You are currently viewing लेक अभागिनी माझी

लेक अभागिनी माझी

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची हृदयस्पर्शी काव्यरचना

लेक अभागिनी माझी
नाही संपत्तीत वाटा
गर्भामध्ये मारूनिया
तिचा काढतात काटा..।

लेक अभागिनी माझी
तिला सगळी बंधने
पुत्र मुक्त विहरतो
नसे मुलीस स्पंदने..।

लेक अभागिनी माझी
चूल फुके रांधे वाढे
स्वतः उपाशी राहून
इतरांची उष्टे काढे..।

लेक अभागिनी माझी
नाही मागते आहेर
तिचं सासर वाटते
तीला मुलीचं माहेर..।

लेक अभागिनी माझी
ओढे सासरची गाडी
चितेवर जाण्याआधी
नेसे माहेरची साडी..।

लेक अभागिनी माझी
बाप पोरांचा आधार
कुणी नाही तिच्यासाठी
तिच एक निराधार..।

लेक अभागिनी माझी
पाप पूर्वी जन्मातले
भोग भोगावयासाठी
तिला जन्मास घातले..।

लेक अभागिनी माझी
जोवर असे सौभाग्यवती
समाजात वावरतांना
मान मिळे पदोपदी..।

लेक अभागिनी माझी
कुंकू नसता कपाळी
विधवेला दारोदार
भिक मागायची पाळी..।

लेक अभागिनी माझी
जशी आकाशात घार
सर्वांनी शांत निजावे
तिने राखावे दार…।

लेक अभागिनी माझी
नाही मागत आहेर
तिचं सासर वाटते
तिला मुलीचं माहेर..।

 

✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =