You are currently viewing व्यसनाधीनता आणि वाईन

व्यसनाधीनता आणि वाईन

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या सावित्रीच्या लेकी, नेशन बिल्डर, आदर्श शिक्षिका अवॉर्ड विजेत्या लेखिका कवयित्री सुजाता पुरी यांचा लेख*

*व्यसनाधीनता आणि वाईन*

मागील आठवड्यात वर्तमान पत्रात दोन परस्पर विरोधी बातम्या वाचल्या आणि मन सुन्न झाले.त्यातली पहिली बातमी होती व्यसनमुक्ती साठी आयुष्यभर मुक्तांगण संस्थेच्या माध्यमातून झटणारे प्रसिध्द साहित्यिक डॉ.अनिल अवचट यांचे दु:खद निधन आणि त्याच पृष्ठावरील दुसरी बातमी होती एक हजार स्क्वेअर फूट क्षेत्र असलेल्या मॉल व किराणा दुकानात वाईन विक्रीला सरकारची परवानगी. आयुष्यभर व्यसनमुक्तीसाठी काम करणाऱ्या अनिल अवचट यांना ही अनोखी श्रध्दांजली आहे की काय? असा प्रश्न पडला.
वाईन ही दारू नाही हे ओरडून सांगणे म्हंणजे बिडी हे सिगारेट नाही त्यामुळे त्याने काही दुष्परिणाम होत नाही असेच सांगणे आहे.महसूल जमा करण्याच्या नादात आता आमच्या पुढच्या कित्तेक पिढ्या व्यसनाधीन झाल्या तरी हरकत नाही.पण मग प्रश्न पडणारे आणि प्रश्न विचारणारे डोके यांची संख्या मात्र खूप नगण्य होते आहे. छत्रपतींच्या राज्यात हे काय चालले आहे? केवळ महसूल मिळावा हेच कारण जर महत्वाचे वाटत असेल तर सारे विचारवंत हळहळ करत असणार कि आता नेमके काय करावे? असे म्हणतात कि सत्तेशिवाय शहाणपण काही कामाचे नसते म्हणूनच त्यांचेही हात बांधले गेले आहेत.
या जगात चांगले,वाईट काहीच नसते.आपली नजर जसी असेल तसे आपल्याला दिसते हे म्हणणे खूप सोपे आहे. बालवयातील अजाण मुलांजवळ अशी नजर असते का? उद्या त्यांच्या तोंडाला वाईनरुपी नशेची चटक लागली तर ते त्या पुढची पायरी लवकरच ओलांडणार नाहीत का? ज्यांची घरं दारू मुळे उध्वस्त झाली आहेत अशा महिलांना विचारून पाहा कि वाईन चांगली असते म्हणून.त्यांच्या डोळ्यात तुम्हाला दारूने वाहून गेलेला संसार दिसेल आणि दिसेल जीवांची झालेली होरपळ.आपल्या लहान पिल्लाना त्यांचे बालपणही उपभोगता आलेले नाही.
पिऊन पडलेल्या बापामुळे त्यांना कुठलेच बाल सुलभ हट्ट करता आले नाहीत कि बापाचे प्रेम मिळाले नाही. त्यांच्या वाट्याला आले आहे अकाली प्रौढत्व.घरातल्या महिलेची आयुष्यभर झालेली लंकेची पार्वती आठवा आणि सणासुदीच्या दिवशी घरात होणारी भांडणे,मारहाण,चार चौघात जेव्हा बायका आपल्या नवऱ्याचे आणि सुखी संसाराचे गोडवे गातात तेव्हा व्यसनामुळे जीवनाची राख झालेल्या महिलांच्या ह्रुदयात वेदनेची अबोल कळ किती आत पर्यंत चमकते याला शब्द नाहीत.
