You are currently viewing इचलकरंजीवासियांची बैलगाडी जथ्यासह सौंदत्ती रेणुका देवी दर्शनाला जाण्याची धार्मिक परंपरा आजही कायम

इचलकरंजीवासियांची बैलगाडी जथ्यासह सौंदत्ती रेणुका देवी दर्शनाला जाण्याची धार्मिक परंपरा आजही कायम

 

इचलकरंजी येथून सजवलेल्या बैलगाडी जथ्यासह अनेक भाविक सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी आज रविवारी सकाळी रवाना झाले. तत्पूर्वी, शहरातील विविध ठिकाणाहून सुमारे २५ बैलगाड्या पंचगंगा नदी तिरावर एकत्र जमा आल्या. त्याठिकाणी त्यांचे विधीवत पूजन करुन रेणुका देवीचा जयघोष करत त्या सौंदत्ती डोंगराकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी धार्मिक वातावरण निर्माण होवून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.दरम्यान, यानिमित्ताने इचलकरंजी वासियांची बैलगाडी जथ्यासह सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा व दर्शनासाठी जाण्याची धार्मिक परंपरा कायम असल्याचे अधोरेखित झाले आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा यासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धार्मिक क्षेत्र सौंदत्ती रेणुका देवीची यात्रा नुकतीच पार पाडली. पण, कोरोना व ओमिक्राँनच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयानुसार व प्रशासनाच्या आदेशानुसार सौंदती देवस्थान समितीने सर्व निर्बंधाचे काटेकोर पालन करत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत रेणुका देवीची विधीवत पूजाअर्चा, आरती व प्रसाद वाटप करुन यात्रा पार पाडली. असे असले तरी प्रशासनाने आता सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांना काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आज रविवारी सकाळी इचलकरंजी येथून सजवलेल्या बैलगाडी जथ्यासह अनेक भाविक सौंदत्ती रेणुका देवीच्या दर्शनासाठी रवाना झाले. तत्पूर्वी शहरातील विविध ठिकाणाहून बैलगाड्या पंचगंगा नदी तिरावर एकत्र जमा आल्या. त्याठिकाणी त्यांचे विधीवत पूजन करुन रेणुका देवीचा जयघोष करत त्या सौंदत्ती डोंगराकडे रवाना करण्यात आल्या. यावेळी धार्मिक वातावरण निर्माण होवून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.इचलकरंजी ते सौंदत्ती रेणुका देवस्थान डोंगर हा साधारण १७० किलोमीटर अंतराचा प्रवास आहे. त्यामुळे भाविकांना बैलगाडीतून प्रवास करत या डोंगरावर पोहचण्यासाठी दररोजचा ७ ते ८ तासांचा असा साधारण ४० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागतो.

यासाठी चार दिवसांचा कालावधी लागतो.या प्रवासा दरम्यान सजवलेल्या बैलजथ्यामध्येच स्वयंपाकासाठी लागणारे सर्व गरजोपयोगी साहित्य व जनावरांसाठी चा-याची व्यवस्था केली जाते. ज्याठिकाणी रात्री मुक्काम ठरलेला असतो, त्याठिकाणीच स्वयंपाक करुन यात्रेकरु विश्रांती घेत मुक्काम ठोकतात. दुस-या दिवशी सकाळी लवकर उठून ठरलेला पल्ला गाठण्यासाठी यात्रेकरु भाविक रेणुका देवीचा जयघोष करत पुढच्या मार्गाकडे रवाना होतात.

