You are currently viewing कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष

कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष

आफ्रिन करोल नगराध्यक्षा … महाविकास आघाडीचा जल्लोष

कुडाळमध्ये आज सकाळी महाविकास आघाडीचे नगरसेवक आमदार वैभव नाईक यांच्या गाडीतून नगरपंचायत आवारात आले असता भाजपाच्या मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना रोखत हायव्होल्टेज ड्रामा निर्माण करत नगराध्यक्ष निवडीमध्ये गंभीर वातावरण निर्माण केले होते.
आमदार वैभव नाईकांसह कार्यकर्ते व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या गोंधळातून मार्ग काढत निवडणुकीला सामोरे गेले आणि झालेल्या नगराध्यक्ष निवड प्रक्रियेत महाविकास आघाडीच्या उमेदवार आफ्रिन करोल या विजयी झाल्या तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. महाविकास आघाडीकडे मताधिक्य होतंच, परंतु आमचाच नगराध्यक्ष बसणार असे भाजपाचे लोकप्रतिनिधी मोठ्या उत्साहात सांगत असल्याने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत उत्सुकता निर्माण झाली होती.
महाविकास आघाडीच्या आफ्रिन करोल यांची निवड जाहीर होताच कुडाळातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला आणि मोठ्या संख्येने चमत्कार घडणार या आशेने जमलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरल्याचे चित्र कुडाळ बाजारपेठेत दिसून आले. नारायण राणेंची सत्ता असलेली कुडाळ नगरपंचायत अखेर महाविकास आघाडीच्या हातात गेली. आमदार वैभव नाईक यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांनी कुडाळ शिवसेनेचा बालेकिल्ला बनल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा