You are currently viewing आणखी काही मागू नका

आणखी काही मागू नका

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका प्रा.सौ सुमती पवार यांची काव्यरचना

तारे वारे त्यांच्या जागी उगाच त्यांची आस नको
खोट्या आशा खोटी स्वप्ने उगाच त्यांचा ध्यास नको …
मनगट आहे मजबूत आपले देह ही आहे भक्कमसा
दैवगती अन् नशिबाचा मग टाकू नको रे तू फासा ….

विसंबला जो नशिबावरती सांग भले का झाले कधी
प्रयत्न केल्या वीन शिवारी सांग तू येईल कशी नदी ?
अडवावा लागतो प्रवाह वळते पाणी आपोआप
आडवे घालून संकटास बघ आपण लावावा चाप …..

अशक्य नाही जगात काही अवघड होते बघ सोपे
अडचणींशी जोडावे बघ आपण कायमचे नाते
सवय राहते लढण्याची मग येते बघ ना खूप मजा
स्वयं बळावर लढ लढ तू अरे माणसा तू राजा…

मी म्हणेल तीच पूर्व असा असावा विश्वास
झोप लागते शांत पहा मग जातो सुखाचा तो घास
कष्टालाच रे आहे उत्तर पत्थर होतो पाणी पाणी
कधीच नाही येत मग रे जीवनात आणिबाणी ….

आळसाला नकोच थारा आळस म्हणजे विषवारा
कुणीच नाही देत आणुनी रोजच चिमणीला चारा
घेत भरारी आकाशी ती इवल्या चोचीतून आणते
सहस्र घालून फेऱ्या,गवता सुंदरसे घरटे विणते …

मागत नाही मदत कुणाची नाही पसरत हात कुठे
स्वयंबळावर इवलीशी ती वाऱ्यावादळाशी ही झटे
पंखाखाली घेत पिलांना सक्षम होता उडतात
सांग कोणता प्राणी पक्षी अनुदान का मागतात ..?

देहच आहे मोठी देणगी आणखी काही मागू नका
लाथ मारूनी काढा पाणी लाचारीने जगू नका ….

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २८ जानेवारी २०२२
वेळ : रात्री ११ : ४५

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − thirteen =