You are currently viewing गहनौ कर्म गति

गहनौ कर्म गति

 

कावळा बसायला व फांदी मोडायला एक गाठ’ अशी मराठीत एक म्हण आहे.कावळा बसला म्हणून फांदी मोडली नाही,तर फांदी मोडायलाच आली होती,कावळा बसल्याचे फक्त निमित्त झाले एवढेच.याचाच अर्थ असा,की कावळा बसला नसता तरी फांदी मोडलीच असती कारण ती मोडायलाच आली होती.त्याचप्रमाणे *पापी माणसे मजेत व ऐश्वर्यात असतात असे जे दिसते त्याचे कारण ते पाप करतात म्हणून मजेत व ऐश्वर्यात असतात असे नव्हे.काळाबाजार,स्मगलिंग,चोरी,दरोडेखरी वगैरे वाम मार्गाने अमाप पैसा मिळविणारे पापी लोक हे ते पापाचरण करतात म्हणून चैनीत व ऐश्वर्यात नांदतात असे नव्हे.चैन व ऐश्वर्य त्यांच्या वाट्यास आलेले असते ते केवळ त्यांच्या पूर्व सुकृताचे फळ असते.त्यांचे पापाचरण हे केवळ निमित्त असते.त्यांनी ते पापाचरण केले नसते तरी त्यांना वैभव व ऐश्वर्य अन्य चांगल्या मार्गाने संपत्ती प्राप्त होऊन मिळालेच असते.* उदाहरणार्थ, त्यांना डर्बी लॉटरी किंवा महाराष्ट्र बंपर लॉटरी लागली असती किंवा त्यांचे कोणी दूरचे किंवा जवळचे काका,मामा वगैरे मरून त्यांची संपत्ती त्यांना मिळाली असती. *उलट पापाचरण करून ही मंडळी ईश्वरी बँकेतील त्यांच्या खात्यात असणारी पुण्य संपत्ती मोठ्या प्रमाणावर घटवितात व त्या ईश्वरी बँकेत मोठ्या प्रमाणावर पापांचा संचय जमा करतात.परिणामी वैभवाचे व ऐश्वर्याचे दिवस लवकर संपून त्यांचा सर्वनाश होतो.शिवाय वरकरणी हे लोक सुखात व ऐश्वर्यात आहेत असे जरी दिसले तरी प्रत्यक्षात मात्र* *काळजी,चिंता,भीती,मन:स्ताप,निद्रानाश वगैरे प्रकारांनी ते घेरलेले असून त्यांच्या जीवनरूपी घराला आतून दुःखाची घरघर सुरू झालेली असते.त्याचप्रमाणे सज्जन माणसे दुःखात व हालात दिवस काढतात,याला कारण त्यांचे पूर्वसंचितच तसे असते.परंतु ही मंडळी जी सत्कर्मे करीत असतात त्यामुळे एका बाजूने त्यांच्या पूर्वपापांचा जोर मोठ्या प्रमाणावर कमी होतो व दुसऱ्या बाजूने ईश्वरी बँकेत पुण्याची संपत्ती जमा होत जाऊन त्यांना पुढे सुखाचे दिवस दिसतात.म्हणून “गहनौ कर्म गती:’अशी म्हण आहे.कर्मांची गती अति गहन आहे असे म्हणतात ते सार्थ व यथार्थ आहे.म्हणूनच हा सिद्धांत नीट लक्षात घेऊन कर्मगतीला ऊर्ध्वगती देऊन आपले परम कल्याण साधावयाचे की कर्म प्रवाहात पडून प्रवाहपतीतासारखे कोठेतरी वाहत जाऊन अधोगती प्राप्त करून घ्यावयाची हे ज्याचे त्यानेच ठरवायचे असते,देवाने किंवा दैवाने नव्हे.म्हणून “आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत” हा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत नीट लक्षात घेऊन खालील ‘मंत्र’ आचरणात आणण्यासाठी सदैव स्मरणात ठेवणे व्यक्तीच्या,समाजाच्या,राष्ट्राच्या व विश्वाच्या दृष्टीने हितावह आहे.*

 

*“Think good, Wish good,*

*Speak good and Do good.”*

 

*शुभ चिंतावे,शुभ इच्छावे,वचनी शुभ बोलावे।*

*सत्कर्माच्या पुण्याईने नर जन्माचे सार्थक करावे।।*

 

🙏~सद्गुरु श्री वामनराव पै.🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा