You are currently viewing संस्काराने घडतो मानव..

संस्काराने घडतो मानव..

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.अनिता व्यवहारे यांचा अप्रतिम लेख*

 

 

*संस्काराने घडतो मानव.*

 

“सत्यम शिवम सुंदरम यांचा हृदयंगम संगम म्हणजे संस्कृती.”

पण मागच्या आठवड्यापासून या संस्कृतीला हृदयाच्या एका कप्प्यात बंद ठेवून पाश्चात्य संस्कृतीने धुमाकूळ घातला आहे. जिकडे पहावं तिकडे डोळ्यांना दिसत ही तेच. कानाला ही तेच ऐकू येतं, बोलायला ही तोच विषय.जणू गांधीजींच्या तीनही माकडांनी देखील या विषयावर गांधीजींचे तत्व सोडून वागायचे ठरवलय असंच वाटतं. हे सगळे विचार मनात खळबळ माजवत असताना अचानक…

एफ एम वर

संस्काराने घडतो मानव…

 

हे गीत ऐकायला मिळाले आणि मग विचारचक्र वेगळ्याच दिशेला भिरभिरू लागले. संस्कार केवळ साडेतीन अक्षरांचा शब्द. पण प्रत्येकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा. फार मोठा व गहन शब्दाचा अर्थ.

प्रत्येक आईच्या पोटी जन्मलेल्या बालकावर सर्वप्रथम आई वडिलचं संस्कार करत असतात.

संवेदनशील बालमन या वयात झालेल्या संस्कारांना आयुष्यभर सोबत घेऊन दिव्य प्रकाश पसरविण्याचे काम करतात.

म्हणूनच प्रत्येक आई-वडिलांना संस्कारातल्या छोट्यातल्या

छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. याकडे थोडं जरी दुर्लक्ष केलं तरी आयुष्यातील एखाद्या मोठ्या लक्ष्यापासून त्यांना वंचित रहावं लागतं म्हणून आई-वडिलांचं सुसंस्कृत असणं अगत्याचं आहे.

बालपणी ज्यांच्यावर चांगले व टिकाऊ संस्कार होतात त्याच व्यक्ती पुढे योग्य मार्गाने वाटचाल करुन प्रगतीच्या शिखरावर जाऊन पोहोचतात..

म्हणून आई वडिलांचे संस्कार हे पैलू पाडणारे असावेत…

खरं तर विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर स्त्रीच्या उदरात असतानाच मूल बाहेरच्या जगाचा कानोसा घेत असतं असं म्हणतात. अगदी गर्भावस्थेत संस्कारांचे महत्त्व बालकावर घडत असतात.

महाभारतातील वीर पुत्र अर्जुन आणि सुभद्रा यांचा पुत्र अभिमन्यु याच्यावर आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान संस्कार झालेले होते….. पण ते संस्कार अपुरे राहिले…

 

त्यामुळे अभिमन्यु चक्रव्यूहात फसला……

 

या संस्कारा बद्दल सांगताना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात,

पोटात असता जीव पडोन

जतन करावा संस्कारे

संस्कार दुष्परिणाम कारी न पडावे आतिल गर्भावरी

म्हणोनि मात्या पित्यांनी

सदाचारी रहावे सद्भावे

येथोनि पाहिजे जतन केले

पुढे मुलं जन्मासी आले तेव्हा पासोन संस्कार घडले पाहिजेत सत्कर्माचे.

संस्कार हे आत्मयज्ञ, आत्मा उन्नतीचे प्रेरक असतात.

ते कधी ही धर्म, जाती स्त्री-पुरुष, गरीबी श्रीमंती याच्या आड येत नाही.

माणूस जन्मता शुद्र असतो पण तो संस्कारामुळेच द्विज होतो.

तसं पाहिलं तर प्रत्येक माणसाचे दोन जन्म एक जन्म प्रकृतीचा म्हणजे आई-वडिलांपासून झालेला. आणि दुसरा संस्कृतीचा म्हणजे संस्कृतीमुळे झालेला. वेश्येच्या उदरी जन्म घेऊनही वशिष्ठ तपश्चर्येने विप्र झाले. तद्वतच मानव जन्माचे सार्थक होण्यासाठी लहानपणापासून चांगल्या संस्कारांची आवश्यकता असते. संस्कारा शिवाय माणसाला खरं मनुष्य पण येत नाही. तेच संस्कार व्यक्तीवर बालपणापासून झाले तर ते आयुष्यभर आधारभूत राहतील.

त्यानंतर बाल्यावस्थेतील या संस्काराप्रमाणे भोवतालच्या आजूबाजूची कुटुंब परिस्थिती आणि शालेय वातावरण यातून होणारे संस्कार ही तितकेच महत्त्वाचे आहेत. आपल्या संस्कृतीत “मातृ देवो भव, पितृ देवो भव, आचार्य देवो भव” असं मानलं जातं.

आई-वडिलांबरोबर गुरुजनांवर ही जबाबदारी दिलेली असते. पण हल्ली पाश्चात्य अंधानुकरण यामुळे आई-वडील यांच्यात मतभेद, घटस्फोट…..या गोष्टी घडतात. आणि त्यामुळे मुलांवर काय संस्कार होणार? असा प्रश्न उद्भवतो. आपल्या संस्कृतीत विवाहहा करार नसून एक तो एक पवित्र संस्कार….. केवळ पती-पत्नीच्या प्रेमासाठी विषय सुखासाठी नसून तो मुलाबाळांवर सुसंस्कार करण्यासाठी आहे हे पाश्चात्यांनाही पटले पण आपण मात्र…

माणसांमध्ये देवाने दिलेल्या संवेदना, भावना, वासना, प्रेम या सर्वांचा मेळ परमेश्वराने घालून दिला असताना सुद्धा, माणसाचं वर्तन बिघडत चालले आहे. त्यामुळे आदर्शाच लोणचं होताना दिसते.

 

मनामनातून एकच श्रद्धा दैवते जरी असतील वेगळी

निरनिराळे धर्म भाषा आमची तरी संस्काराची एकच पातळी

 

भारतीय संस्कृती आपल्याला कृतज्ञता शिकवते. एकतेचा संस्कार दूर करणारी संस्कृती. निर्जीव वस्तू बाबतही संवेदनशीलता हे आपल्या संस्कृतीचे खास वैशिष्ट्य.

दगडात देव नाही म्हणत दगडाला देव मानणारे आपण…. परमेश्वराच्या नामस्मरणात, चिंतनात वेळ घालवतो तेव्हा आपोआप सुसंस्कारित मन तयार होतं आणि घर, समाज, राष्ट्र, जग अशा परिघातून ते धावत घेतं. आणि संस्काराला मध्यबिंदू मानलं जातं. आणि मग त्यापासून होणारे फायदेही व्यापक होतात..

म्हणूनच संस्कार हे मानवी जीवनाचा आणि जगण्याचा अविभाज्य घटक आहे…

संस्कार हे मानवतेचा महामार्ग…..

या मार्गाने गेला तरच

 

माणसाने माणसाशी माणसासम वागणे.

हे बुद्धीला पटून संस्काराने घडतो मानव..

यात यथार्तता आहे असचं वाटेल….

♾️♾️♾️♾️🔹⭕🔹♾️♾️♾️♾️

*सौ अनिता व्यवहारे*

ता श्रीरामपूर जि अहमदनगर

➖➖➖➖☘️✍️☘️➖➖➖➖➖

प्रतिक्रिया व्यक्त करा