बसायला वेळ कुठे आहे! आणि तरीही समजुन घेतलं तर ठीक, नाहीतर… त्यापेक्षा आपलं लिखाण सुरू ठेवावं हे बरं!

वेगवेगळ्या प्रकारांतील अक्षरशः शेकड्यांनी पुस्तकं लिहुन, या घडीलाही पुस्तक लेखन चालु असणाऱ्या,आगामी पुस्तकांचे विषय मनांत घोळत असणाऱ्या, ऐंशीचा उंबरा
नुकताच ओलांडणाऱ्या *चिरतरुण* सुरेखाताईंबद्दल काय बोलावं!
काजव्याने सूर्याची स्तुती करण्यासारखंच आहे ते!

असं म्हणतात कीं वय ही फक्त एक संख्या आहे. त्या संख्येकडे पाहुन ‘अरे बापरे! इतक्या वर्षांचे झालोत आपण’ असं शरीराच्या पडझडीकडे पहात (झालीच असली तर) मनांतल्या मनांत खंत करत, कण्हत, कुंथत उर्वरित आयुष्य नाईलाजाने कंठत… इतरांच्या सहानुभूतीच्या विषय व्हायचं…कीं…

‘बस्स्…आत्तांशी इतकंच वय झालंय आपलं…अजुन बरंच कांही करायचंय, आणि ते आपण करूच असं स्वतःलाच ठाम आश्वासन देत, शरीरांतील वयोमानापरत्वे येणाऱ्या सर्व *साथीदारांना* सोबत घेऊन, रोज नव्या उमेदीनं नव्या कल्पना प्रत्यक्षांत उतरवत…भविष्यातील स्वप्न रंगवत…इतरांना ही ऊर्जा देत… आयुष्य मजेत जगायचं…

( *साथीदार*असलेच तर…नसले तर सोन्याहून पिवळं…*साथीदार* म्हणजे बी.पी, हृदयविकार, मधुमेह इत्यादी आणि त्यासोबत येणाऱ्या गोळ्या इंजेक्‍शन वगैरे )

थोडक्यांत
मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत… *सांगा कसं जगायचं*
*कण्हत कण्हत की गाणं म्हणत*
*तुम्हींच ठरवायचं*

सुरेखाताई या दुसऱ्या प्रकारात अगदी फिट्ट, चपखल बसतात.
त्यांचं स्वतःभोवतीचं साहित्याचं, सामाजिक कार्याचं, कौटुंबिक कर्तव्याचं आणि अनेक उत्तुंग कार्यांचं तेजोवलय इतकं सुरेख आहे की त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात येणाऱ्यांना तर *फुलासंगे मातीस वास लागे* या उक्तीप्रमाणे त्यातून ऊर्जा लाभत असेलच, पण त्यांच्या समग्र कार्याचा अप्रत्यक्ष परिचय…त्यांच्या पुस्तकांमार्फत, त्यांच्या आप्तस्वकीयांमार्फत कर्णोपकर्णी झालेल्यांना सुद्धा… *दूरवरून येणाऱ्या वाऱ्याच्या सुगंधी झुळुकीमुळे सुद्धां कसं प्रसन्न वाटतं* तशी प्रेरणा मिळाल्याशिवाय रहात नसेल.
विशेषतः ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्यांना’ नक्कीच आत्मपरीक्षणाची जाणीव होत असेल.

या साहित्यसम्राज्ञीच्या साहित्य दरबारांतील मानकरी तरी कोण कोण आणि किती किती आहेत पहा..
कथा ,कादंबऱ्या, काव्यसंग्रह, ललित लेखन, एकांकिका, चरित्रलेखन, नाटके, कविता, महानाट्य, अनुवाद, कुमार साहित्य, पथनाट्य, प्रवास वर्णन, चरित्र कादंबऱ्या हे सर्व प्रमुख सरदार तर आहेतच, पण त्यांतही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक, रहस्यमय, विनोदी असे विविध उपप्रकार असणाऱ्या, आपापल्या मानाप्रमाणे सरदार, दरकदार अधिकारी इत्यादिकांनी त्यांच्या दरबाराची शोभा अनेक पटीने *सुरेख* रित्या वाढवली आहे. आणि या सर्व मानकऱ्यांना अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांनी दरबारात हजर करण्याचा मान मिळविला आहे.

अबब!
ही दरबाऱ्यांची यादी मी लिहुन आणि तुम्ही वाचुन…दमलांत ना! तरीही कोणी राहुन तर गेलं नाही ना अशी भीती वाटतेय मला.

*जोहड* ही जलसंकटावरील जलनायक श्री. राजेंद्रसिंहजी यांच्या जीवनचरित्रावरील कादंबरी म्हणजे या दरबारी मानकऱ्यांची प्रमुख!
अनेक आवृत्त्या, अनेक भाषिक वृत्तपत्रांत प्रशंसा, अनुवाद, भाषणं कार्यशाळा, निबंध स्पर्धा,एम.फिल.
चर्चासत्रं, मुलाखती,विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांत समावेश, समीक्षा, ऑडिओ कॅसेट, दूरदर्शन मालिका, चित्रपटांसाठी विचारणा, प्रबंधासाठी विषय निवडणे, लक्षवेधी पुस्तकाचा सन्मान, जनसामान्यांची आणि लब्ध प्रतिष्ठितांची मनःपूर्वक पसंती या सर्व लहान-मोठ्या अलंकारांबरोबर अनेकानेक पुरस्कारांच्या, ठेवणीतल्या अनमोल अलंकारांनी सालंकृत झालेली *जोहड* ही कादंबरी म्हणजे या दरबारातील प्रधानमंत्री! बरोब्बर?

आणि हो म्हटलं नं कांहीतरी राहिलंय…

जणूं कांही एखाद्या प्रेरक दैवी संकेतामुळे श्रावणसरीसारखं अतिशय उत्स्फूर्तपणे सुचलेलं…अत्यल्प अवधीत लिहून अप्रतिमरीत्या सादर केलेलं…जनसामान्यांपासुन विद्वज्जन आणि प.पू. गुरुवर्यांनी गौरवलेलं… गोमटेशाच्या समग्र जीवन-दर्शनावरील…तरल, सुंदर, समर्पक अशा मौक्तिकाक्षरांनी सजलेलं खंडकाव्य…

*गीत-गोमटेश*

*होता सहस्त्रक – प्रतिमेस पूर्ण*
*गीत गोमटेश – उस्फुर्त* *लिहून

*करी वाखाणणी – *विद्यानंदी मुनी*
*लेखणीला बळ – आशिष मानुनी*

*संगीतिका रुपे – शब्द *पुष्पांजली गोमटेश पायी-*नमुनी अर्पिली*

असं हे भावकाव्य म्हणजे सुरेखा ताईंच्या शिरपेचांतील मानाचा तुरा! खरं ना?

सुरेखाताईंच्या साहित्याच्या सर्वच क्षेत्रांतील, हे अफाट, अचाट लिखाण पाहून एक गंमतीदार विचार मनांत येतो. लहान वयांतच विवाह झालेल्या ताईंनी जैन धर्मांतील सर्व कर्मठ आचार विचारांचे पालन करून गृहिणीची, मुलांच्या यथोचित संगोपनाच्या वेळी, कर्तव्यकठोर पण ममताळू मातेची, आणि प्रसंगानुरूप इतर अनेक भूमिका निभावतांना इतका वेळ लिखाणासाठी कसा बरं काढला असेल! कीं त्यांच्या हातालाच पेन चिकटलेला आहे बोटासारखा! आणि कागद…? ते तर लेखकांच्या घरांत ठायी ठायी दिसतच असतात. सुचलं कीं लिहिलं जेव्हांच्या तेव्हां…जिथल्या तिथे!
‘आवड आहे तिथे सवड आहे’, किंवा ‘घरच्यांचा भरघोस पाठिंबा’ वगैरे वस्तुस्थिती अगदी खरीही असेल, पण सतत वेगवेगळ्या विषयांच्या लिखाणाचे विचार डोक्यांत घोळत असतांना इतर सर्व कर्तव्यांनाही योग्य न्याय द्यायचा म्हणजे मन, बुद्धी, शरीर,अचुक निर्णय क्षमता, अशा सगळ्यांचाच समर्थ मेळ साधायला हवा.

