You are currently viewing प्रसिद्ध गायक बप्पी लहरी उर्फ ‘बप्पीदा’ यांचे निधन

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी उर्फ ‘बप्पीदा’ यांचे निधन

आपल्या आवाजामुळे आणि संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक काळ गाजवणारे ज्येष्ठ गायक बप्पी लहिरी यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते ६९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून बप्पी लहिरी यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बप्पी लहिरी यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९५३ झाला होता. १९७३ सालच्या ‘नन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पण त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळायला १९८२ साल उजाडावे लागले. १९८२ मध्ये आलेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटामुळे बप्पी लहिरी प्रकाशझोतात आले. त्यानंतर बप्पी लहरी यांनी अनेक चित्रपटांमध्ये गायक आणि संगीतकार म्हणून काम केले.

बप्पी लाहिरी यांच्या पश्चात पत्नी चित्रानी लहिरी आणि त्यांची मुलगी – गायिका रेमा लहिरी बन्सल असा परिवार आहे. २०२० मध्ये बप्पी लाहिरी यांना कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कँडी रुग्णालयात काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मातही केली होती. बप्पी लहिरी यांचे मूळ नाव आलोकेश लहरी असे होते. सत्तरीच्या दशकात बप्पी लहिरी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतक्षेत्रात अनेक नवे प्रयोग केले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीला रॉक आणि डिस्को संगीताची ओळख करून दिली. बप्पी लहिरी यांना सोन्याचे दागिने घालण्याची प्रचंड आवड होती. यासाठीही ते प्रसिद्ध होते. बप्पी लहिरी यांनी आपल्या कारकीर्दीत अनेक हिट गाणी दिली. ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘शराबी’ या चित्रपटांमधील त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी लोकप्रिय ठरली. ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे २०२० मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी ३ चित्रपटात ऐकायला मिळाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा