You are currently viewing संदर्भ ग्रंथ:- सार्थ हरिपाठ

संदर्भ ग्रंथ:- सार्थ हरिपाठ

*ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारु ।*
*उतरिल पैल पारु ज्ञानदेव ||*
*ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ।*
*तोडील भवव्यथा ज्ञानदेव ||*
*ज्ञानदेव माझे सोयरे धायरे |*
*जिवलग निर्धारि ज्ञानदेव ।।*
*सेना म्हणे माझे ज्ञानदेव निधान ।*
*दाविली निजखूण ज्ञानदेव ।।*

*~संत सेनामहाराज.*

#####################

🙏 *श्री ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठ*🙏

*****************************
📜 *अभंग* – *१*📜
*****************************

*देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ।*
*तेणे मुक्ती चारी साधियेल्या ।।*
*हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा ।*
*पुण्याची गणना कोण करी ।।*
*असोनी संसारी जिव्हे वेगु करी ।*
*वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ।।*
*ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा ।*
*द्वारकेचा राणा पांडवा घरी ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*”देवाच्या दारात उभे राहून मुखाने तुम्ही सतत हरि हरि म्हणा, संसारात राहून नामाचा उच्चार जिव्हेला वेग देऊन करा,म्हणजे ज्ञानेश्वर महाराज व्यासांचे प्रमाण देऊन सांगतात की,तुम्हांला चारी मुक्ती साध्य होतील,अगणित पुण्याची प्राप्ती होईल,वेदशास्त्रे हात उभारून आशीर्वाद देऊ लागतील व द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण,ज्याप्रमाणे पांडवांच्या घरी त्यांचा सांभाळ करण्यासाठी नित्य राबले,त्याप्रमाणे परमात्मा तुमच्या घरी तुमचा योगक्षेम वाहण्यासाठी सदैव वास करील*

*****************************
📜 *अभंग* – *२*📜
*****************************

*चहू वेदी जाण षट्शास्त्री कारण ।*
*अठराहि पुराणे हरिसी गाती ।।*
*मंथुनी नवनीता तैसे घे अनंता ।*
*वाया व्यर्थ कथा सांडी मार्गु ।।*
*एक हरि आत्मा जीव शिव समा ।*
*वायां तू दुर्गमा न घालि मन ।।*
*ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ ।*
*भरला घनदाट हरि दिसे।।*

———————————————
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*ज्या हरिचे निर्गुण स्वरुप जाणण्याचा चारी वेद प्रयत्न करतात,जो हरि षट्शास्त्रांच्या निर्मितीचे कारण आहे व ज्या हरिचे अठरा पुराणे गुणगान करतात,त्या हरिला,ज्याप्रमाणे दह्याचे मंथन करून लोणी काढतात त्याप्रमाणे, प्राप्त करुन घे व बाकीच्या व्यर्थ गोष्टी व मार्ग यांचा त्याग कर.एक हरिच आत्मा आहे व जीवशिव रुपाने तोच आहे,हे जरी तत्वत:खरे असले तरी या दुर्गम – अवघड विषयात तू विनाकारण मन घालू नको.ज्ञानदेव म्हणतात,’तू’ हरिपाठाने मला सर्वत्र हरिच घनदाट भरलेला दिसत असल्यामुळे हा भूलोक मला प्रत्यक्ष वैकुंठच झाला आहे.*

*****************************
📜 *अभंग* – *३*📜
*****************************

*त्रिगुण असार निर्गुण हे सार |*
*सारासार विचार हरिपाठ ।।*
*सगुण निर्गुण गुणाचे अगुण |*
*हरिविण मन व्यर्थ जाय ||*
*अव्यक्त निराकार नाही ज्या आकार।*
*जेथुनि चराचर त्यासि भजे ।।*
*ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।*
*अनंत जन्मानी पुण्य होय ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*त्रिगुणात्मक प्रकृती व तिने निर्माण केलेले हे त्रिगुणात्मक जग सार आहे की असार आहे? किंवा त्या जगाचे अधिष्ठान असलेले निर्गुण परब्रम्ह हेच सार आहे? वगैरे गोष्टीबद्दलचा विचार तू करीत बसू नकोस कारण सारासार विचार करुनच संतांनी तुला हरिपाठाचा – हरिनामाचा अमूल्य ठेवा दिला आहे.सगुण परमात्म्याला त्रिगुणात्मक प्रकृतीचा आश्रय घ्यावा लागतो,म्हणून तो कनिष्ठ आहे की निर्गुण परब्रम्ह हे अगुण, गुणातीत आहे,म्हणून ते श्रेष्ठ आहे, वगैरे विषयात,हरिनाम न घेता,मन घालशील तर तुझे जीवन व्यर्थ जाईल.म्हणून जे अव्यक्त व निराकार आहे व ज्याला आकार नाही आणि जेथून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती होते त्या तत्वाचे, हरिचे भजन कर.ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,जर तू हरिचे भजन करशील तर अनंत जन्माची पुण्याई फळल्यानंतर “रामकृष्ण ध्यानी रामकृष्ण मनी” ( अशी उन्मनी स्थिती प्राप्त होते ती स्थिती या जन्मातच तुला हरिनामस्मरणाने प्राप्त होईल.*

*****************************
📜 *अभंग* – *४*📜
*****************************

*भावेविणभक्ती,भक्तीविण मुक्ति|*
*बळेविण शक्ति बोलू नये ||*
*कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत |*
*उगा राहे निवांत शिणसी वाया ।।*
*सायासे करिसी प्रपंच दिन निशी ।*
*हरिसी न भजसी कवण्या गुणे ।।*
*ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे ।*
*तुटेल धरणे प्रपंचाचे।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*भक्तीत म्हणजे उपासनेत जर भाव नसेल तर ती उपासना खरी नव्हे आणि असल्या कवायती उपासनेने तुला मुक्ती प्राप्त होईल असे वाटत असेल तर ते अंगात बळ नसतांना शक्तीच्या गोष्टी बोलण्यासारखेच व्यर्थ आहे.मग देव कशाने प्रसन्न होईल व त्याच्या प्रसादाने मला कशी मुक्ती मिळेल असा प्रश्न जर तुझ्या ठिकाणी निर्माण झाला असेल तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे.व्यर्थ शीण न करता तू प्रथम निवांत-शांत हो व श्रध्देने अखंड हरिनामस्मरण कर.त्यानेच हरि प्रसन्न होऊन तुला मुक्तीचा प्रसाद मिळेल.रात्रंदिवस तू प्रपंचासाठी राबतोस,पण हरिचे भजन करण्यात मात्र आळस करतोस ते का बरे? ज्ञानदेव सांगतात तुला जर या प्रपंचाचे धरणे तुटावे-सुटावे असे वाटत असेल तर त्याला सोपा उपाय म्हणजे हरिच्या नामाचा अखंड जप करणे हाच होय.*

*****************************
📜 *अभंग* – *५*📜
*****************************

*योगयागविधी येणे नोहे सिध्दी ।*
*वायाची उपाधि दंभधर्म ||*
*भावेविण देव न कळे निःसंदेह ।*
*गुरुविण अनुभव कैसा कळे ।।*
*तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त|*
*गुजेविण हित कोण सांगे |*
*ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात ।*
*साधूचे संगति तरणोपाय।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*योग,याग,विधी या साधनांनी अध्यात्मिक सिध्दी प्राप्त होत नाही. उलट विनाकारण उपाधी आणि दंभ मात्र पदरात पडतात.भावाशिवाय देव आकळत नाही,हे निःसंशय त्याचप्रमाणे गुरुकृपेशिवाय आत्मानुभव कसा प्राप्त होईल? तपाशिवाय दैवत प्रसन्न होत नाही.त्याचप्रमाणे आपले गुह्य किंवा निजगुज दुसऱ्याला सांगितल्याशिवाय त्याला आपल्या हिताचा मार्ग कसा सांगता येईल? ज्ञानदेव सांगतात की,वर दिलेल्या दृष्टांतात ज्याप्रमाणे एकाशिवाय दुसरे संभवत नाही त्याप्रमाणे साधूच्या संगतीशिवाय साधकाला तरणोपाय नाही.*

*****************************
📜 *अभंग* – *६*📜
*****************************

*साधुबोध झाला नुरोनिया ठेला |*
*ठायीच मुराला मुराला अनुभवे ||*
*कापुराची वाती उजळली ज्योति ।*
*ठायीच समाप्ति झाली जैसी ।।*
*मोक्षरेखें आला भाग्ये विनटला |*
*साधूचा अंकिला हरिभक्त ।।*
*ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी ।*
*हरि दिसे जनी आत्मतत्त्वी ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*साधूंच्या संतांच्या उपदेशाचा बोध ज्याला अनुभवाने झाला तो न उरून उरतो-मुरतो म्हणजे स्वतःच्या अधिष्ठानात ‘मरुन’ उरतो. ज्याप्रमाणे कापूर अग्नीच्या स्पर्शाने अग्नीरुप होतो व नंतर तो अग्नीही नाहीसा होऊन त्याठिकाणी केवळ आकाश शिल्लक राहते,त्याप्रमाणे आत्मानुभवाचा प्रसाद झाल्यावर साधकाच्या जीवभावाचे ब्रह्मभावात रुपांतर होते.शेवटी तो ब्रह्मभाव सुद्धा विलयाला जाऊन केवळ नाम तेवढे शिल्लक राहते. जो साधूच्या अंकित आहे,त्याच्या उपदेशाप्रमाणे वागणारा आहे अशा हरिभक्तालाच मोक्ष मिळण्याचे भाग्य मिळते.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,ज्याला संतसंगतीची गोडी लागली त्यालाच हरि सर्वत्र भरलेला आहे असा अनुभव प्राप्त होतो.*

*****************************
📜 *अभंग* – *७*📜
*****************************

*पर्वताप्रमाणे पातक करणे |*
*वज्रलेप होणे अभक्तासी ||*
*नाही ज्यासी भक्ति ते पतित अभक्त ।*
*हरिसी न भजत दैवहत ।।*
*अनंत वाचाळ बरळती *बरळ ।*
*त्या कैचा दयाळ पावे हरि ।।*
*ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान ।*
*सर्वाघटी पूर्ण एक नांदे ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*स्वरूपाची विस्मृती होणे-देवाचा विसर पडणे म्हणजेच पर्वताएवढे पातक करणे होय!अभक्तांना हे पातक वज्रलेप होते.ज्यांना हरिची भक्ती नाही जे हरिला भजत नाहीत,ते खरोखरच पतित व दैवहत होत.वाचेने हरिनाम घेण्याऐवजी जे विनाकारण वाचाळता करतात व मनाला येईल ते बरळतात,त्यांना हरि दयाळू असला तरी कसा पावेल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात,आत्मा हाच जीवाचे खरे निधान असून तोच एक सर्वत्र भरून राहिला आहे,हे संत वचन हा त्यांचा सिद्धांत प्रमाण मानून,तू ईश्वराची भक्ती म्हणजे नामस्मरण कर.*

*****************************
📜 *अभंग* – *८*📜
*****************************

*संतांचे संगती मनोमार्ग गति ।*
*आकळावा श्रीपति येणे पंथे ।।*
*रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा |*
*आत्मा जो शिवाचा रामजप ||*
*एकतत्व नाम साधती साधन |*
*द्वैताचे बंधन न बाधिजे ||*
*नामामृत गोडी वैष्णवा लाधली |*
*योगीया साधली जीवन कळा ||*
*सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला |*
*उद्धवा लाधला कृष्ण दाता ||*
*ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ ।*
*सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*संतांच्या संगतीत मनोमार्गाला ‘उलट’ गती देणे,हा श्रीपतीला प्राप्त करून घेण्याचा पंथराज आहे.जो रामजप शिवाचा आत्मा आहे-प्राण आहे-आवडता आहे,तो नामजप हा जीवाचा भाव म्हणजे स्वभाव म्हणजे स्वधर्म आहे.असे हे नाम एक तत्व आहे.या नामाची साधना उपासना जे करतात त्यांना द्वैताचे बंधन बाधत नाही.अशा नामधारकांना,वैष्णवांना जे नामामृत सहज प्राप्त होते ते नामामृत योग्यांना महान कष्ट करून मिळणाऱ्या जीवनकलेपेक्षा श्रेष्ठ असते.ज्या नामोच्चाराने नामामृत प्राप्त होते,तो नामोच्चार प्रल्हादाच्या अंतःकरणांत नारदांच्या कृपेने बिंबला व उद्धवाला तो कृष्णकृपेने प्राप्त झाला.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,ज्या नामाने परमसिद्धी प्राप्त होते ते नाम जरी सुलभ असले तरी त्याचे महात्म्य जाणणारा विरळा असल्यामुळे ते सर्वत्र दुर्लभ झाले आहे.*

*****************************
📜 *अभंग* – *९*📜
*****************************

*विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान ।*
*रामकृष्णी मन नाही ज्याचे ।।*
*उपजोनि करंटा नेणें अद्वैत वाटा ।*
*रामकृष्णी पैठा कैसा होय ।।*
*द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान ।*
*तया कैचें कीर्तन घडे नामी ।।*
*ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान ।*
*नामपाठे मौन प्रपंचाचे ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*भगवन्नामाच्या जपाव्यतिरिक्त इतर सर्व जप व्यर्थ होत.त्याचप्रमाणे ज्यांचे भगवच्चरणी प्रेम नाही त्याचे ज्ञान सुद्धा व्यर्थच आहे.भगवन्नाम ही अद्वैताची वाट आहे.जन्माला येऊन ज्याने ही वाट जाणून घेतली नाही तो खरोखरच हतभागी होय.अशा करंट्याला भगवंताचे चरण कसे प्राप्त होतील?गुरुकृपेने मिळणाऱ्या ज्ञानाविना द्वैताचा निरास होत नाही असा द्वैताचा निरास ज्या साधकाचे ठिकाणी झाला नाही त्याला नामसंकीर्तन करण्याचे भाग्य कसे प्राप्त होईल? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,भगवन्नाम हे देवाचे सगुण ध्यान आहे.अशा नामाच्या पाठाने प्रपंच विरून जाऊन साधकाच्या ज्ञानात केवळ परब्रह्माचेच भान स्फुरू लागते.*

*****************************
📜 *अभंग* – *१०*📜
*****************************

*त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।*
*चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ ।।*
*नामासी विन्मुख तो नर पापिया।*
*हरीविण धावया न पावे कोणी ।।*
*पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक।*
*नामे तिन्ही लोक उद्धरती ।।*
*ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरिचे ।*
*परंपरा त्याचे कुळ शुद्ध ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*ज्याचे भगवन्नामाचे ठिकाणी चित्त नाही-लक्ष नाही-प्रेम नाही,त्याने त्रिवेणी संगमादी नाना तीर्थयात्रा जरी केल्या तरी त्या व्यर्थ होत. नामाला जो विन्मुख आहे.नामाची ज्याला आवड नाही,तो पापी आहे असे खुशाल समजावे.अशा पापी मनुष्याला तारावयास हरिशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही.तीनही लोक उद्धरून नेण्याचे सामर्थ्य नामात आहे असे पुराणप्रसिद्ध वाल्मिक ऋषींचे स्पष्ट वचन आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात,जो हरिनामाचा निरंतर जप करतो त्याच्या कुळाची परंपरा शुद्ध होते.*

*****************************
📜 *अभंग* – *११*📜
*****************************

*हरि उच्चारणी अनंत पापराशी ।*
*जातील लयासी क्षणमात्रे ||*
*तृण अग्निमेळे समरस झाले ।*
*तैसे नामे केले जपतां हरि ।।*
*हरि उच्चारण मंत्र हा अगाध |*
*पळे भूतबाधा भेणे याचे ।।*
*ज्ञानदेव म्हणे हरि माझा समर्थ ।*
*न करवे अर्थ उपनिषदा।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*ज्याप्रमाणे गवताच्या गंजीला अग्नीचा स्पर्श झाला तर ते सर्व गवत अग्नीमध्ये जळून खाक होते, त्याप्रमाणे पापाच्या राशीला जर हरिनामाचा स्पर्श झाला तर सर्व पापे नामात जळून भस्म होतात. हरिनाम हा महामंत्र आहे व त्याची शक्ती अगाध आहे.नामाच्या उच्चाराने जीवाची भूतबाधा नाहीशी होते.ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,हरि व त्याचे नाम ही अलौकिक आहेत.अशा हरिच्या स्वरूपाचा व त्याच्या नामाच्या सामर्थ्याचा थांग उपनिषदांना सुद्धा लागत नाही.*

*****************************
📜 *अभंग* – *१२*📜
*****************************

*तीर्थ व्रत नेम भावेविण सिध्दी |*
*वायाची उपाधी करिसी जना ||*
*भावबळे आकळे एरव्ही नाकळे |*
*करतळी आवळे तैसा हरि ||*
*पारियाचा रवा घेता भूमीवरी |*
*यत्न परोपरी साधन तैसे ||*

*ज्ञानदेव म्हणे निवृती निर्गुण |*
*दिधले संपूर्ण माझे हाती ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*अंतःकरणांत भगवंताची दृढ निष्ठा-भाव नसतांना तीर्थक्षेत्राला जाणे,व्रतवैकल्य करणे,नाना प्रकारचे नेमधर्म करणे म्हणजे व्यर्थ कष्ट करणे होय.अशाने अध्यात्मसिद्धी प्राप्त होत नाही. करतळावर ठेवलेले आवळे ज्याप्रमाणे प्रत्यक्ष समोर असतात त्याप्रमाणे निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरिला आकळू शकतो,आपल्या अंतःकरणांत हरिला प्रत्यक्ष उभा करतो.एरव्ही भावबळ नसतांना हरि आकळण्याचा,प्राप्त करून घेण्याचा यत्न करणे म्हणजे जमिनीवर सांडलेल्या पाऱ्याचे कण गोळा करण्याची व्यर्थ धडपड करणेच होय.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,माझे सद्गुरू श्रीनिवृत्तिनाथ यांच्या कृपेने साक्षात निर्गुणस्वरूप परब्रह्मतत्व नामरुपाने संपूर्ण सगुण आहे असा अनुभव मला प्राप्त झाला.*

*****************************
📜 *अभंग* – *१३*📜
*****************************

*समाधी हरिची समसुखे वीण।*
*न साधेल जाण द्वैतबुद्धि ।।*
*बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे ।*
*एक्या केशिराजे सकळ सिद्धी ।।*
*ऋद्धि सिद्धी निधी अवघीच उपाधी ।*
*जंव त्या परमानंदी मन नाही ।।*
*ज्ञानदेवी रम्य रमले समाधान ।*
*हरिचे चिंतन सर्वकाळ ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*जोपर्यंत प्रेमसुखाची प्राप्ती झाली नाही व द्वैतबुद्धीवर जाण-जाणीव नांदत आहे.तोपर्यंत “हरिची समाधी” साध्य होणार नाही. सकळसिद्धी भगवंताच्या प्राप्तीत असून बुद्धीच्या सामर्थ्यांने हरिची प्राप्ती करुन घेणे हेच खरे बुद्धीचे वैभव आहे.जोपर्यंत गोविंदाच्या चरणी मन रमले नाही तोपर्यंत ऋद्धि,सिद्धि व निधि साधकाला हितावह तर नाहीतच पण उलट अधोगतीला मात्र कारणीभूत होतात.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्वकाळ हरिचिंतन करणे एवढे प्रभावी आहे की,त्यामुळे अत्यंत रम्य असे जे समाधान ते माझ्या ठिकाणी रमले.माझ्या जीवनात ते स्थिर झाले.*

 

*****************************
📜 *अभंग* – *१४*📜
*****************************

*नित्य सत्यामित हरिपाठ ज्यासी ।*
*कलिकाळ त्यासी न पाहे दृष्टी ।।*
*रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप ।*
*पापाचे कळप पळती पुढे ।।*
*हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा ।*
*म्हणती जे वाचा तया मोक्ष ।।*
*ज्ञानदेवा पाठ नारायणष नाम ।*
*पाविजे उत्तम निजस्थान ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*जो हरिचे नामस्मरण सर्वकाळ, प्रेमाने व अगणित करील त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे खुद्द कलिकाळाला सुध्दा नाही.असे भगवन्नाम वाचेने अखंड घेतले असता नामधारकाला अनंत जन्माच्या तपाची पुण्याई प्राप्त होते व त्याच्या पूर्व आयुष्यात घडलेली अनंत पापे त्याच्या जीवनातून पळून जातात.शिवाने-शंकराने ज्या हरिनाम मंत्राचा जप केला त्या हरिनामाचा जो जप करील त्याला मोक्षाची प्राप्ती होईल.ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण नामाच्या पाठाने जपाने साधकाला त्याच्या उत्तम अशा निजस्वरुपाचा साक्षात्कार होतो.*

*****************************
📜 *अभंग* – *१५*📜
*****************************

*एक नाम हरि द्वैत नाम दुरी ।*
*अद्वैत कुसरी विरळा जाणे ।।*
*समबुद्धि घेता समान श्रीहरी ।*
*शमदमा वैरी हरि झाला ।।*
*सर्वाघटी राम देहादेही एक ।*
*सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी ।।*
*ज्ञानदेवा चित्तीं हरीपाठ नेमा।*
*मागिलिया जन्मा मुक्त झालो ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*हरिनाम हे एकच साधन असे आहे की,त्याच्या सामर्थ्यानें जीवाच्या ठिकाणी असणारे द्वैतनाम म्हणजे द्वैतभाव दूर होतो. भगवन्नाम ही एक “अद्वैत कुसरी” आहे.अद्वैतस्थिती प्राप्त करून देणारी कला आहे,हे अनुभवाने जाणणारा या जगात विरळाच! नामाने समबुद्धी म्हणजे योगबुद्धी प्राप्त करून घेतली असता हरि सर्वत्र सारखा भरून राहिलेला आहे असे प्रतितीला येते.याच्या उलट शमदमांचा आश्रय घेणाऱ्या साधकाला जगरुपाने असणारा हरि वैऱ्यासारखा भासू लागतो. सूर्यापासून निघणारी हजारो किरणे दिसावयाला भिन्न भिन्न दिसतात, परंतु प्रत्यक्षात एक सूर्यच त्या सर्व किरणांचा प्रकाशक असतो. त्याप्रमाणे निरनिराळ्या देहातून वेगवेगळे जीव जरी विलसतांना दिसले,तरी या सर्व देहांतून एक रामच प्रगट होत असतो असा अनुभव साधकाला नामाने प्राप्त होतो.ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,अखंड नामस्मरणाचा नेम म्हणजे प्रेम माझ्या चित्तात चित्रित झाले आहे,ही मागल्या जन्मी मुक्त झाल्याची खूण आहे.*

*****************************
📜 *अभंग* – *१६*📜
*****************************

*हरिनाम जपे तो नर दुर्लभ ।*
*वाचेसी सुलभ रामकृष्ण ||*
*रामकृष्ण नामी उन्मनी साधिली ।*
*तयासी लाधली सकळ सिद्धि |*
*सिद्धिबुद्धि धर्म हरिपाठी आले ।*
*प्रपंची निवाले साधुसंगे ||*
*ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा ।*
*येणे दशदिशा आत्माराम ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*रामकृष्णनाम-भगवन्नाम वाचेने घेण्यास अत्यंत सुलभ असून सुद्धा त्या नामाचा जप करणारी माणसे जगात दुर्लभ झाली आहेत.परंतु जे कोणी अट्टाहासाने नामजप करतात व जप करता करता नामात रंगून जातात,त्यांना सर्व सिद्धी प्राप्त होतात,हरिपाठाचा-हरिनामाचा महिमा एवढा अगाध आहे की,त्या नामाचा ध्यास धरणाऱ्या नामधारकाच्या पाठीमागून सिद्धी म्हणजे स्वरूपसिद्धी,बुद्धी म्हणजे समबुद्धी व धर्म म्हणजे स्वधर्म आपोआप आपण होऊन चालून येतात व ते प्रपंचात संतसंगतीत मिळणाऱ्या नामाने निवांत-शांत होतात.ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अशा या अलौकिक रामकृष्ण-भगवन्नामाचा ठसा माझ्या चित्तात ठसून गेल्यामुळेच माझ्या चित्ताचे चैतन्य झाले व ते चैतन्यच दाहीदिशेला सर्वत्र भरून राहिलेले आहे,असे प्रत्यक्ष अनुभवाला आले.*

*****************************
📜 *अभंग* – *१७*📜
*****************************

*हरिपाठकीर्ति मुखे जरी गाय।*
*पवित्रचि होय देह त्याचा।।*
*तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप।*
*चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे ||*
*मातृपितृ भ्राता सगोत्र अपार |*
*चतुर्भुज नर होऊनी ठेले ||*
*ज्ञानगूढ गम्य ज्ञानदेवा लाधले ।*
*निवृत्तीने दिधले माझे हाती ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*जो स्वत:हरिपाठ करून त्या हरिपाठाची कीर्ती इतरांना सांगतो त्याचा देह पवित्र होय.स्वत: नामस्मरण करणे व त्या नामाचा महिमा जगाला सांगणे हे फार मोठे तप होय.या महातपाच्या सामर्थ्यांने नामधारक चिरंजीव होतो व देहाचा त्याग केल्यावर चिरकाल वैकुंठात वास करतो.नामधारकाचे माता, पिता,बंधु,सगोत्री व इतर कित्येक लोक त्याच्या पुण्याईने चतुर्भुज म्हणजे हरिरूप होतात.ज्ञानेश्वर महाराज सांगतात,की गूढ पण गम्य असे ज्ञान,जे प्राप्त झाले असता जीवाचे रूपांतर देवांत होते,ते ज्ञान मला माझ्या सद्गुरू कृपेने, निवृत्तिनाथांच्या प्रसादाने प्राप्त झाले.*

*****************************
📜 *अभंग* – *१८*📜
*****************************

*हरिवंशपुराण हरिनाम संकीर्तन |*
*हरिविण सौजन्य नेणे काही ।।*
*तया नरा लाधले वैकुंठ जोडले ।।*
*सकळहि घडले तीर्थाटन ||*
*मनोमार्गे गेला तो तेथे मुकला ।*
*हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ।।*
*ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी |*
*रामकृष्णी आवडी सर्वकाळ ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*हरिवंशपुराण व हरिनामसंकीर्तन हे ज्याला प्रिय आहे,किंबहुना हरिप्रेमावाचून ज्याला काहीच प्रिय नाही-गोड नाही त्या नामधारकाला इहलोकीच वैकुंठाची प्राप्ती झाली व सर्व तीर्थाटन केल्याचे श्रेय मिळाले.जो मनोमार्गाने विषयाच्या आडरानात शिरतो तो स्वसुखाला मुकतो व जो हरिपाठी स्थिर होतो तो धन्य होतो.ज्ञानेश्वर महाराज सांगतात,हरिनामाची गोडी चित्तात जडून गेल्यामुळे चित्त शुद्ध झाले व भगवत्कृपेने रामकृष्ण चरणांची ओळख होऊन त्या ठिकाणी अखंड प्रेम निर्माण झाले.*

*****************************
📜 *अभंग* – *१९*📜
*****************************

*वेदशास्त्रपुराण श्रुतीचे वचन |*
*एक नारायण सार जप |*
*जप तप कर्म हरिविण धर्म |*
*वाउगाची श्रम व्यर्थ जाय ||*
*हरिपाठी गेले ते निवांतची ठेले |*
*भ्रमर गुंतले सुमनकळिके ||*
*ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र |*
*यमे कुळगोत्र वर्जियले ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*नारायण नामाचा जप हेच एक सर्व साधनांचे सार आहे.या सिद्धांताला वेद,श्रुती व शास्त्र यातील वचन प्रमाण आहे.हरिविण म्हणजे हरिनामाविण केलेली जप, तप,कर्म व धर्म आदि सर्व साधने म्हणजे व्यर्थ श्रम होय व अंती त्यांचा काहीच उपयोग होत नाही. याच्या उलट जे हरिपाठी गेले, हरिनाम स्मरणाचा मार्ग ज्यांनी चोखाळला.ते कमलकलिकेत शांत झालेल्या भ्रमराप्रमाणे निवांत झाले.ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,हरिनाम मंत्र हे सामर्थ्यशाली शस्त्र नामधारकाच्या हाती असल्याने प्रत्यक्ष यम सुद्धा त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहू शकत नाही.*

*****************************
📜 *अभंग* – *२०*📜
*****************************

*नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी ।*
*पापे अनंत कोडी गेली त्यांची ।।*
*अनंत जन्मांचे तप एक नाम ।*
*सर्व मार्ग सुगम हरिपाठ ।।*
*योग याग क्रिया धर्माधर्म माया ।*
*गेले ते विलया हरिपाठी ।।*
*ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म ।*
*हरिविण नेम नाही दुजा ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*वैष्णवांची जोडी-प्राप्ती-लाभ म्हणजे भगवंताचे नाम संकीर्तन याच्या योगाने त्यांची अगणित पापे नाहीशी होतात.अनंत जन्मी तप केल्याने जे पुण्य मिळेत ते याच जन्मी साधकाला नुसत्या एका नामस्मरणाच्या साधनाने प्राप्त होते.असे असून सुद्धा हे नामस्मरणाचे साधन सर्व साधन मार्गात अत्यंत सुलभ आहे.योग, याग,क्रिया,धर्माधर्म आदि सर्व हरिनामापुढे माया म्हणजे व्यर्थ होत.हरिपाठाच्या,हरिनामाच्या दिव्य सामर्थ्यांपुढे त्यांचा प्रकाशच पडत नाही.म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,हरिविण म्हणजे हरिनामाविण दुसऱ्या कुठल्याही साधनांवर,मग तो यज्ञ असो की याग असो,कर्म असो की धर्म असो,नेम नाही- लक्ष नाही, म्हणजे हरिनामावाचून दुसरी साधने मला पसंत नाहीत.*

*****************************
📜 *अभंग* – *२१*📜
*****************************

*काळवेळ नाम उच्चारिता नाही ।*
*दोन्ही पक्ष पाही उद्धरती |*
*रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण |*
*जडजीवांतारण हरि एक ||*
*हरिनाम सार जिव्हा या नामाची ।*
*उपमा त्या दैवाची कोण वानी ||*
*ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ ।*
*पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*नामाचा उच्चार-संकीर्तन करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही.नामाचे महात्म्य इतके अपूर्व आहे की,नाम उच्चारणारा व ते ऐकणारा दोघेही उद्धरून जातात.साधकाचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते, म्हणून जडजीवाना तारणारे एक हरिनामच आहे.खरोखरी पाहता सर्व साधनाचे सार जे हरिनाम त्या नामासाठीच ही जिव्हा देवाने दिली असून जो त्या जिव्हेचा उपयोग नामोच्चारासाठीच करतो त्याच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हाला वैकुंठींचा मार्ग सोपा झाला.*

*****************************
📜 *अभंग* – *२२*📜
*****************************

*नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ ।*

*लक्ष्मीवल्लभ तया जवळी ||*
*नारायण हरि नारायण हरि ।।*
*भुक्ति मुक्ति चारी घरी त्यांच्या ।।*
*हरिविण जन्म नर्कचि पै जाणा ।*
*यमाचा पाहुणा प्राणी होय ।*
*ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड ।*
*गगनाहूनि वाड नाम आहे।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*ज्याचे भगवन्नामावर नेम आहे -प्रेम आहे- लक्ष आहे असा मनुष्य दुर्लभ आहे.अशा नामधारकाजवळ लक्ष्मीवल्लभ म्हणजे भगवंत सदैव वास करतो.नारायण हरि या नामाचा जे अखंड जप करतात त्यांच्या घरी भुक्ती व चारी मुक्ती नांदतात.हरिनामाविण जन्म म्हणजे साक्षात् नरकच होय व असा मनुष्य यमाचा पाहुणा होतो म्हणजे यम त्याला मृत्युनंतर शिक्षा करण्यासाठी परलोकाला घेऊन जातो.ज्ञानेश्वर महाराज निवृत्तिनाथांना नामाच्या स्वरुपासंबंधी मोठ्या आस्थेने प्रश्न विचारतात व त्याला उत्तर मिळते की,नाम गगनाहूनी आकाशाहूनी वाड म्हणजे मोठे आहे.*

*****************************
📜 *अभंग* – *२३*📜
*****************************

*सात पांच तीन दशकांचा मेळा |*
*एकतत्वी कळा दावी हरि ।।*
*तैसे नव्हे नाम सर्व मार्गां वरिष्ठ ।*
*तेथे काही कष्ट न लागती ।।*
*अजपा जपणे उलट प्राणाचा।*
*तेथेहि मनाचा निर्धारू असे ।।*
*ज्ञानदेवा जिणे नामेविण व्यर्थ ।*
*रामकृष्णी पंथ क्रमीयेला ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*सात म्हणजे योगमार्गाच्या सात पायऱ्या चढून समाधी साधणे पांच म्हणजे पंचाग्रि साधनासारखा तपोमार्ग तीन म्हणजे स्थूल,सूक्ष्म व कारण या तीन देहांचा निरास करून त्याच्या पलीकडे असलेल्या आत्मतत्वाशी सामरस्य घेण्याचा व्यतिरेकाचा ज्ञानमार्ग व दशकांचा मेळा म्हणजे पांच कर्मेंद्रियें व पांच ज्ञानेंद्रियें मिळून दहा इंद्रियांच्या दमनाचा मार्ग.हे सर्व मार्ग जर यथासांग घडले तर ते हरिची एकतत्वी कळा दाखवितात.म्हणजे एकतत्व जो हरि त्याची,आपले एकपण न मोडता विश्वरुपाने अनेक होण्याची जी कळा किंवा कला म्हणजे लीला,त्या हरिच्या लीलेचा साक्षात्कार वर सांगितलेल्या मार्गाने गेले असता साधकाला होतो.परंतु हे मार्ग अत्यंत कष्टप्रद आहेत.इतकेच नव्हे तर ते यथासांग घडणेही कठीण आहे.नाममार्ग मात्र तसा नाही.कारण साधकाला तेथे काहीच कष्ट नाहीत व शिवाय ते स्वयंभू व सांग असे साधन आहे. म्हणूनच नामाचा मार्ग हा सर्व मार्गापेक्षा श्रेष्ठ,वरिष्ठ असा पंथराज आहे.उलट सुलट प्राणाच्या गतीत म्हणजे श्वासोच्छवासात सोऽहंचा जो अजपाजप आहे,त्या मार्गात सुद्धा मनाचा विलक्षण निर्धार असावा लागतो.परंतु नाममार्गात असे नाही,तेथे नामाचा अखंड उच्चार करणे एवढेच अभिप्रेत आहे.म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की,नामाशिवाय सर्व जीवन व्यर्थ आहे असा आपला निश्चय असून आपण त्याच मार्गाचा-पंथाचा अवलंब केला आहे.*

*****************************
📜 *अभंग* – *२४*📜
*****************************

*जप तप कर्म क्रिया नेमधर्म |*
*सर्वांघटी राम भाव शुद्ध ||*
*न सोडी हा भाव टाकी रे संदेहो |*
*रामकृष्णी टाहो नित्य फोडी ||*
*जात वित्त गोत कुळ शीळ मात ।*
*भज कां त्वरीत भावना युक्त ||*
*ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी ।*
*वैकुंठ भुवनी घर केले ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*जप,तप,कर्म,क्रिया,नेम,धर्म आदि उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा अंतिम हेतू साधकाच्या ठिकाणी “सर्वांघटी राम” या शुद्ध भावाचा आविर्भाव होण्यासाठीच आहे.म्हणून उपासना चालू असता हा शुद्धभाव बुद्धीतून सोडू नकोस, त्या भावाचा विसर पडू देऊ नकोस व त्याच्या सत्यत्वासंबंधी अंत:करणात काही संदेह असेल तर त्याचा त्याग करून त्या शुद्ध भावाचा जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा प्रभूचा टाहो फोडून नित्य धावा कर.त्याची अत्यंत कळकळीने नित्य प्रार्थना कर.त्यासाठी जात,वित्त,गोत्र,कुळ, शील वगैरे विषयी तू चिंता न करता शुद्ध भावाने युक्त होऊन प्रभूचे त्वरित भजन कर.ज्ञानेश्वर महाराज सांगतात,भगवंत माझ्या ध्यानी-मनी सतत असल्यामुळे, वैकुंठाने-भगवंताने भूलोकी येऊन वस्ती केली.*

