You are currently viewing ज्येष्ठ पत्रकार टी.एन. नाईक यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार टी.एन. नाईक यांचे निधन

सावंतवाडी

सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी कोषाध्यक्ष व राणी पार्वतीदेवी हायस्कूलचे माजी शिक्षक तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आणि माजी सचिव टी एन नाईक यांचे मंगळवारी रात्री अकरा वाजता निधन झाले.

टी एन नाईक सर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. १९८२ ते १९८५ या कालावधीत त्यांनी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविले होते. सिंधुदुर्ग साहित्य संघाचे ते माजी उपाध्यक्ष होते. राजकारणातही त्यांचे योगदान राहिले होते सावंतवाडी नगर परिषदेचे बांधकाम सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले होते.

दै.गोमंतक व दैनिक तरुण भारतचे जिल्हा वृत्त प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले होते. तसेच दैनिक पुढारी दैनिक मुंबई सकाळ व दैनिक रत्नागिरी टाइम्स चे जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही ते कार्यरत होते. श्रीराम वाचन मंदिर चे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

ते सुमेधा प्रकाशन संस्थेचे प्रकाशक होते. त्यांनी अबोली वार्षिकांक, सावंतवाडी नगरपरिषद, पहिले मालवणी संमेलन, अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन आंदीच्या स्मरणिकेचे संपादन त्यांनी केले होते. तसेच ते अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे प्रसिद्धीप्रमुख राहिले होते.

शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सावंतवाडी तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे माजी सचिव, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे माजी सचिव, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव तसेच शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी चे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या निधनामुळे सर्वच क्षेत्रात शोक व्यक्त होत आहे. एका ज्येष्ठ मार्गदर्शकास मुकल्याची प्रतिक्रिया त्यांच्या निधनानंतर अनेकांनी व्यक्त केली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा