राजू मसुरकर यांचे गृहराज्यमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी
कुडाळ तालुक्यातील आंजिवडे ते पाटगाव-गारगोटी (जि. कोल्हापूर) हा नव्याने होत असलेला सुमारे पाच किलोमीटरचा घाटरस्ता तातडीने पूर्ण होण्यासाठी राज्य अर्थसंकल्पात समाविष्ट करावा, अशी मागणी जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजू मसुरकर यांनी गृहराज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
मसुरकर यांनी म्हटले आहे की, हा घाटरस्ता पूर्ण झाल्यास सुमारे ४५ किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे इंधन व वेळेचीही बचत होणार आहे. रस्त्याच्या भूसंपादनासाठी लागणारी खासगी जमीन, वनजमीन, त्याचप्रमाणे मोऱ्या, छोटे पूल पाईप वगैरेचा सर्वे झाला असून यासाठी १५० कोटी खर्च अपेक्षित आहे. आंबोली घाटात बरेचवेळा पावसाळ्यात दरड कोसळून घाटरस्ता कित्येक दिवस बंद असतो. त्यामुळे गंभीर रुग्ण त्याचप्रमाणे प्रवासी यांची गैरसोय होते. कोल्हापूर व बेळगाव येथे जाणारे प्रवासी तसेच व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.
अंजिवडे घाटमार्ग पूर्ण झाल्यास अनेक पर्यटकांना येथील मनोहर संतोष गड व तसेच रांगणा-तुळसुली गड, माणगाव दत्त मंदिर, श्री टेंबे स्वामी यांचे जन्मस्थान या ऐतिहासिक, धार्मिक स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे या भागातील पर्यटन वाढून व्यापारी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक, पर्यटन मार्गदर्शक, हॉटेल व्यावसायिक यांना फायदा होणार आहे. तसेच जनतेला रोजगार प्राप्त होणार आहे. त्यामुळे हा घाटरस्ता पूर्ण होण्यासाठी राज्य अर्थ संकल्पात समाविष्ट करावा, अशी मागणी मसुरकर यांनी केली आहे.