असो. हे सगळं भावनिक आहे.सरकार हे भावनेवर चालत नसते,परंतु जुने तत्वनिष्ठ राजकारणी आणि आत्ताचे प्रत्येक क्षणाला तत्वाला हरताळ फासण्यात पटाईत राजकारणी यात जमीन अस्मानाचा फरक आहे.इतके त्रास व कष्ट सहन करून स्वातंत्र्य मिळवण्यापेक्षा इंग्रजाचे गुलामीचे राज्यच बरे होते असे वाटायला लागले आहे.निदान तिथे कायदे तरी कडक होते व तशीच त्याची अंमलबजावणी होती.आपले दुःख व भावनांना जाणणारे कोण असेल तर ती आपली माणसे असतात. असे म्हणतात कि, दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव होण्यासाठी आपण त्या जागी आहोत ही कल्पना मनात आणणे गरजेचे असते. नाहीतर पर दुःख नेहमी शितल वाटते.
सहजासहजी हातात जर वाईन मिळत असेल तर आजची तरुण पिढी त्याची पुढची पायरी का गाठणार नाही ?
एक प्रख्यात विचारवंत असे म्हणतो कि चांगल्या समाजनिर्मितीसाठी तुरुंगाची संख्या कमी करायची असेल तर शाळांची संख्या वाढवणे अत्यावश्यक आहे. पण त्याऐवजी जर वाईन शॉपची संख्या वाढवली तर भविष्यात कशाची संख्या जास्त वाढणार आहे हे वेगळे सांगायला नको.या विषयी काही शंका येत असेल तर आत्ताच किशोर वयीन मुलांचे जिथं त्यांना कुणी पाहत नाही तिथून थोड निरीक्षण करा.देशाचं उद्याचं भवितव्य सिगारेटचे झुरके मारताना दिसेल.संघर्ष,कष्ट ,यश हे शब्द आता ती मुलं काय समजतील हा ही प्रश्नच आहे. सगळ्या चौकटी मोडलेल्या असताना मुलांनी चौकटीत राहावे ही अपेक्षा ही मग हसू येण्यासारखी आहे.
व्यसनाधीन समाज हा देशाला प्रगती पथावर नेऊ शकत नाही.यारून आपली नैतिक मूल्ये किती बदलत चालली आहेत हेच दिसून येत आणि मन सुन्न होतं कि कुठं चाललो आहोत आपण ?
किराणा दुकानातून वाईन विक्रीचा निर्णय चांगला की वाईट याच्यावर चर्चा पुढे सुरूच राहील पण एक शासन आतले मंत्री ज्यांना आपण सुसंस्कृत मानतो ते जेव्हा म्हणतात की पिणारा कुठे जाउन पी तोच आणि या पद्धतीने ते या निर्णयाचे समर्थन करतात तेव्हा त्यांची विचारधारा एवढी कशी बदलली हा सुद्धा प्रश्न पडतो .सत्ता टिकविण्यासाठी नको त्या गोष्टीचे समर्थन करणे म्हणजे एक प्रकारची लाचारी होय .समाजाला व्यसनाधीनतेच्या खाई मध्ये ढकलून जर कोणी राज्यकारभार करीत असेल तर इतिहास अशा लोकांना कधी माफ करणार नाही हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे.नको त्या गोष्टीचं समर्थन करणे खूप अवघड असतं समाजाला दिशा शासनाने शासनकर्त्यांनी द्यायचे असते परंतु इथं शासन करते अशा पद्धतीने चुकीचे निर्णय घेऊन त्याचे समर्थन करणार असते तर ही अनाकलनीय अशी बाब आहे.शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील म्हणून कोणीही द्राक्षापासून वाइन तयार होते असं म्हणून समर्थन करीत असेल तर मनी तर अनेक बाबींपासून सुद्धा अनेक गोष्टी तयार होतात तरी पण शेतकऱ्यांची अवस्था किती सुधारली आहे एक संशोधनाचा विषय आहे. भावी महाराष्ट्र आणि सुजाण पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर किराणा दुकानातून वाहन विक्री सारखे निर्णय शासनाने परत घेतले पाहिजे हेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.

*✒️सुजाता नवनाथ पुरी*
*अहमदनगर*
8421426337
———————–

प्रतिक्रिया व्यक्त करा