या यात्रेच्या प्रवासामध्ये पहिल्या दिवशी इचलकरंजीमार्गे सदलगामार्गे चिकोडीमध्ये पोहचून त्याठिकाणीच रात्रीचा मुक्काम केला जातो. तसेच दुसऱ्या दिवशी बागेवाडीमार्गे गोकाकमध्ये पोहचून मुक्काम, तिस-या दिवशी गोकाक मार्गे यरगट्टीमध्ये पोहचून मुक्काम आणि चौथ्या दिवशी मन्नोळी – सौंदती रेणुका देवस्थान डोंगरमध्ये पोहचून हा प्रवास संपतो. त्यानंतर दोन दिवस त्याठिकाणीच भाविक रेणुका देवीसह अन्य देवी – देवतांचे दर्शन घेत काही काळ विश्रांतीसाठी मुक्काम ठोकतात. या दरम्यान रेणुका देवी देवस्थान डोंगरावरील भक्तीपूर्ण वातावरणामुळे यात्रेकरु भाविकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण पसरलेले असते.पुन्हा बैलगाडी यात्रेकरुंचा परतीचा प्रवास आलेल्या मार्गानेच सुरु होवून इचलकरंजीत पंचगंगा नदीतिरावर पोहचण्यासाठी चार दिवसांचाच कालावधी लागतो.यानंतर या बैलगाड्या इचलकरंजी शहराच्या हद्दीतील पंचगंगा नदी तिरावर मुक्काम ठोकतात. याठिकाणी सौंदत्ती रेणुका यात्रा करुन आलेल्या बैलगाडी व यात्रेकरुंच्या उपस्थितीत सलग दोन ते तीन दिवस रेणुका देवीची मोठी यात्रा भरते. या यात्रे दरम्यान विविध ठिकाणी उभारलेल्या मंडपात रेणुका देवी मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात येते. यावेळी इचलकरंजी शहर परिसरातील भाविक देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. तसेच यात्रा भरलेल्या परिसरात उभारण्यात येणारे पाळणे, झोपाळे यासह विविध मनोरंजनाच्या साधनांचा आस्वाद घेतला जातो.

याशिवाय विविध खेळणी व खाद्यपदार्थांचे देखील स्टाँल उभारण्यात येत असल्याने याठिकाणी देखील भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. पण, यंदाच्या वर्षी नुकताच झालेल्या यात्रेनंतर केवळ रेणुका देवीच्या दर्शनासाठी सौंदत्ती देवस्थान डोंगराकडे बैलगाडींसह यात्रेकरु रवाना होत असल्याचे दिसत आहे. यातून देखील भाविकांचा भक्तीभाव व अमाप उत्साह दिसून येत आहे.

इचलकरंजी शहरातून सजवलेल्या बैलगाडी जथ्यासह सौंदत्ती यात्रेला जाण्याची यात्रेकरुंची खूप जुनी धार्मिक परंपरा आहे. त्या काळात दळणवळणाच्या फारशा सुविधा उपलब्ध नसल्याने नुसत्या इचलकरंजी शहरातून सुमारे ५० ते ५५ सजवलेल्या बैलगाड्या सौंदत्ती रेणुका यात्रेसाठी रवाना व्हायच्या. पण कालांतराने दळणवळणाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्याने ही संख्या आता २८ बैलगाड्यांच्या आसपास पोहचली आहे. असे असले तरी आजच्या घडीला देखील सजवलेल्या बैलगाड्यांमधून सौंदत्ती रेणुका यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा भक्तीपूर्ण उत्साह पूर्वीसारखाच कायम टिकून आहे. त्यामुळे या बैलगाडी यात्रेचे वेगळेपण हे देखील भक्तीभावाचे पवित्र दर्शन घडवणारे आहे.याबाबत गुरुकन्नननगर गल्ली नंबर दोनमधील रेणुका देवीचे भक्त क्रुष्णात खोत यांनी कुटूंबासह दरवर्षी बैलगाडीतून सौंदत्ती रेणुका यात्रेला जाण्याची ही आमची ५० वर्षांहून अधिक काळची परंपरा असून यामध्ये आमची ही आता दुसरी पिढी आहे. आमचे वडील बाळू खोत हे १९७१ सालापासून कोणताही खंड न पाडता बैलगाडीतून सौंदत्ती रेणुका यात्रा करत होते. पण त्यांच्या निधनानंतर ही परंपरा आम्ही कायम राखली आहे. यासाठी बंधू सुनील खोत, भाचे अजय दशवंत यांच्यासह आई, पत्नी, भावजय, बहिण, भाचे, मुले, पुतणे यांचे चांगले सहकार्य लाभत असल्याचे सांगितले. यातून इचलकरंजीवासियांची सौंदत्ती रेणुका देवीवरील अतूट श्रद्धा व तिच्या दर्शनासाठी यात्रेकरुंचा अजूनही असलेला कायमचा अमाप उत्साह हा धार्मिक परंपरा जोपासणारा असल्याचे दर्शन घडवणारा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − ten =