आचरा बंदर नस्तावरील प्रकार
आचरा बंदरातून बुधवारी रात्रीच्या सुमारास समुद्रात जाणारी नौका गाळाने भरलेल्या आचरा बंदर नस्तावर गाळात रुतल्याने अडकून पडली. लाटांच्या माऱ्याने ही नौका आडबंदर डोंगराच्या बाजूने असलेल्या खडकाळ भागात सरकल्याने खडकांवर जोर जोरात आढळल्याने नौकेचा पुरता चक्काचूर झाला आहे. ही नौका मालवण येथील असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. नौकेवर तांडेल व दोन खलाशी होते. दुर्घटनेनंतर तांडेल व खलाशी यांना स्थानिक मच्छिमारांनी सुखरूप बाहेर काढले. ही दुर्घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली.
दुर्घटनाग्रस्त झालेली नौका ही रात्रीच्या सुमारास आचरा बंदरातून दुसऱ्या बंदरात जाण्यास निघाली होती. पण आचरा नस्तावर ही नौका आल्यावर गाळात रुतून एका बाजूला कलंडली. लाटांचा मारा होत असल्याने ही नौका खडकाळ भगत सरकून आपटल्याने पूर्ण फुटून गेली. नौका दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समजताच स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य चालू केले. नौकेवरील तांडेल व दोन खलाशी यांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दुर्घटनेत नौकेचा पुरता चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
आचरा बंदर नस्त भागात गाळ साठल्यामुळे सातत्याने नौका दुर्घटनाग्रस्त होत आहेत. काही नौका यापूर्वीही खडकांवर आदळून फुटण्याचे प्रकारही घडले आहेत. आचरा येथील मच्छीमार मेरीटाईम बोर्डकडे वारंवार हा गाळ उपसा करण्याची मागणी करीत आहेत. मात्र मेरीटाईम बोर्ड याकडे दुर्लक्ष करीत आहे.
यापूर्वी आचरा नस्तावर गाळ साचल्याने १६ सप्टेंबर २०१८ रोजी मध्यरात्री मासेमारी करून आचरा बंदरात परतत असताना मासेमारी नौका नस्तावर साचलेल्या गाळामुळे अपघातग्रस्त होऊन समुद्रात उलटली होती. नौकेत पूर्णपणे पाणी शिरल्याने १७ खलाशांच्या जीवाला पोका निर्माण झाला होता. किनाऱ्यावरील मच्छीमारांनी वेळीच धाव घेत बुडणाऱ्या नौकेवरील १७ खलाशांचे प्राण वाचविले होते. या अपघातात मासेमारी नौका नौकेवरील जाळी, इंजीन, खलाशांचे सामान मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. दुसरी घटना २६ ऑगस्ट २०२० रोजी पहाटे घडली होती यातही गाळातील कचरा पातीच्या पंख्यात अडकल्याने इंजीन बंद पडून नस्तावर लाटांच्या तडाख्यात सापडलेली पात उलटली होती. यात सुदैवाने ५ मच्छीमार बचावले होते. यातही पातीच्या इंजीन, जाळयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. बुधवारी रात्री पुन्हा नौका दुर्घटना होण्याची घटना घडली आहे. आचरा बंदराचे नस्त दिवसेंदिवस गाळाने भरत चालले आहे. येथील मच्छीमारांना मासेमारीस जाताना भरती-ओहोटीच्या वेळा साधाव्या लागत आहेत. एका बाजूला खडकांची रांग, तर दुसऱ्या बाजूला साठलेला गाळ यामुळे समुद्रातून येताना- जाताना मच्छीमारांना मोठी कसरत करावी लागत आहे. मच्छीमार बांधवांनी आचरा बंदरातील गाळ काढण्यासाठी पत्राद्वारे लक्ष वेधून वेळोवेळी मागणी केली होती. आचरा बंदर नस्तावर साचणारा गाळ रोखण्यासाठी स्थानिक मच्छीमारांनी काही पर्याय सूचविले आहेत. परंतु, शासन व राजकीय पुढाऱ्यांच्या उदासीनतेमुळे अजूनही परिस्थिती जैसे थे असल्याने मच्छीमारांचा जीव धोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे शासनकर्ते या समस्येकडे लक्ष देणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.