सुरेखाताईंचे लिखाण कधीही एकसुरीपणाकडे झुकत नाही. नवरसांतील सर्वच रसांनी त्यांचं लिखाण ओतप्रोत ओथंबलेलं असतं. त्यांच्या लिखाणांत मिश्कीलपणा आढळतो तसेच पुरेपुर गांभीर्यही असते. कधी विनोदाचा बाज तर कधी वैचारिकता. तिथे त्यांच्या वयाचा किंवा व्यक्तिमत्वाचा अडसर अजिबातच येत नाही.

शिवाय आपल्या लेखणीशी आधुनिक तंत्रज्ञानाचा सकारात्मक मेळ घालून इ. बुक, ऑडिओ कॅसेट, ब्रेल-लिपीत प्रकाशन करून आपण कालसुसंगत वाटचाल करण्यात पाऊलभरही मागं नाही असं सुरेखाताईंनी तरुणाईच्या तडफदारपणानं दाखवुन दिलं आहे.
बरं, त्यांचं हे सामर्थ्य फक्त लिखाणा पुरतंच मर्यादित आहे असंही नाही. *अनेकानेक* संस्थांची *अनेकानेक* पदं भूषवुन त्यासंबंधांत भरघोस कार्य करून त्यांनी त्यांची शोभा वाढवली आणि खरंतर त्या संस्थांचाच गौरव वाढवला.
अर्थात् ह्या सर्व बहुमोल कार्यांबद्दल त्यांना सन्माननीय पुरस्कार न मिळते तरच नवल! त्यासाठीही फक्त *अनेकानेक* हाच शब्द मला योग्य वाटतो.

*विद्वत्तेचं नृपत्वंच*
*न एव तुल्ये कदाचन*
*स्वदेशे पूज्यते राजा*
*विद्वान सर्वत्र पूज्यते*

त्यांच्या मनांतील सर्व संकल्प, त्यांचे ईप्सित लवकरांत लवकर पूर्ण होवोत. आणि आणखी नवे संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा मी व्यक्त करते.

त्यांच्यासाठी ही शब्द-पुष्प-ओंजळ
वहाण्याची संधी मला

सुरेखाताईंचे वाचन,लेखन-
पाठीशी शोभे बंधू *चंद्रमोहन*

यांच्यामुळे लाभली, हे माझं सौभाग्य…पण माझा या दोघांशीही प्रत्यक्ष परिचय नसतांना चंद्रमोहनदादांनी हे काम माझ्यावर सोपवलं आणि सुरेखाताईंच्या शब्दशिल्पांत यथायोग्य रंगाकार वापरून, त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा मी यथाशक्ती प्रयत्न केला. त्यांत कांही त्रुटी राहिल्या असतील तर क्षमस्व.

*अशा या*…
*सुरेख दिसणाऱ्या*…
*सुरेख बोलणाऱ्या*…
*सुरेख लिहिणाऱ्या*…
*सर्वार्थानं सुरेख असणाऱ्या*…
*आदरणीय सुरेखाताईंना*… *भारतीचा*
*सादर प्रणाम*

सौ.भारती महाजन-रायबागकर, चेन्नई
bharati.raibagkar@gmail
9763204334

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × one =