You are currently viewing पिंगुळी येथे “आरोग्यम” फिजीओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन..

पिंगुळी येथे “आरोग्यम” फिजीओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन..

*निरोगी आयुष्य ही फार मोठी धनसंपदा आहे: डॉ.संजय निरगुडकर* “

कुडाळ :

निरोगी आयुष्य ही फार मोठी धनसंपदा आहे.आयुष्यात डॉक्टर कडे जाण्याची पाळी न येणे यासारखा सुखी मनुष्य नाही आणि वैद्यकीय उपचार घेण्याची वेळ आली तर आरोग्याची दुष्परिणाम विरहीत उत्तम काळजी घेणारे एक उत्तम वैद्यक शास्त्र म्हणजे भौतिकोपचार (फिजिओथेरपी) होय.” असे उद्गार डॉक्टर संजय निगुडकर यांनी काढले. ते फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरज शुक्ला यांच्या पिंगुळी येथील “आरोग्यम” क्लिनिकचे उद्घाटन करताना बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “शरीराबरोबर मनाचे आरोग्य कायम राहावे; यासाठी भौतिकोपचार पद्धतीचा फार परिणामकारक उपयोग होतो. हे सांगत तंत्रशुद्ध शारीरिक हालचालीतून, (एक्झरसाइज,), व्यायामातून शरीरातील स्नायू व अस्थी संदर्भातील समस्या साईड इफेक्ट शिवाय या उपचार पद्धती मार्फत दूर करता येतात. हे सप्रमाण स्पष्ट करत शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्याचे धाडस दाखवणारे डॉक्टर सुरज शुक्ला व त्यांच्या सहकारी डॉ.प्रगती शेटकर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या उद्घाटन प्रसंगी त्यांच्या सोबत कुडाळ येथील सुप्रसिद्ध अर्थोपेडिक डॉक्टर डॉ. मकरंद परुळेकर, सुप्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ.जी. टी. राणे, नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉक्टर सुरज शुक्ला यांचे कुटुंबीय ,श्री.सुंदर गाळवणकर, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य मीना जोशी, उपप्राचार्य कल्पना भंडारी, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या सी.ई.ओ. अमृता गाळवणकर बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या विविध अभ्यासक्रमाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी ,कुडाळ पिंगुळी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

डॉ.जी.टी राणे व डॉ.मकरंद परुळेकर यांनी सुरज शुक्ला यांच्या “आरोग्यम्” या फिजिओथेरपी क्लिनिक च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या व “पैशापेक्षा माणसाच्या चेहऱ्यावरील समाधान हेच डॉक्टरांसाठी फार मोठं सुख असतं आणि ते सौख्य आपणास लाभो. आपल्या हातून उत्तमोत्तम आरोग्य सेवा लोकांना प्राप्त होवो अशा प्रकारच्या शुभेच्छा दिल्या.

उमेश गाळवणकर यांनी “पैसा हा एकमेव उद्देश समोर न ठेवता जनसेवेसाठी स्थापन केलेल्या या फिजिओथेरपी क्लिनिकची आजच्या काळात समाजाला फार गरज आहे. आणि ती गरज पूर्ण करताना लोकांसाठी आपण काहीतरी करत आहोत . त्यांचं दुःख -वेदना दूर करण्यास आपला सहभाग आहे .ही भावना,हा आनंद फार मोलाचा असतो. आणि या दृष्टीने “आरोग्यम्” क्लिनिक हे लोक उपयोगी वैद्यकीय सेवा देऊन आपलं आणि बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाच नाव रोशन करतील. उत्तमोत्तम प्रशिक्षित डॉक्टरना चांगलं प्रशिक्षणही या क्लिनिक मार्फत मिळू शकेल, असा आशावाद व्यक्त करत भविष्यात कोणत्याही प्रकारची गरज लागल्यास नाथ पै शिक्षण संस्था सर्वतोपरी मदत करेल, असे अभिवाचन देत वाटचालीस शुभेच्छा दिल्या ‌.

प्रतिक्रिया व्यक्त करा