You are currently viewing भाजपाकडून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांवर भाजपाकडूनच कुरघोडी

भाजपाकडून आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांवर भाजपाकडूनच कुरघोडी

राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवींची देखील सपाट खेळपट्टीवर फटकेबाजी

देशात गेली दोन वर्षे कोरोनाने धुमाकूळ घातला आहे, कोरोनाच्या जेवढ्या आवृत्ती निघाल्या नाहीत तेवढ्या आवृत्ती तर सावंतवाडी मतदारसंघाच्या विधानसभेच्या भविष्यातील निवडणुकींकरिता राजकीय नेत्यांच्या निघत आहेत. कोरोना डेल्टा, ओमायक्रोन असे वेगवेगळे व्हेरियंट दर सहा महिन्यांनी वेष पालटून येत आहेत तसेच दिवसेंदिवस सावंतवाडीत राजकीय धुरंदर सावंतवाडी मतदारसंघ म्हणजे सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला वासीयांनी आंदण दिल्यासारखेच वेष पालटून पालटून येत आहेत.
सावंतवाडी मतदारसंघ हा सर्वधर्मसमभाव मानून चालणाऱ्या लोकांच्या खांद्यावर आपली धुरा सोपवत चाललेला आहे. जयानंद मठकर, शिवरामराजे भोसले, प्रवीण भोसले, शिवराम दळवी असो वा दीपक केसरकर सर्वांनीच जातीय सलोखा सांभाळत मतदारसंघाची बांधणी केली होती. त्यामुळेच विविध जाती धर्माचे लोक सलोख्याचे नांदत आहेत. भविष्यात मतदारसंघाची धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीला कुठल्या एका जातीचा, धर्माचा झेंडा घेईन मतदारसंघ लढवता येणार नाही हे देखील सत्य आहे.
सावंतवाडीत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधीच विधानसभेचे वारे वाहू लागल्याने पक्षाचे लोकप्रतिनिधी, कार्यकर्तेच गोंधळात पडल्याचे दिसून येत आहे. माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दीपक केसरकरांवर टीकास्त्र सोडत वरिष्ठांचे लक्ष आपल्याकडे खेचून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्याचे सर्वप्रथम जाहीर करून मतदारसंघावर दावेदारी सांगितली आहे. मागील निवडणुकीत भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले राजन तेली यांनी केसरकरांना तुल्यबळ लढत दिली होती, पण तेच धुरंदर राजन तेली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मात्र सपशेल पडले…..त्यामुळे भविष्यात सावंतवाडीत दावेदारी सांगू नये यासाठी तर तेलींना कोणी दूर केले नाही ना? असा संशय व्यक्त होत असतानाच शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी सरळ सरळ आरोप करत तेलींच्या पराभवाचे खापर फोडून मोकळे झाले. त्यामुळे सावंतवाडीत बऱ्यापैकी मते घेतलेले मागील विधानसभेचे उमेदवार राजन तेलीना देखील सावंतवाडी मधून विधानसभेसाठी निवडणुकीत उतरणाऱ्याने विश्वासात घेणे अपेक्षित आहे.
सावंतवाडीत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाच्या पत्रकार परिषदांच्या सर्व घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुंडलिक दळवी यांनी उडी घेत कोरोना, ओमायक्रोन च्या पार्श्वभूमीवर स्वतःचे राजकीय हित जपत कोरोनाच्या समस्येवर दुर्लक्ष करून स्वप्न रंगवणाऱ्या राजकीय व्यक्तींवर नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे. विरोधासाठी विरोध न करता शहर विकासाकडे लक्ष देण्याची सूचना करतानाच गेल्या दोन वर्षात शहरात कसला विकास केला? हेच सांगा असे आव्हानच दिले. स्वतःच केंद्रीय मंत्री असल्यासारखे कोट्यावधींच्या गप्पा मारणाऱ्यांनी शहरात काय विकास केला जो ते आमदार होऊन तीन तालुक्याचा विकास करणार? असा कोणाचेच नाव न घेता टोला लगावला.
संजू परब यांची पत्रकार परिषद आणि वक्तव्ये दीपक केसरकर यांनी दुर्लक्षित करत, “त्यांचा विषयच आपण सोडून दिला” असे सांगितले. त्यामुळे केसरकरांनी आपण संजू परब याविषयावर बोलणार नाही म्हटलेलं खरं केल्याचे दिसले. परंतु जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मात्र संजू परब यांना पुन्हा नगराध्यक्ष म्हणून तरी बसून दाखवा असे सांगत सावंतवाडी नगरपालिकेत येत्या निवडणुकीत संघर्ष अटळ असल्याची झलक दाखवली. परंतु कालपासून सुरू असलेल्या या घडामोडीनंतर आज एक विलक्षण गोष्ट घडली ती म्हणजे *संवाद मीडियाच्या संपादकीय* सदरानंतर जुन्या भाजपा कार्यकर्त्यांनी संघाचे कार्यकर्ते आणि भाजपाचे माजी राज्यमंत्री तथा डोंबिवलीचे विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांनीच सावंतवाडी विधानसभा लढवावी अशी मागणी करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे *कोरोनाच्या नवनव्या व्हेरियंट* पेक्षाही तेजीत *भाजपामध्ये उमेदवारीचे व्हेरियंट* येत असल्याचे दिसून येत आहे.
नवनवीन व्हेरियंट मुळे भविष्यात सावंतवाडी मतदारसंघात भाजपाच्या व्हेरियंट वर कोणते औषध लागू पडतं आणि कुठला व्हेरियंट सक्षमपणे लढतो आणि कुठला सावंतवाडी करांच्या रेमडेसीविर ला बळी पडतो हे येणारा काळच ठरवणार…

प्रतिक्रिया व्यक्त करा

nine + one =