*****************************
📜 *अभंग* – *२५*📜
*****************************

*जाणीव नेणीव भगवंती नाही ।*
*हरिउच्चारणी पाही मोक्ष सदा ।।*
*नारायण हरि उच्चार नामाचा ।*
*तेथे कलिकाळाचा रिघ नाही ||*
*तेथील प्रमाण नेणवे वेदांसी |*
*ते जीवजंतूसी केवि कळे ।।*
*ज्ञानदेवा फळ नारायण पाठ |*
*सर्वत्र वैकुंठ केले असे ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*हरि उच्चारणी-हरिनामाचे संकीर्तन करीत असता,साधक ते जाणीवपूर्वक करतो की नेणीवपूर्वक करतो याची चिकित्सा भगवंताचे ठिकाणी नाही.केवळ नामाचा सतत उच्चार केल्याने भगवत् कृपा होऊन साधकाला मोक्ष प्राप्त होतो.नामाचा उच्चार करणाऱ्या साधकाच्या जीवनात कलिकाळ शिरकाव करू शकत नाही.अशा या अलौकिक नामाचा महिमा काय आहे.त्याचे प्रमाण काय आहे हे प्रत्यक्ष वेद सुद्धा संपूर्णपणे जाणू शकत नाही मग इतर सामान्य स्थूल बुद्धीच्या लोकांना नाममहिमा कसा कळेल? ज्ञानेश्वर महाराज सांगतात, नारायण नामाचा नित्यपाठ केल्याने माझी दृष्टी उजळली व त्या दृष्टीला सर्व जग हे वैकुंठस्वरूप आहे असे दिसू लागले.*

*****************************
📜 *अभंग* – *२६*📜
*****************************

*एक तत्वनाम दृढ धरी मना ।*
*हरिसी करूणा येईल तुझी ।।*
*ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद ।*
*वाचेसी सद् गद् जपे आधी ।।*
*नामापरते तत्व नाही रे अन्यथा ।*
*वाया आणिक पंथा जाशी झणी ।।*
*ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी |*
*धरोनी श्रीहरी जपे सदा ||*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*हे मना,जर तू भगवन्नाम,जे एक तत्व आहे,ते अंतःकरणांत दृढ धरशील तर हरिला तुझी करूणा येईल.हे नाम राम-कृष्ण-गोविंद वाचेने घ्यावयास अत्यंत सोपे आहे. सद् गदित अंतःकरणाने तू त्या नामाचा जप कर.नामापेक्षा दुसरे श्रेष्ठ तत्व नाही,हे अन्यथा नाही यात संशय नाही.विनाकारण इतर पंथांनी मार्गानी जाऊ नकोस. ज्ञानेश्वर महाराज सांगतात,आता माझी विलक्षण स्थिती झाली आहे. ती अशी की माझी प्रयत्नपूर्वक जप करण्याची क्रिया आता मौनावली, कारण स्वतःश्रीहरी माझ्या अंतरांत जप करतो व मी तो स्वस्थ बसून ऐकतो.*

*****************************
📜 *अभंग* – *२७*📜
*****************************

*सर्वसुख गोडी साही शास्त्रे निवडी |*
*रिकामा अर्धघडी राहू नको ।।*
*लटिका व्यवहार सर्व हा संसार ।*
*वाया येरझार हरिविण ।।*
*नाममंत्र जप कोटी जाईल पाप ।*
*रामकृष्णी संकल्प धरूनी राहे ।।*
*निजवृत्ति हे काढी सर्वमाया तोडी ।*
*इंद्रियांसवडी लपु नको।।*
*तीर्थीव्रती भाव धरी रे करूणा ।*
*शांति दया पाहुणा हरि करी ।।*
*ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तिदेवी ज्ञान ।*
*समाधि संजीवन हरिपाठ ।।*

———————————————-
✅ *अभंगाचा भावार्थ -*
———————————————-

*अर्धघडी सुद्धा रिकामे न रहाता सर्वकाळ नामस्मरण करीत रहाणे, हाच सर्वसुखाची गोडी चाखण्याचा मार्ग आहे,असा सहाही शास्त्रांचा निवडून काढलेला सारभूत विचार किंवा सिद्धांत आहे.हरिप्राप्तीवीण जन्म मरणाच्या येरझारा व्यर्थ असून,मांडलेला संसाराचा व्याप व त्यासाठी केलेला सर्व व्यवहार म्हणजे जीवाची स्वतःची व्यर्थ फसवणूक होय.नाममंत्राच्या जपाने जीवाची असंख्य पूर्वपापे लयाला जातात.म्हणून तू रामकृष्ण नामजपाच्या संकल्पाला धरून रहा.विषयाच्या मोहात तुझी वृत्ती अडकलेली आहे.तिला कसलीही माया न दाखवता तेथून बाहेर काढ. हे करीत असता तुझी इंद्रिये बिथरतील,त्यांच्या पाशात अडकविण्याचा ते प्रयत्न करतील, परंतु तू मात्र त्यांच्या आहारी जाऊ नकोस.यासाठी तीर्थव्रतांचा तुला उपयोग होईल,म्हणून तुझा त्यावर भाव असू दे.करूणा,शांती,दया हे गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत.कारण त्यामुळेच तुझ्या घरी हरि पाहुणा म्हणून येईल,म्हणजे तुझ्या अंत:करणात प्रभू प्रगट होईल. ज्ञानेश्वर महाराज सांगतात,हरिपाठ हा साधकाला संजीवन समाधी देणारा आहे,हे ज्ञान मला निवृत्तिनाथांच्या कृपेने प्राप्तFor झाले व ते मला सर्वस्वी प्रमाण आहे.*

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै.🙏*

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =